Marathi Bible Reading | Friday 16th September 2022 | 24th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२

 दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.



 संत कोर्नेलियस परमगुरू, 
 व संत सिप्रियस
रक्तसाक्षी 

 त्याकाळी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने कार्य करण्याची मुभा  नव्हती, तरी सुद्धा प्रभू येशूच्या अमृत वचनांनी प्रेरित होऊन आणि त्याच्या  कृपेच्या व प्रेमाच्या छायेखाली स्त्रियांनी प्रभूचे कार्य करण्यासाठी सहकार्य  केले. जगामध्ये अनेक स्त्रिया आज प्रभूच्या मळ्यात सेवाकार्य करीत आहोत. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा अशा क्षेत्रात धर्मभगिनींचे कार्य उल्लेखनीय  आहे. मदर तेरेजांचा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे.

 ख्रिस्तसभा आज संत कोर्नेलियस व संत सिप्रियस ह्यांचा सन्मान करीत आहे. ख्रिस्तसभेच्या प्रारंभीच्या काळात डेसियन सम्राटाच्या कारकिर्दीत ख्रिस्तीजनांचा अतोनात छळ झाला. अशा प्रसंगी ह्या दोन्ही संतांनी ख्रिस्ती| विश्वासू लोकांना प्रोत्साहित केले. ख्रिस्ताची साक्ष त्यांनी आपल्या जीवनाद्वारे दिली.  
✝️   

पहिले वाचन : करिथ  १५:१२-२०
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त उठवला गेला नसेल तर आमचा विश्वास व्यर्थ आहे."

ख्रिस्त उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येकजण म्हणतात हे कसे ? जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वासही व्यर्थ आणि आम्ही देवासंबधांने खोटे साक्षी असे ठरलो. कारण देवासंबधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले, पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही. कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहा आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो.
तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेच, तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथमफळ असा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १७:१, ६ - ७, ८ब, १५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होईल.

१) हे परमेश्वरा, माझी रास्त विनवणी ऐक, 
माझा धावा ऐक.. माझ्या निष्कपट मुखाने 
उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.

२) हे देवा, मी तुझा धावा करतो, 
कारण तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे, 
माझे म्हणणे ऐक, तुझा आश्रय घेणाऱ्यांना
 त्यांच्या विरोधकांपासून तू आपल्या 
उजव्या हाताने वाचवतोस, 
तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.

३)आपल्या पंखाच्या छायेत लपव.
मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो, 
मी जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
ने लोक वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ८:१-३
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"दुसऱ्या कित्येक स्त्रिया येशूबरोबर होत्या,
 त्या आपल्या पैशाअडक्याने त्याची सेवाचाकरी करत असत."

येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरियेतून सात भुते निघाली होती ती आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र अध्याय ९, वचन ७-६ यात म्हटले आहे. की, संतोषाने देणारा  देवाला प्रिय असतो. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशूच्या देवराज्याच्या घोषणेत अनेक स्त्रियांनी आर्थिक मदत केली. स्त्रियांनी त्यांच्या कमाईतून सुवार्ता पसरविण्याच्या कार्यात आपले योगदान दिले. ज्यावेळी आपण आपल्या कमाईचा एक हिस्सा देवाच्या कार्यासाठी देतो, तेव्हा देव आपल्याला शंभर पटीने परत देतो, हा अनुभव आपल्या मधील अनेकांना आलेला आहे. देवाने आपल्याला अनेक दानांनी, कला कौशल्याने व आर्थिकरित्या सक्षम केले आहे. आपणही आपापल्या परीने देवकार्यासाठी हातभार लावला पाहिजे. आजच्या शुभवर्तमानातील स्त्रिया आपणांसाठी आदर्श आहेत. मोकळ्या मनाने व हृदयात कोणताही  संशय न धरता परमेश्वराच्या कार्यात हातभार लावण्यासाठी परमेश्वराची प्रेरणा मागूया !

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझे देवराज्याचे महान कार्य न संपणारे आहे. त्याच्यासाठी आम्हा मधून सेवाकार्य करण्यास व तुला अनुसरण्यास कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या