Marathi Bible Reading | Wednesday 14th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

बुधवार  १४ सप्टेंबर २०२२

  “देवाने जगावर एवढीप्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, 



पवित्र क्रुसाचा विजयोत्सव

सम्राज्ञी हेलेना हिच्या परिश्रमाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या खऱ्या क्रुसाचा शोध लागल्यानंतर त्या क्रुसाचे पवित्र अवशेष संपूर्ण जगभराच्या ख्रिस्ती देवळात पाठविण्याची सोय करण्यात आली. संत जॉन ख्रिझोस्तोम म्हणतात की, बऱ्याच लोकांनी ह्या क्रुसाचे कण चिमुकल्या सोनेरी पेटिकेमध्ये घालून ते आपल्या गळ्यात मिरवू लागले. या क्रुसाचे मोठाले तुकडे पूर्वी राणी हेलेना हिचा राजमहाल असलेल्या परंतु आता पवित्र क्रुसाचे चर्च म्हणून नावाजलेल्या रोमच्या ख्रिस्तमंदिरात आणि इतर महामंदिरात पाठविण्यात आले.

पवित्र क्रुसाच्या या अवशेषांची भक्ती इतकी जबरदस्त होती की मूर्तिभंजक राजांनीदेखील लोकांच्या या भक्तीपुढे हात टेकले. इ. स. ६१४ पर्यंत खऱ्या क्रुसाचा काही भाग जेरूसलेम येथे ठेवण्यात आलेला होता. परंतु त्याच वर्षी पर्शियन लोकांनी हे शहर काबीज केले. त्यांच्या सैन्यात २६,००० यहुदी होते. ख्रिश्चनांचा हवा तसा छळ करण्याची पूर्ण परवानगी या यहुदी लोकांना देण्यात आलेली होती. त्यांनी ख्रिस्ती लोकांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी जेरूसलेमातील ९० हजार ख्रिश्चनांची कत्तल केली. असंख्य ख्रिस्त मंदिरे उध्वस्त केली आणि ख्रिस्ताचा खरा क्रूस पर्शिया येथे पळवून नेला.

तब्बल १३ वर्षांनी हेराक्लियस ह्याने पर्शियावर विजय मिळविला. या आधी पर्शियनांनी जप्त केलेल्या सर्व वस्तू जेरूसलेमला परत करण्यात आल्या. त्याचवेळी पवित्र क्रुसाचा ऊर्वरित भागसुद्धा मोठ्या विजयोत्सवाने पवित्र नगरीत आणण्यात आला. तो दिवस होता १४ सप्टेंबर इ. स. ६२७. त्या वेळेपासून ख्रिस्तसभा दरवर्षी ह्याच दिवशी पवित्र क्रुसाचा विजयोत्सव हा सोहळा साजरा करते.
स्वतः सम्राट हेराक्लियस ह्याने इ. स. ६२९ साली त्या पवित्र क्रुसापुढे गुडघे टेकून नमन केले आणि पूर्वी हेड्रियन ह्यांनी केलेल्या नियमाचे नूतनीकरण केले. या नियमानुसार यहुदी लोकांना जेरूसलेममध्ये प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली होती.

चिंतन :
क्रुसाचे लाकूड पहा हे ख्रिस्त टांगला यावरती, 
करू या वंदन क्रुसाला करू या वंदन क्रुसाला.

खिस्तसभा आज ज्या क्रुसावर प्रभू येशूला खिळण्यात आले होते त्या क्रुसाचा विजयोत्सव साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या काळी क्रुस म्हणजे पाप, दहशत आणि लाजीरवाणे मरण ह्याचे चिन्ह होते. भयंकर क्रूर गुन्हा केलेल्या अपराध्याला क्रुसावरील मरण दंडाची शिक्षा रोमन साम्राज्यात दिली जात असे. प्रभू येशूवर इश्वराची निंदा केल्याचा आरोप ठेवून आन्यायकारक पद्धतीने त्याला क्रुसावरील मरण दंडाची शिक्षा फर्माविण्यात आली. मात्र प्रभू येशू मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झाल्यामुळे दहशत आणि मृत्यू दंडाचे प्रतिक  असलेला क्रुस पवित्र व विजयाचे प्रतिक बनला.
पवित्र क्रुसाचा सन्मान व भक्ती करीत असतात आज आपण विशेषरितीने  क्रुसाचे महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करु या.
 
✝️   

पहिले वाचन : गणना  २१ : ४-९
वाचन :गणना ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे."

वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुध्द आणि मोशेविरुध्द असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला इजिप्त देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो.” तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले, त्यांच्या दंशाने इस्राएलमधील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुध्द आणि तुझ्याविरुध्द बोलण्याचे पाप आम्ही केले आहे, तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र :  ७८:१-२, ३४- ३८

प्रतिसाद : प्रभूची कृत्ये कधीही विसरू नका.

१ ) अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या,
 माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. 
मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन, 
प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.

 २) तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा
शोध करू लागले, ते देवाकडे वळून अनन्यभावे 
त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, 
परात्पर देव आम्हास मुक्त करणारा आहे.
 ह्याची आठवण त्यांना झाली.

३)त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले 
आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली. 
कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, 
शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही. 

४) पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या 
अपराधाची क्षमा करत असतो, तो नाश करत नाही. 
तो आपला कोप वारंवार आवरतो, 
आपला सगळा संताप भडकू देत नाही.

दुसरे वाचन :  फिलिप्पै २: ६-११
पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"त्याने स्वतःला लीन केले, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. "

ख्रिस्त येशू तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण स्वीकारले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी ' प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे...
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे ख्रिस्ता,
आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, 
कारण तुझ्या पवित्र क्रुसाने जगाचे तारण केले आहे.

आलेलुया!

शुभवर्तमान योहान ३:१३-१७
वाचक :   योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे."

येशू निकदेमला म्हणाला, “स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. “देवाने जगावर एवढीप्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  संत पॉल करिंथकरास पहिले पत्र अध्याय १:२२ मध्ये म्हणतात की, 'यहुदी चिन्हे मागतात व हेलेण्णी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर क्रुसावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो.' आज आपण क्रुसावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो व त्या पवित्र क्रुसाचा विजयोत्सव साजरा करतो. क्रूस हे विजयाचे प्रतिक आहे. कारण ख्रिस्त क्रुसावर मरण पावला व तिसऱ्या दिवशी उठवला गेला. त्याचप्रमाणे जो कोणी प्रभू येशूचा पाठलाग करतो, त्याचा क्रूस उचलतो व त्या क्रुसावर मरतो त्या व्यक्तीला पुनरुत्थानाचा अनुभव मिळत असतो. आज आपण पवित्र क्रुसाचा विजयोत्सव साजरा करत असताना, आपल्या दुःखाचे, कष्टाचे, त्रासाचे व समस्याचे समाधान हे ज्या पवित्र क्रुसामध्ये आहे, त्या क्रुसाला वंदन करून आपल्या तारणाचा मार्ग निवडूया.

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, पवित्र क्रुसाचे महत्व जाणून तुझ्यावर प्रेम • करण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या