Marathi Bible Reading | Tuesday 13th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

मंगळावर  १३ सप्टेंबर २०२२

 “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला माणूस उठूनबसला आणि बोलू लागला. 






संत जॉन क्रिझोस्तोम 
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल आणि धर्मपंडित (३४९-४०७)
आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या नावाने पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा स्वीकारला आहे. त्यामुळे आपण ख्रिस्ताबरोबर एकरुप झालो असून सर्वजण प्रभू येशूच्या शरीराचे अवयव बनलो आहोत. प्रभू येशूसह आपण जीवन जगत असतांना संत पौल म्हणत आहे, 'श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा.'असंख्य कृपेचा वर्षाव करणारा प्रभू त्या भाकरीत हजर आहे. 

 आपण सर्वजण त्याच प्रभू येशूच्या शरीराचे अवयव बनलो आहोत. म्हणूनच ख्रिस्ताठायी नम्र, शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपण प्रभूकडे श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगू या. प्रभू येशूच्या सर्वश्रेष्ठ कृपादानांबद्धल त्याला धन्यवाद देऊ या आणि त्याच्या करुणामय प्रकाशाचे साक्षीदार बनू या.
 
✝️   

पहिले वाचन : करिथ  १२:१२-१४,२७-३१
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचेअवयव आहात.

जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहूदी असू किंवा हेल्लेणी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत.
कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे.
तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत का ? सगळेच संदेष्टे आहेत का? सगळेच शिक्षक आहेत का ? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत का ? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत का ? सगळेच भिन्नभिन्न भाषा बोलतात का? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात का ? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १००:१-५

प्रतिसाद : आम्ही देवाची प्रजा आणि त्याच्या कुरणातील कळप आहोत.
१) अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
 गायन करीत त्याच्यापुढे या.

२) परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. 
त्यानेच आम्हांला उत्पन्न केले, 
आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, 
त्याच्या कुरणातील कळप आहो.

३) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात, 
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा, 
त्याचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.

४) खरोखर, परमेश्वर चांगला आहे, 
त्याची दया सनातन आहे. 
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
 हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा ! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ७:११-१७
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मुला, मी तुला सांगतो, ऊठ.'

येशू नाईन नावाच्या गावाला गेला आणि त्याचे शिष्य आणि मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला, "रडू नको.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीला स्पर्श केला, तेव्हा तिरडी वाहणारे खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, ऊठ.” तेव्हा तो मेलेला माणूस उठूनबसला आणि बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांना आश्चर्ययुक्त भय वाटले आणि ते देवाला गौरवीत म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे! आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे. त्याच्याविषयीची ही बातमी सगळ्या यहुदियात आणि चहूकडल्या सर्व प्रदेशात पसरली.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  'कळवळा येणे' म्हणजेच हृदयापासून एखाद्या व्यक्ती विषयी भावना प्रकट करणे. एखाद्या भिकाऱ्याला, आंधळ्याला, पांगळ्याला जेव्हा आपण उष्टे फेकलेले अन्न खाताना बघतो, त्यावेळी आपल्याला त्यांचा कळवळा येतो. आजचे शुभवर्तमान केवळ कळवळ्याविषयी नाही, तर कळवळ्याला कृतीत कसे आणावे, याविषयी आहे. यहुद्यांचा विरोध न जुमानता केवळ बाईच्या कळवळ्यापोटी येशूने तिच्या मुलाला जीवनदानदिले. त्याकाळी असा गैरसमज होता की, मृत देहाला स्पर्श केला, तरी स्पर्श करणारा अशुद्ध होतो, पण येशूने त्याची पर्वा न करता आपला कळवळा कृतीत आणला. कित्येक वेळा आपल्याला सुद्धा दुसऱ्यांचा कळवळा येतो. पण आपण तो कृतीत आणतो का? की ओठांत एक, आणि पोटात दुसरे! असे आपण वागतो ? आपला कळवळा कृतीत उतरविण्यासाठी पवित्र | आत्म्याकडे मध्यस्थी करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझे अस्तित्व अनुभवण्यास व तुझ्या प्रेमाचे साक्षीदार
बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या