Marathi Bible Reading | Friday 28th October 2022 | 30th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३० वा सप्ताह  

शुक्रवार २८ ऑक्टोबर २०२२


 सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा 
 


संत सायमन व ज्यूड 

-प्रेषित, रक्तसाक्षी (१ ले शतक)

शिमोन कनानी  : खरे पाहता येशूचा एक शिष्य सायमन अथवा शिमोन ह्याच्याविषयी इतिहासात फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्याला जिलोत म्हटलेला सिमोन (लूक ६:१५) किंवा शिमोन कनानी (मार्क ३:१८) असे म्हटलेले आहे. येशूने पुकारलेल्या प्रेषितांच्या यादीमध्ये शक्यतो त्याचा क्रम अकरावा लागलेला आढळतो. जिलोत ह्या नावावरून एक तर त्याला मोशेच्या नियमशास्त्राची इतकी आवड असेल की त्याला वकील किंवा कायदेतज्ज्ञ म्हणून समाजात मान्यता मिळालेली असेल अथवा रोमच्या अवजड जोखडाखालून मुक्त होण्यासाठी बंड पुकारणाऱ्या देशभक्त झिलट किंवा जिलोत पंथाशी तो संबंधित असावा. ग्रीक आणि कॉप्टिक लोकांच्या परंपरेनुसार सिमोन हा काना येथील लग्नामध्ये वरपक्षाचा होता. अथवा खुद्द वर होता. तेथे येशूने आपला पहिला चमत्कार केला.

पुढे सिमोनने येशूची सुवार्ता कुठे पसरविली, तो कुठे रक्तसाक्षी झाला त्याचे थडगे कुठे आहे ह्याविषयी इतिहासात कोणताही साक्षीपुरावा उपलब्ध नाही. कातडे कमावणारे व लाकूडतोड करणारे यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.
संत ज्यूड : प्रभूचा भाऊ समजला जाणारा धाकटा याकोव ह्याचा ज्यूड हा भाऊ मानला जातो. म्हणजेच तो येशूचा चुलत भाऊ होय. ज्यूड तद्दय किंवा यहुदा ह्याने नव्या करारात एक पत्र लिहिलेले आहे. संत ऑरिजेन ह्या धर्मपंडिताच्या म्हणण्यानुसार यहुदाने अगदी मोजक्या ओळीत फार मोठे धर्मतत्त्वज्ञान सांगितलेले आहे.
अखेरच्या भोजनाच्या वेळी ह्याच यहुदाने येशूला विचारले, “आपण स्वत: केवळ आम्हा शिष्यांनाच ह्या गोष्टी का सांगता? संपूर्ण जगाला का सांगत नाहीत?" तेव्हा तो त्यांना म्हणाला, "माझ्या आज्ञा पाळून माझ्याशी विश्वासू राहणाऱ्यांनाच मी प्रकट होत असतो” (योहान १४:२२).
संत ज्यूडने विशेषत: पॅलेस्टाईन येथे येशूची सुवार्ता पसरविली त्यानंतर तो पर्शिया व आर्मेनिया या ठिकाणी गेला व रक्तसाक्षी झाला.
पुढे डोमिशियन राजाने संत ज्यूडच्या नातवंडांना गालिलातून रोममध्ये पकडून आणले; परंतु जेव्हा ते राजकीय विरोधक नाहीत हे राजाला कळले तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले.
संत ज्यूड हा हॉस्पिटलचा आणि निराशग्रस्तांचा आश्रयदाता संत मानला जातो. झांशी ह्या ठिकाणी त्याचे तीर्थस्थान आहे. वसईतील निर्मळ येथे डोंगरमावलीच्या शेजारी त्याची इमाज निराशग्रस्तांना आधार देत उभी आहे. अलिकडे त्याची भक्ती अधिक लोकप्रिय होत आहे.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ६:१०-२०

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "वाईट दिवसात तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा."

प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. 
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्यांच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे आणि जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे म्हणून माझ्यासाठी विनवणी करा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र :  १९:२-५

प्रतिसाद :  निशीदिनी त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो.

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
दिवस दिवसाशी संवाद करतो,

२) वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो, 
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल
आम्ही तुझी स्तुती करतो.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ६:१२-१६
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशूने आपल्या शिष्यांमधून बारा जणांना निवडून त्यांस प्रेषित असे नाव दिले. "

येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले : शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  कोणत्याही चांगल्या कार्याची सुरूवात प्रार्थनेने केली तर ते कार्य नेहमीच यशस्वी होते. ख्रिस्ती ह्या नात्याने आपण नेहमी पवित्र त्रैक्याच्या नावाने प्रार्थनेने सर्वकार्याची सुरूवात करतो. प्रभू येशूने देखील आपल्या बारा शिष्यांची निवड करण्याअगोदर संपूर्ण रात्र प्रार्थना केली. त्याच शिष्यांच्या विश्वासाच्या पायांवर प्रभूने जी ख्रिस्तसभा स्थापली त्याचे आपण सर्व सदस्य आहोत. म्हणूनच ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण एक इमारत आहोत व प्रभू येशू स्वतः त्या इमारतीचा प्रमुख कोनशिला म्हणजे पाया आहे. जस जसे आपण प्रभू प्रेमात वाढत जातो तसतशी इमारत वाढत जाते. आपले हृदय हे पवित्र मंदिर आहे. ज्यामध्ये प्रभू येशू वस्ती करतो. अ अनेकजण ह्या इमारतीचे भाग बनू इच्छितात परंतु सैतानाच्या शक्तीला व मोहाला बळी पडून ते प्रभू येशू पासून दूर जात आहेत. आज प्रभू येशूला त्याच्या मळ्यात कार्य करण्यास अनेक विश्वासू व त्याच्यासाठी सर्वकाही सोडून देऊन केवळ त्याच्या कार्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या धैर्यवान माणसांची गरज आहे. म्हणूनच तो आपली देखील अनेक कार्यासाठी निवड करतो. परंतु आज मोबाईलच्या जगात वावरताना आपण सदैव तत्पर आणि तयार आहोत का? येणाऱ्या तरुण पिढीला आपल्या कुटुंबात आपण कसे घडवत आहोत ? प्रभू येशूचे प्रेम, विश्वास, दया, क्षमा, शेजारप्रीती, दानधर्म व प्रार्थना हे गुण आपण आपल्यामध्ये व आपल्या मुलांमध्ये विकसित करतो का ? प्रभू कार्यासाठी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करतो का ? थोडावेळ प्रभू सहवासात प्रभू येशूच्या हाकेला त्याच्या कार्याला माझा प्रतिसाद काय ह्यावर मनन करूया.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझी संतगणाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते तुझे  सुवार्ताकार्य करण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या