Marathi Bible Reading | Tuesday 25th October 2022 | 30th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३० वा सप्ताह  

मंगळवार २५ ऑक्टोबर २०२२

“देवाचे राज्य कशासारखे आहे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे,

 


संत क्रिस्पीन व क्रिस्पीनियन

- रक्तसाक्षी (३०४) ३०४

दुसऱ्या शतकाच्या मध्यंतरी रोम शहरातून फ्रान्समध्ये गॉल शहरात क्रिस्पीन आणि क्रिस्पीनियन हे दोघे बंधू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी येऊन पोहचले. खरे पाहता ते सरदार सेनापतींच्या खानदानी घराण्यात जन्मलेले होते.

गॉलमध्ये आल्यानंतर सोईसोन्स या ठिकाणी त्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि दिवसा जाहीरपणे ख्रिस्ताची सुवार्ता पसरू लागले. संत पौलप्रमाणे ते देखील रात्रीच्यावेळी वहाणा तयार करण्याचा चांभारकीचा धंदा करत. तेथील रहिवाश्यांच्या जीवनावर क्रिस्पीन बंधूंच्या प्रेमाचा, उदार मनाचा, त्यागी व विरक्त वृत्तीचा आणि साध्वी जीवनाचा पगडा बसला, त्यामुळे असंख्य लोकांनी तात्काळ ख्रिस्ती श्रद्धेला मिठी मारली.

गॉल या ठिकाणी त्याने अशा प्रकारे बरीच वर्षे सुवार्ता प्रसार केला परंतु एके दिवशी ही गोष्ट सम्राट मॅक्सिमियन ह्यांच्या कानावर गेली. क्रिस्पीन आणि क्रिस्पीनियन ह्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. क्रौर्याचा कळस समजली जाणारी शिक्षा देण्यात कुप्रसिद्ध असलेले रिक्टीयस वारूस ह्या ख्रिस्तद्वेषी माणसाच्या हाती त्यांना सोपविण्यात आले. त्यांना ठार मारण्यासाठी त्यांनी त्यांना नदीच्या खोल पात्रात फेकून दिले. उकळत्या तेलाच्या कढईत त्यांना ढकलून दिले परंतु पाणी किंवा अग्नी त्यांना नष्ट करू शकले नाहीत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतापर्यंत अशा प्राणघातक शिक्षेतून एकही गुन्हेगार सुखरूप बाहेर पडलेला नव्हता. क्रिस्पीन बंधूंच्या बाबतीत घडत असलेली अद्भूतकृत्ये पाहून रिक्टीयस वारूस हा क्रूरकर्मी इतका बिथरून गेला आणि निराश झाला की त्याने स्वतःस क्रिस्पीन बंधूसाठी तयार केलेल्या अग्नीत झोकून दिले.

ही गोष्ट राजा मॅक्सिमियन याला देखील हादरा देणारी होती. पुढचे आणखी काही बरेवाईट होण्याआधी त्यांचा काटा काढावा म्हणून त्यांचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.

चांभार, चामड्याची इतर कामे करणाऱ्यांचे हे दोघे आश्रयदाते संत मानले जातात. संत एलिझियुस (सण १ डिसें.) ह्यांनी त्यांच्या थडग्यावर तीर्थस्थान उभारले.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ५:२१-३३

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

 "ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्या संबधाने हे रहस्य मोठे आहे.'

ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टीत आपआपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळींवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नींवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की, तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र आणि निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कारण कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहो. “म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नींशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. " हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यासंबधाने बोलतो आहे. तथापि तुम्हांपैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : १२८:१-५
प्रतिसाद :   जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य ! 

१) जे परमेश्वराचे भय धरतात,
जे त्याच्याच मार्गाने चालतात ते धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.

२ )तु सुखी होशील, तुझे कल्याण होईल. 
तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ 
द्राक्षवेलीसारखी होईल, तुझ्या मेजासभोवती 
तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

३ )पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला 
असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून 
तुला तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो !


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे,
तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १३:१८-२१
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तो दाणा वाढून त्याचे झाड झाले.

येशू म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फाद्यांत राहू लागले .  तो आणखी म्हणाला, "मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ ? ते खमिरासारखे आहे, ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” त्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  प्रेम हा आपल्या घराचा व प्रत्येक नात्याचा पाया असेल तर ते नाते कधीच तुटत नाही. उलट ते दिवसेंदिवस वाढत जाते. विशेष म्हणजे पती व पत्नी ह्याचे परस्परांशी असलेले नाते पवित्र व अतूट असते कारण ते दोघेही विभक्त नसून एक शरीर व एक आत्मा असतो. म्हणूनच संत पौल त्या पवित्र प्रेमाचे उदाहरण देऊन ख्रिस्ताचे व ख्रिस्त सभेचे नाते स्पष्ट करीत आहे. त्या प्रेमाचा सन्मान व योग्य आदर करून पती व पत्नी जर जीवन जगले तर त्याच्या ह्या प्रेमांतून नवीन विश्वाची निर्मिती होते आणि ते पुढे वाढत जाते. जसे मोहरीचे छोटे बी रुजल्यानंतर त्याचे मोठ्या झाडात रूपांतर होते व आकाशातील पक्षी त्यावर वास्तव्य करतात. असे प्रेम जेथे असेल तेथे स्वर्ग निर्माण होतो. जसे पिठात खमीर घातले की ते पीठ वाढते तसेच पती व पत्नी ह्यांच्यातील नात्याला मायेचा, प्रेमाचा ओलावा मिळाला की, ते नेहमी वाढत जाते व अशा कुटुंबात देवाच्या आशीर्वादाने स्वर्ग निर्माण होतो. परंतु अनेक कुटुंबे आज उध्वस्त होत आहेत. कारण अनेक ठिकाणी प्रेमापेक्षा वस्तूंना व साधनांना जास्त महत्व दिले जाते. गरजेनुसार व्यक्तीचा व देवाचा वापर केला जातो. मी माझ्या कुटुंबात सर्वांशी कसे वागतो ? पती व पत्नी म्हणून आपले एकमेकांशी असलेले संबंध जिव्हाळ्याचे व प्रेमाचे आहेत की केवळ इतरांना दाखविण्यासाठी एकत्र राहतो ? देवापासून दूर राहून माझ्या कुटुंबात मला स्वर्ग कसा निर्माण करता येईल ? प्रभू कृपेसाठी त्याच्या जवळ जाऊन थोडावेळ त्याच्यासमवेत घालवू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या कुटुंबात तुझे राज्य येवो आणि त्याची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला कृपा लाभो, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या