सामान्यकाळातील ३० वा सप्ताह
बुधवार २६ ऑक्टोबर २०२२
“अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.
संत एव्हरेस्ट
-परमगुरू, रक्तसाक्षी (.....१०५)
संत क्लेमेंट ह्या पोप महाशयांच्या मृत्यूनंतर एव्हरेस्ट ह्यांची पाचवे पोप म्हणून नेमणूक झाली. त्यांनी इ. स. ९७ ते १०५ दरम्यान ख्रिस्तमंडळाचे नेतृत्व केले. अंत्युखियामध्ये स्थायिक झालेल्या परंतु मूळच्या बेथलेहेम येथे असलेल्या एका यहुदी घराण्यात एव्हरेस्टचा जन्म झाला. त्याच्याविषयी फारच त्रोटक माहिती इतिहासात नोंदण्यात आलेली आहे.
सहाव्या शतकात "पोप महाशयांची यादी" या पुस्तकात लिहिण्यात आलेल्या
माहितीनुसार पोप एव्हरेस्ट ह्यांनी रोम शहराची २५ धर्मग्रामामध्ये विभागणी केली आणि प्रत्येक स्वतंत्र धर्मग्रामावर प्रत्येकी एक प्रमुख धर्मगुरू नेमला. “पोप महाशय जेव्हा अधिकृत परिपत्रकांची घोषणा करतात तेव्हा त्यांच्या आजूबाजूला देवाचा गौरव करण्यासाठी किमान सात डिकन (प्रसेवक) उपस्थित असावेत,” असाही नियम त्यांनी अंमलात आणला.
शेवटी त्यांनी चर्चच्या स्थापनेच्या आशीर्वादविधीची पुनर्रचना केली.
आतापर्यंत ख्रिस्ती चर्च आशीर्वाद विधी प्रेषितांकडून चालत आलेल्या शलमोनच्या यहुदी परंपरेनुसार केला जात होता. आता त्याला ख्रिस्ती स्वरूप देण्यात आले.
त्या विधीत पवित्र मिस्साला मुख्य स्थान देण्यात आले. ह्याच पोप महाशयांच्या
कारकीर्दीत एफसस येथे येशूचा जिवलग शिष्य शुभवर्तमानकार योहान ह्याला मृत्यू आला.
सर्वनाशाकडे घेऊन जाणारा मार्ग सोपा आहे व त्या दिशेचा दरवाजा खूप रुंद आहे, मात्र स्वर्गराज्याकडे जाणारा मार्ग जरी अडचणीचा व दरवाजा अरूंद असला तरी प्रभू येशू आपली वाट पाहत त्या दरवाजापाशी उभा आहे. आपण नेटाने प्रयत्न करणार ना ?
✝️
पहिले वाचन : इफिसकरांस ६:१-९
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"माणसांना खूष करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करत जा."
मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. “आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे आणि तू पृथ्वीवर दीर्घायू असावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत आणि शिक्षणात त्यांना वाढवा.
दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत भीत आणि कापत कापत सरळ अंतःकरणाने या जगातील धन्यांचे आज्ञापालन करत जा. माणसांना खूष करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा, कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येकजण, मग तो दास असो, किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४५:१०-१४
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या वचनाला जागतो.
१) हे परमेश्वरा, सर्व प्राणिमात्र तुझी स्तुती गातात,
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि
तुझा पराक्रम कथन करतात, ह्यासाठी की,
तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे
वैभवयुक्त ऐश्वर्य मानवजातीला कळावे.
२ ) तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे,
तुझ्या राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.
३ )परमेश्वर आपल्या वचनाला जागतो,
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो.
व वाकलेल्या सर्वांना उभे करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी
आमचे अंत:करण प्रफुल्लित कर.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १३:२२-३०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील."
येशू गावोगावी आणि खेडोपाडी शिक्षण देत देत येरुशलेमकडे चालला होता. तेव्हा कोणाएकाने त्याला म्हटले, "प्रभो, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय ?" तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, प्रभुजी, आम्हांसाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, तुम्ही कोठले आहा, हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्याबरोबर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो, सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा आब्राहाम, इसहाक, याकोब आणि सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले आणि आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तुम्ही रडाल व दातओठ खाल. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि जे शेवटले होतील असे काही पहिले आहेत.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या वाचनात संत पौल आपणास 'ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम' कसा असावा हे समजावून सांगतो. देवाच्या दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा म्हणजे 'आई बापाला मान दे' ह्यात मुलांचे कर्तव्य समजावून सांगताना आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांबरोबर प्रेमाने व आपुलकीने कसे वागावे हे समजावून सांगितले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा आहे. मात्र आजच्या स्वार्थी जगात जीवन जगताना आपल्याला त्याचा विसर पडतो. आपण आपल्याच जगात एवढे रमून राहातो की, स्वतःच्या आजूबाजूला काय होत आहे ह्याची देखील आपल्याला जाणीव नसते. अनेकदा आपण आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अनेकांना आपल्याद्वारे अन्याय, अत्याचार, छळ, दुःख व अमानुष वागणूक सहन करावी लागते. परंतु खरे ख्रिस्ती जीवन हे इतरांमध्ये आपण प्रभू येशूला पाहण्यात व त्यांना प्रेमाने वागणूक देण्यात आहे. त्यासाठी अनेकदा स्वार्थ त्याग करून प्रभू येशूच्या वचनानुसार अरूंद दरवाजाने प्रवेश करण्यासाठी आपल्यातील गर्व, अहंपणा, मी पणा हे सगळे दूर करणे गरजेचे आहे. आज आपल्या जीवनावर प्रकाश टाकूया व खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आणि स्वर्ग प्राप्तीसाठी मला काय केले पाहिजे ह्यावर चिंतन करूया.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझी वाणी ऐकण्यास व स्वर्गराज्याच्या दीशेने वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या