Marathi Bible Reading | Thursday 15th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

गुरुवार  १५ सप्टेंबर २०२२

 “बाई, पाहा, हा तुझा मुलगा.” 



दुःखी मरिया मातेचा सन्मान
.
 ख्रिस्तसभा आज मरिया मातेचा दुःखी माता म्हणून सन्मान करीत आहे. परमेश्वराच्या तारणकार्य योजनेत मरिया माता प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात समरस झालेली आपण पाहतो. मरिया मातेने देवावरील विश्वासाने तिच्या जीवनात येणारी सर्व आव्हाने स्वीकारली होती. शिमोन संदेष्ट्याने केलेले  भाकित, "तुझ्या स्वतःच्या जिवातून तरवार भोसकून जाईल," हे भाकित प्रत्यक्षपणे मरियेने अनुभवले. पवित्र मरियेच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग  आले. 

पवित्र आठवड्यामध्ये शुभशुक्रवारानंतर येणारा पवित्र शनिवार हा दुःखी मातेच्या सहवासात राहण्याचा दिवस म्हणून ख्रिस्तसभा पाळत असते. त्याप्रमाणे पुन्हा एकदा सप्टेंबरच्या महिन्यात ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या सात दुःखांचे स्मरण करीत असते.
येशूचे मंदिरात समर्पण करण्यात आले तेव्हा शिमोन संदेष्ट्याने केलेले भाकीत, मिसर देशात ३०० मैल चालत जाणे, येशूचे देवळात हरवणे, क्रुसाच्या भाराखाली वाकलेल्या प्रभू येशूची आपल्या दुःखी मातेशी भेट होणे, येशूला क्रुसावर खिळणे, येशूचे मृत शरीर क्रुसावरून काढून मरियेच्या हाती देणे आणि येशूला थडग्यात पुरणे हीच ती सात दुःखे होत.
प्रथम १६६८ साली फक्त सेव्हराईट संस्थेला हा सण साजरा करण्याचीपरवानगी देण्यात आली होती. पुढे पोप पायस सातवे हे हद्दपारीतून परतल्यानंतर इ. स. १८१४ साली त्यांनी हा सण संपूर्ण ख्रिस्तसभेचा अधिकृत सण म्हणून जाहीर केला..

जगातील दुःखी, कष्टी व भाराक्रांत झालेल्या सर्वांची आदर्श माता बनलेली मरिया माता सर्वांसाठी प्रभू येशूपाशी मध्यस्थीची भूमिका पार पाडत आहे. आज  आपण त्याच आपल्या आईचा सन्मान करीत असताना तिच्या गुणांचे अनुकरण करता यावे म्हणून प्रेरणा मागू या.
✝️   

पहिले वाचन : इब्री  ५ : ७-९
वाचन : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"तो आज्ञाधारकपणा शिकला आणि सार्वकालिक तारणाचा झरा झाला. "

मानवाला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ येशूने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, मोठा आक्रोश करत आणि अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सदभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा झरा झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३१ :२ - ६, १५-१६, २० 
प्रतिसाद :  प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर.

१) हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय घेतला आहे. 
मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस.
 तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर, 
माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडव.

२ ) तू माझा आश्रयदाता पहाड हो, 
माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि 
माझे रक्षण कर, कारण तूच माझा आश्रयदाता पहाड
 आणि दुर्ग आहेस तुझ्या नावाच्या महिम्यासाठी
 मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो.

३) माझ्यासाठी त्यांनी गुप्तपणे पसरलेल्या 
जाळ्यातून मला सोडव, कारण तूच मला 
आसरा देणारा दुर्ग आहेस. 
मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो.
 हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, 
तूच माझा उध्दार करशील.

४) हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे.
 मी म्हणतो, “तूच माझा देव आहेस.
 माझे बरेवाईट तुझ्याच हातात आहे. 
माझा पिच्छा पुरवणारे व माझे शत्रू, 
ह्यांच्या हातून मला सोडव. "

५) हे प्रभो, तुझे चांगुलपण किती थोर आहे. 
तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे,
 तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी 
मनुष्यमात्रांदेखत तू ते सिध्द केले आहेस.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
पवित्र मरिया धन्य आहे, 
तिने प्रभुख्रिस्ताच्या वधस्तंभाखाली उभी राहून 
रक्तसाक्षीत्वाचा बहुमान मिळवला. 
आलेलुया!

शुभवर्तमान योहान१९ : २५-२७
वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 "काळिज झाले विदीर्ण तिचे पाहुनिया दारुण्य येशूचे गळताना रुधिराची धार. "
येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया माग्दालेना ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा.” मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई" आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

पर्यायी शुभवर्तमान
शुभवर्तमान 
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन २ : ३३-३५
"तुझ्या स्वतःच्या हदयातून तरवार भोसकून पार जाईल. "

त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील आणि त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मारिया हिला म्हटले,
“पाहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, ह्यासाठी
इस्राएलमध्ये अनेकांचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुध्द लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे.
(आणि पाहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तरवार भोसकून पार जाईल.)
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेचे दुःख आणि तिच्या दुःखी, कष्टी जीवनावर मनन-चिंतन करत आहे. मानवी जीवन सुख-दुःखाने भरलेला प्याला आहे. सर्वांच्या जीवनात दुःख, कष्ट, यातना असतात. पण सर्वांचा मनोभाव किंवा व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजण देवाला दोष देतात, काहीजण देवाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करतात. तर काहीजण दुःखाचा बाऊ न करता देवाच्या इच्छेला मान देतात, पवित्र मरिया अगदी तशीच होती. ज्यादिवशी गॅब्रिएल दूताने संदेश दिला, त्या दिवसापासून ते येशूला थडग्यात ठेवेपर्यंत मरियेचे जीवन हे दुःखी कष्टी होते. पण तिने देवदूताला जे वचन दिले होते त्यावर ती अगदी ठाम राहिली. अगदी शेवटपर्यंत 'पहा मी प्रभूची दासी आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे होवो' या वचनास ती जागली, तिने विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, कारण तिने आपल्या हृदयात देवाच्या शब्दाला जोपासले म्हणूनच दुःखाचा प्याला पिण्यास ती सक्षम व खंबीर झाली. आपल्या जीवनातही अनेक संकटे, दुःख येत असतात, तेव्हा आपण देवाला दोष न देता पवित्र मरियेप्रमाणे एकच वाक्य उच्चारूया, “तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”

प्रार्थना : हे पवित्र मरिये आमचे आई, आमच्या संकटसमयी आम्हाला धैर्य व| बळ मिळावे म्हणून आम्हासाठी मध्यस्थी कर.  आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या