सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह
सोमवार ३१ ऑक्टोबर २०२२
एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा;
संत अल्फोन्सस रॉड्रीग्ज
वर्तनसाक्षी (१५३१-१६१७)
दक्षिण स्पेनमध्ये रेशीम कापडाचा एक व्यापारी राहत होता. एकाएकी त्याची बायको आणि मुले मरण पावली. त्याबरोबर त्याने मोठ्या उल्हासाने प्रार्थनामय जीवन सुरू केले. असह्य शारीरिक कष्ट आणि तपश्चर्या ह्यांद्वारे त्याने पावित्र्याचा अंगिकार केला आणि वयाच्या ३९ व्या वर्षी माजोकी बेटावरील येशूसंघियांमध्ये त्याने व्रतस्थ बंधू म्हणून दीक्षा घेतली. तेथे त्याने माऊंट सायन कॉलेज व सेमिनरीचा द्वारपाल म्हणून ३५ वर्षे नम्रपणे कार्य केले.
औपचारिकारित्या शिक्षण झालेले नसले तरी धर्मगुरूंकडे येणाऱ्या लोकांत एक ब्रदर म्हणून त्याने मोलाचे मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम केले. ख्रिस्ती धर्मतत्त्वांविषयी त्याला अगाध ज्ञान होते. पवित्र मरियेवरील बालसदृश मनोवृत्तीमुळे आणि आत्यंतिक शक्तीमुळे त्याने निष्कलंक गर्भसंभवाचा प्रार्थनापाठ लिहिला व त्याच्या प्रती सर्वत्र वाटून टाकल्या. प्रार्थनापाठ अल्पावधीत लोकप्रिय झाला.
द्वारपाल म्हणून कार्य करीत असताना तो स्वत:शी म्हणे, 'दरवाज्यावर बेल वाजली आणि कोणी आले तर तो ख्रिस्तच समजायचा' आणि मग मोठ्या प्रसन्न हसतमुख चेहऱ्याने तो त्यांचे स्वागत करीत म्हणे, “प्रभुजी, या मी आपली काय सेवा करू?"
आपल्या कल्पाना व योजना ह्यापेक्षां देवाच्या योजना खूप वेगळ्या असतात. प्रभू येशू त्याच्या प्रीति योजनेत सर्वांना आमंत्रण देत असतो. आपणसुद्धा, देवाच्या योजनेप्रमाणे भेदभाव, स्वार्थ व दांभिकपणे कोणतीही गोष्ट न करता समचित्त व एकचित्त बनण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र २:१-४
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्ही समचित्त होऊन माझा आनंद पूर्ण करा.”
ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा आणि करुणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा; तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणांपेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १३१:१,२, ३
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्याठायी माझा समेट घडव.
१) हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही,
माझी दृष्टी उन्मत्त नाही. मोठमोठ्या
आणि मला असाध्य अशा गोष्टीत मी पडत नाही.
२) खरोखर मी आपला जीव स्वस्थ
आणि शांत ठेवला आहे.
दूध तुटलेले बालक, आपल्या आईबरोबर असते.
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या
बालकासारखा माझ्याठायी आहे.
३) हे इस्राएल, आतापासून सर्वकाळ तू
परमेश्वराची आशा धर.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो,
आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १४:१२-१४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही आपल्या मित्रांना बोलावू नका, तर गोरगरिबांना आमंत्रित करा. "
ज्या परुश्याने येशूला आमंत्रण केले होते त्याला येशू म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची मेजवानी द्याल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका, कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील आणि तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा गोरगरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे ह्यांना आमंत्रित करा, म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नाही. मात्र नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : प्रभू येशू हा गरिबांचा कैवारी आहे. समाजातील गरीब, गरजवंत, अनाथ, अपंग अशा दुर्बळ लोकांचा त्याला नेहमीच कळवळा येतो. समाजातील सर्व सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या या लोकांना मानाने जगता यावे यासाठी प्रभू येशू सतत प्रयत्न करीत होते. परंतु शास्त्री परुशी ह्यांच्या सारख्या समाजातील उच्च लोकांना ते पटत नव्हते कारण ते अशा लोकांना पापी म्हणून समजत होते. तसेच त्याची ह्या लोकांकडे पाहण्याची मनोवृत्ती फारच संकुचित होती. परंतु आजच्या वाचनात संत पौल आपणांस स्पष्ट पणे सांगत आहे की, एकमेकांवर सारखीच प्रीती करा, तट पाडण्याचा प्रयत्न करू नका, एकमेकांना लीनतेने आपल्या पेक्षा श्रेष्ठ माना व आपल्या बरोबबर दुसऱ्याचेही हित पाहा. परंतु हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपले मन मोठे व इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन एकसमान असेल तरच आपण प्रभू येशूच्या वचनानुसार इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो. देव सर्वकाही देत नाही व सर्वांकडून सर्वकाही मागत नाही. परंतु आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी लाभलेल्या आहेत ते देवाचे दान आहे. म्हणूनच गोरगरीब, अपंग, अनाथ, ह्यांच्या बरोबर आपल्या मिळकतीचा काही भाग थोडे दान म्हणून देणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमात आपण केवळ स्वतःच्याच कुटुंबाचा व मित्रपरिवाराचा विचार करतो. परंतु प्रभू येशू आपणांस समाजातील अनेक दुर्बळ घटकांना देखील तितकेच महत्व देण्यास सांगत आहे. आजच्या ह्या प्रभू वचनावर मनन करीत असताना आपण आपल्या जीवनाचे बारकाईने परीक्षण करुया व कशाप्रकारे आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या गरिबांना व दुर्बळ घटकांना मदत करून त्याच्या जीवनात आनंद निर्माण करणार आहोत ? अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा लोकांना पाहतो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते ? ह्यावर थोडावेळ चिंतन करूया.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या सहभोजनाचा आस्वाद सर्वांपर्यंत पोहोचवून तुझी सुवार्ता सांगण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या