Marathi Bible Reading | Sunday 30th October 2022 |31st Sunday In Ordinary Time |

सामान्यकाळातील ३१ वा  रविवार 

३०ऑक्टोबर   २०२२

कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे.”



येशूने त्याला म्हटले, 'जक्कया त्वरा करुन खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे.' 


परमेश्वराचा अविनाशी आत्मा सर्वामध्ये वास्तव करीत असतो. परमेश्वर सर्वांवर प्रेम करणारा असून तो सर्वांनाच दया दाखवतो. प्रभू सर्व अपराध करणाऱ्यांना व चुकलेल्यांना सुधारण्याची संधि देत असतो कारण तो दयाळू व प्रेमळ आहे.

यरीहो नगरात जक्कय नावाचा माणूस मुख्य जकातदार  आणि  श्रीमंत होता. प्रभू येशूची किर्ती तो जाणून असावा म्हणूनच येशू यरीहोतील गावातून जात असताना त्याला जवळून पाहण्यासाठी तो वाटेवरील एका झाडावर चढला. जक्कयला जरी समाजात पापी जकातदार म्हणून ओळखले जात असले तरी प्रभू  येशूने जक्कयची आंतरिक तळमळ ओळखली. प्रभूने  जक्कयला नाव घेऊन बोलविले आणि जक्कयचा आनंद गगनात मावेनासा झाला.  जक्कयला आपल्या अपराधाची जाणीव झाली आणि तो पश्चाताप करुन भरपाई  करण्यास तयार झाला. प्रभू येशूंनी त्याला म्हटले, 'आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे.' परमेश्वरांची अपार दया व प्रेमाचा अनुभव जक्कयला आला आणि त्याचे जीवन परिवर्तन झाले.

अपराध करणाऱ्यांना व चुकलेल्या सर्वांना म्हणजेच आपल्या सर्वांना  परमेश्वर परिवर्तनाची व सुधारण्याची संधि देत  आहे. '


✝️   
पहिले वाच:ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२
वाचक : ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन

"प्रभो, तू सर्वांना दया दाखवतोस, अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तू प्रेम करतोस.”

"प्रभो, तुझ्यासमोर सारे जग तराजूच्या पारड्यातील धुलीकणासारखे आहे, जमिनीवर गळून पडणाऱ्या सकाळच्या दंवासारखे आहे. परंतु तू सर्वांनाच दया दाखवतोस. तू साऱ्याच गोष्टी करू शकतोस. लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून तू त्यांच्या पापांकडे कानाडोळा करतोस. अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर तू प्रेम करतोस आणि तू निर्माण केलेल्या कोणत्याही गोष्टीचा तुला तिरस्कार वाटत नाही. तू त्यांचा द्वेष केला असता तर त्या तू निर्माण केल्या नसत्यास. तुझी इच्छा नसती तर कोणत्याही गोष्टीचा निभाव लागला नसता. तू जर एखादी गोष्ट अस्तित्वात आणली नाही तर ती कशी बरे टिकून राहील? तू साऱ्याच गोष्टींना टिकवून धरतोस, कारण त्या तुझ्याच आहेत. हे प्रभो, तू जिवंतांवर प्रेम करतोस. कारण तुझा अविनाशी आत्मा साऱ्यांमध्ये वास्तव्य करून आहे. त्यामुळे अपराध करणाऱ्यांना तू हळूहळू सुधारून घेतोस. ज्यामुळे ते पाप करतात त्याची तू त्यांना आठवण करून देतोस व त्यांना ताकीद देतोस, त्यामुळे ते दुष्टपणातून मुक्त होतात आणि हे प्रभू, ते तुझ्यावर श्रद्धा ठेवतात.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : १४५:१-२, ८-११,१३-१४ 

प्रतिसाद : हे राजा, माझ्या देवा, मी तुझ्या नामाला सदैव धन्यवाद देईन.

१ हे राजा, माझ्या देवा, मी धन्यवाद देईन, 
मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन 
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.

२ परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. 
तो मंदक्रोध आणि अतिदयाळू आहे. 
परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. 
त्याची दयादृष्टी त्याने निर्मिलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

३ हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र तुझी स्तुती गातात 
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. 
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात 
आणि तुझा पराक्रम कथन करतात.

४ परमेश्वर आपल्या वचनाला जागतो, 
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो 
आणि वाकलेल्या सर्वांना उभे करतो.

दुसरे वाचन  २ थेस्सलनी १:११- २,२
वाचक: पौलचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"आपला प्रभू येशू ह्याच्या नामाला तुमच्या ठायी आणि तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.” 
आम्ही तुम्हांसाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की, आपल्या देवाने तुम्हांला झालेल्या ह्या पाचारणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाचा प्रत्येक मनोदय आणि विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, हयासाठी की, आपला देव आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी आणि तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.

बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन आणि त्याच्या जवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका आणि घाबरू नका, प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १९:१-१०
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे.”

येशूने यरिहोत प्रवेश केला आणि त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. तो ठेंगणा असल्याने गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो पुढे धावत जाऊन येशूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे.” तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, "प्रभो, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य गरिबांना देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घरात तारण प्राप्त झाले आहे, हाही आब्राहामचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे.”

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  परमेश्वर पात्र लोकांना पाचारण करीत नसतो तो पाचारण केलेल्या लोकांना पात्र ठरवित असतो.' आजची वाचने परमेश्वर प्रत्येक मानवाला कसा अप्रतिमरित्या पाचारण करीत असतो त्याविषयी तीन चिंतने सादर करतात. अ. परमेश्वर माणसाचा पापी भूतकाळ पाहात नाही, तो माणसाचा संभाव्य गौरवशाली भविष्यकाळ पाहतो : आजच्या पहिल्या वाचनात ज्ञानग्रंथाचा लेखक पश्चात्ताप्याविषयी परमेश्वराचा कळवळा शब्दबद्ध करतो. असा पापी मनुष्य आपल्या पापांच्या अंधारात राहणार नाही. खुद्द परमेश्वरच त्याला हळूवारपणे निष्कलंक गौरवशाली भविष्याकडे घेऊन जाईल. 
ब. परमेश्वराच्या हाकेला होकार देण्यासाठी पाचारणास साजेसे वर्तन हवे : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल थेस्सलनीकाकरांना प्रभूच्या दिनाची तयारी करताना आपल्याला झालेल्या  पाचारणाशी असे वर्तन ठेवण्याचे आवाहन करतो. ह्या लोकांना भविष्यातील न्यायदिनाच्या शिक्षेची भीती वाटत होती. संत पॉल त्यांना वर्तमानकाळातील उचित वर्तनाकडे लक्ष द्यायलासांगतो. 
क. परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी अंतःकरणाची उचित वृत्ती धारण करावी लागते : आजच्या शुभवर्तमानामध्ये जक्कय ह्या जकातदाराच्या पाचारणाची कथा वर्णन करण्यात आलेली आहे. त्यासाठी त्याने धारण केलेल्या मनोवृत्तीचे सहा पैलू ठळकपणे जाणवतात. 
१. येशूला पाहायची त्याची फार इच्छा होती. 
२. त्यासाठी त्याने लोकांचा जमाव आणि आपला ठेंगणेपणा यावर मात केली. 
३. लोकलाजेला न भिता तो उंबराच्या झाडावर चढतो. 
४. येशूने आज्ञा करताच झाडावरून खाली उतरतो. 
५. आनंदाने येशूचे स्वागत करतो. 
६. येशूने सांगितल्याप्रमाणे 'आब्राहामचा पुत्र' बनण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करण्यास तयार होतो.

आत्मपरीक्षण : मला माझे पाचारण समजलेले आहे का? त्या पाचारणाला साजेसे असे माझे जीवन आहे का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याकडे आकर्षित होण्यासाठी माझे अंत:करण उघड व मला तुझी दया व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन ! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या