सामान्यकाळातील ३० वा सप्ताह
गुरुवार २७ ऑक्टोबर २०२२
तरी मला आज, उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे,
संत फ्रेमेन्शिअस
-महागुरू, वर्तनसाक्षी (३०८-३८०)
संपूर्ण विश्वाचे तारण व्हावे ह्या देवाने तयार केलेल्या योजनेला कोणतीही मानवी शक्ती आव्हान देऊ शकत नाही. देवाची योजना हमखास पूर्णत्वास जात असते.
प्रभू येशूने त्याच्या पुनरुत्थानाचे सुतोवाच्य केले मात्र येरुशलेमकडे पाहून त्यानी आंतरिक विलाप केला, कारण अनेक संदेष्ट्यांना धुडकावून लावणाऱ्या यरुशलेमवासीयांनी प्रभूला सुद्धा नाकारले होते. देव माणसाला त्याचे तारण विनामुल्य देणगी दाखल देत असतो, मात्र माणूस देवाच्या योजनेला प्रतिसाद देत नाही. देवाने आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे व त्यानूसार आलेल्या संधिचा योग्य तो उपभोग आपण करावा म्हणून सांगितले आहे. आपली श्रद्धा, आपली प्रार्थना व आपले प्रयत्न अपूरे पडतात का ? आपण जागतिक क्षणभंगूर जीवनात गुरफटले आहोत का ?
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस ६:१०-२०
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"वाईट दिवसात तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा."
प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्यांच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे आणि जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे म्हणून माझ्यासाठी विनवणी करा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४४:१-२,९-१०
प्रतिसाद : परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो.
१) परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो,
तो माझ्या हातांना लढायला शिकवतो.
माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.
२) तो माझा दयानिधी, माझा दुर्ग,
माझा गड, माझा मुक्तिदाता माझी ढाल आहे,
मी त्याचा आश्रय घेतो.
तो माझ्या प्रजाजनांना माझ्या अंकित करतो.
३) हे देवा, मी तुला नवे गीत गाईन,
दशतंतू वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.
तूच राजांना विजय देणारा आहेस,
तूच आपला सेवक दावीद
ह्याला मुक्त करणारा आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता
आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १३:३१-३५
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येरुशलेमाबाहेर सदेष्ट्यांचा नाश झाला असे व्हायचे नाही."
काही परुशी येऊन येशूला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जिवे मारायला पाहत आहे.” त्याने त्यांना म्हटले, त्या कोल्ह्याला जाऊन सांगा, पाहा, मी आज आणि उद्या भुते काढतो आणि रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन, तरी मला आज, उद्या आणि परवा पुढे गेले पाहिजे, कारण येरुशलेमाबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही. येरुशलेम, येरुशलेम, संदेष्ट्याचा घात करणाऱ्या आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलांबाळांना एकत्र करण्यांची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा तशी नव्हती. पाहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, परमेश्वराच्या नामाने येणारा तो धन्यवादित, असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक देवावर विश्वास ठेवणारे व दुसरे विश्वास न ठेवणारे. जे विश्वास ठेवतात त्यापैकी अनेकांना अजूनही खऱ्या देवाची ओळख झालेली नाही आणि म्हणूनच ते अन्य देव-देवतांच्या मागे जातात व खऱ्या देवाला विसरतात अथवा त्याला मानत नाहीत. असे लोक त्यांच्या गरजेनुसार व परिस्थितीनुसार देव बदलत असतात. त्यांचा विश्वास हा पोकळ असल्याने ते अनेक देवावर विश्वास ठेवतात. परंतु ज्यांना खऱ्या देवाची म्हणजे प्रभू येशूची ओळख होते ते कधीच त्याला सोडून देत नाहीत. अगदी प्राण गेला तरी सुद्धा. अशा लोकांच्या जीवनात कितीही वाईट प्रसंगआले संकटे आली तरी ते प्रभू येशूला व त्याच्या वरील असलेल्या विश्वासाला चिकटून राहातात. परंतु देवाच्या लोकांचा छळ करणारे, त्यांना जीवे मारून त्यांचा घात करणाऱ्या लोकांवर प्रभू येशू दुःख, विलाप प्रकट करतो. कारण ते देवापासून व त्याच्या वचनापासून दूर गेले होते. आजच्या जगात वावरताना जे देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्चेप्रमाणे जीवन जगतात त्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला, दुःखाला, संकटाला सामोरे जावे लागते. परंतु प्रभूसाठी सर्वकाही सहन करण्यासाठी जे तयार आहेत त्यांनी कशालाही न भिता नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे व सैतानाच्या मोहाला बळी न पडता देवावर विश्वास ठेवून शांती व नीतीने वागून नेहमी प्रार्थना आणि विनंती करीत जागृत राहावे कारण हे जग काळोखाचे म्हणजेच सैतानाच्या डावपेचांनी भरलेले आहे. अशा परिस्थितीत आपण कोणत्या देवाच्या मागे जातो? आपला देवावरील विश्वास आपण कशाप्रकारे इतरांना दर्शवतो ? आपल्या कुटुंबात प्रार्थनेला किती महत्त्व व वेळ देतो? थोडावेळ प्रभू सहवासात बसून आपल्या जीवनावर मनन चिंतन करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुजपासून मला विभक्त करणाऱ्या सर्व अनिष्ट
गोष्टींपासून माझा बचाव कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या