Marathi Bible Reading | Monday24th October 2022 | 30th Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३० वा सप्ताह  

सोमवार २४ ऑक्टोबर २०२२

ही तर आब्राहामची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय ?





 संत अँथनी मेरी क्लॅरेट 

-महागुरू, वर्तनसाक्षी (१८०७-१८७०)
.


 प्रभू येशू ख्रिस्ताने एका १८ वर्षांपासून विकारग्रस्त महिलेला मुक्त केले. मात्र त्याबद्दल प्रार्थनालयाच्या अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करण्याऐवजी प्रभू येशूचा निषेध केला, व लोकांना सक्त ताकीद दिली की शब्बाथ दिवशी विकार मुक्त करणे अथवा बरे होणे गैर आहे. स्वतःला धर्माचे रक्षक समजणाऱ्यांना देवाची कृपा, देवाची दया व प्रेम समजलेलेच नसते ह्याचेच हे उदाहरण आहे.

देवाचे प्रेम, करुणा व सामर्थ्य प्रभू येशूच्या वाणीद्वारे व स्पर्शाद्वारे ओसंडून वाहत असते. त्याच्या कृपेच्या अखंडित वाहणाऱ्या झऱ्यामध्ये  आपल्याला सर्व विकार, आजार, दुष्टता व पापांपासून मुक्तता मिळते व आपले तारण होत असते. आरोग्यदान व मुक्तता मिळण्यासाठी देवाठायी कोणतीच  आडकाठी/अडथळा नाही. विशेष दिवस, वेळ, काळ हे देवासाठी नगण्य  आहेत, म्हणूनच प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्याने सर्वसमर्थ व शक्तीशाली  परमेश्वरावरील आपली श्रद्धा ढळू देऊ नये. प्रभू येशूच्या नावाने, वचनाद्वारे  आणि स्पर्शाद्वारे आज सुद्धा अनेक अद्भूत कृत्ये घडत आहेत.

✝️   

पहिले वाचन : इफिसकरांस ४:३२-५:८

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीती केली त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. "

तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताकरवी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.

तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हांवर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळाला म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्फळ गोष्टी आणि टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणासही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहा.
पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, कारण पूर्वी तुम्ही अंधःकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहा. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : १:१-६
प्रतिसाद :  देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.

१ )जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही 
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही 
आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, 
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, 
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

२) जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते.
जे आपल्याला हंगामी फळ देते. 
ज्याची पाने कोमेजत नाहीत. 
अशा झाडासारखा तो आहे आणि 
जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.

३) दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या 
भुशासारखे आहेत. कारण नीतिमानांचा 
मार्ग परमेश्वराला अवगत असतो, 
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.



जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, 
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून 
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १३:१०-१७
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"ही तर आब्राहामची कन्या आहे, शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय ?"

येशू शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती, ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले आणि म्हटले, "बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यात काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत. तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका." परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर आब्राहामची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय ?" तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  आज प्रभू येशू अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेल्या व सैतानाने बांधून ठेवलेल्या एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो. प्रभू येशूने नेहमी समाजातील रितीरिवाज व नियम ह्या पेक्षा मानवी सेवा कार्याला जास्त महत्व दिले. असे असले तरी त्याने आपले कार्य करताना समाजातील नियमांचे व रितीरिवाज ह्यांचे पूर्णपणे पालन केले. तसेच त्या नियमांना नवीन अर्थ दिला. जेणेकरून समाजाच्या कल्याणाबरोबर सामान्य माणसाचे कल्याण होईल. अशाच सामान्य लोकांच्या रोजच्या दिनचर्याचे काही नियम संत पौल आपणांस देत आहे. ज्यांच्या अनुकरणाने आपण प्रकाशाची म्हणजेच परमेश्वराची लेकरे बनून सैतानाच्या कोणत्याही बंधनात अडकून पडणार नाहीत. परंतु जेव्हा आपण केवळ स्वतःच्याच जीवनाचा विचार करतो व आपल्या मनाप्रमाणे जीवन जगून इतरांना त्रास देतो अथवा अन्याय करतो व प्रसंगी आपण नावे ठेवतो. अशा परिस्थितीत आपण प्रभू येशूपासून दूर जातो व | सैतानाच्या बंधनात अडकतो. आज आपण प्रभू येशूच्या वचनावर नम्रपणे व पूर्ण विश्वासाने मनन करू या व आपल्याला नेहमी देवाची चांगली मुले कसे बनता येईल ह्यावर विचार करू या.

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व विकारांपासून आम्हाला मुक्त कर, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या