Marathi Bible Reading | Saturday 29th October 2022 | 30th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३० वा सप्ताह  

शनिवार २९ ऑक्टोबर २०२२


 "जो आपणास नमवितो तो उंच केला जाईल.”



संत नार्सिसुस

महागुरू, वर्तनसाक्षी (११०-२२२)


संत पौल आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे की, त्याने  ख्रिस्ताठायी आपले सर्वस्व समर्पित करून केवळ ख्रिस्ताचीच सुवार्ता  घोषविण्यात त्याला आनंद होता. प्रभू येशूचा नम्र दास व सेवक बनून संत  पौलाने ख्रिस्ताची साक्ष सर्वांना दिली.
 प्रभू येशू आपल्याला देवाठायी नम्रता धारण करण्याचा सल्ला देत असताना समारंभातील आदरतिथ्य व नम्र वागणुकीची शिकवण देत आहे. आपल्याला विविध समारंभाची आमंत्रण येत असतात.  अशावेळी आपण सभ्यतेने वागावे. विशेषतः नम्रतेने खालच्या सामान्य जागेवर बसावे. आपल्याहिपेक्षा अधिक योग्यतेच्या माणसांसाठी समोरची व  वरची आसने राखून ठेवलेली असू शकतात. आपली प्रतिष्ठा धूळीस मिळू नये म्हणून बेनसीराच्या बोधवचनात म्हटले आहे, “स्वतःची प्रतिष्ठा मिरवू नकोस  नाही तर तू आपल्या तोंडाला काळिमा फासशील" (बेनसीरा १:१०). आपण आज आदरतिथ्य व समारंभात पाळावयाची पथ्ये ह्यावर चिंतन करू या. 
✝️   

पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र  १:१८-२६ 

वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

 "मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे."

ख्रिस्ताची घोषणा होते ह्यात मी आनंद करतो आणि करणारच. कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा आणि आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धाराला कारण होईल, हे मला ठाऊक आहे. कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. मी ह्या दोहोसंबधांने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे हे तुम्हांकरिता अधिक आवश्यक आहे. मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हांला वृद्धी आणि आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की, तुम्हांमध्ये माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठायी अभिमान बाळगण्याचे तुम्हांला अधिक कारण व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र :  ४२:२, ३, ५बकड
प्रतिसाद : माझा जीव देवासाठी तहानलेला आहे. 

१) हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी कासावीस होते
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी कासावीस झाला आहे.

२) माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानलेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन ?

३) लोकसमुदायाच्या मेळयाबरोबर मी चालत असे 
आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा 
गजर चालला असता देवाच्या घराकडे 
त्याला मी मिरवत नेत असे.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना 
ज्योतीसारखे जगात दिसता.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १४:१,७-११
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल. "

येशू एका शब्बाथ दिवशी परुश्यातील कोणाएका अधिकाऱ्याच्या घरी भोजनाला गेला, तेव्हा ते त्याच्या पाळतीवर बसले होते.
 आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून येशू त्यांना दाखला देऊन म्हणाला: “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस, कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल, मग ज्याने तुला आणि त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ह्यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील, पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा, वर येऊन बैस, म्हणजे तुझ्याबरोबर भोजनाला बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  नम्र हृदय तव येशू जैसे मजला लाभावे. नम्रता व आदरातिथ्य हे मानवी जीवनाचे असे अलंकार आहेत की, जे कुणी ते परिधान करतात ते देवाच्या व माणसाच्या दृष्टीने खूप मह बनतात. बायबलमध्ये असे अनेक लोकांची उदाहरणे आहेत जेथे देव नम्र लोकांना अती उंच करतो व गर्विष्ठांना खाली पाडतो. पवित्र मरिया व प्रभू येशू स्वतः नम्रतेचे महान उदाहरण आपल्यासमोर आहेत. परंतु हे जरी खरे असले तरी नम्रता धारण करणे हे सर्वांसाठी सोपे नाही. मात्र ते अशक्य सुद्धा नाही. देवावरील विश्वास व आपल्याला कराव्या लागणाऱ्या सर्व त्यागाची, जर मनापासून तयारी असेल तर आपण ही नम्रता धारण करू शकतो. मात्र त्यासाठी आपणांस अहंपणा, गर्व, स्वार्थ, खोटी प्रतिष्ठा अशा अनेक वाईट गुणांचा नेहमी त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जगाच्या मोहजाळ्यात अडकले तर आपणदेखील जगातील इतर लोकांसारखे मान, प्रसिद्धी ह्या मागे लागतो व त्यासाठी प्रसंगी इतरांना त्रास देणे, त्यांची मने दुखावणे, फसवणूक करणे. तसेच लोकांना दाखविण्यासाठी दानधर्म करणे अशा अनेक मार्गांनी आपण स्वतःचीच फसवणूक करीत असतो. मग नम्रता धारण कशी करणार ? त्यासाठी प्रभू येशू आपणांस स्पष्टपणे सांगत आहे की, आपल्या जीवनात नेहमी इतरांना प्रथम स्थान दिले पाहिजे. नाहीतर आपल्याला प्रत्यक्ष अनुभवच धडा शिकवतो. म्हणूनच महान व्यक्ती तेच बनतात जे स्वतःपेक्षा इतरांना मानाचे स्थान व आदर देतात. आज प्रभूचरणी बसून आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया की, मी दुसऱ्यांना कशी वागणूक देतो? मी नेहमी मान व प्रतिष्ठा ह्यासाठी धडपडत असतो की देवाच्या कार्यासाठी ? माझ्यात नम्रता व साधेपणा यावे म्हणून मला काय केले पाहिजे ? प्रभू येशूच्या सहवासात राहून आपल्याला नम्र हृदय लाभावे म्हणून त्याच्या कृपेचा अनुभव घेऊया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी योग्य ती स्तुती करण्यास व नम्रपणे इतरांना सन्मानाने वागविण्यास प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या