Marathi Bible Reading | Sunday 23th October 2022 |30th Sunday In Ordinary Time |

सामान्यकाळातील ३० वा  रविवार 

२३ ऑक्टोबर   २०२२




कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."

विनयशील माणसाचे अंत:करण नम्र असते, असा  माणूस संवेदनशील असतो व त्याला इतरांसंबंधी कळकळ असते. म्हणून अशा माणसाची प्रार्थना देवाला प्रिय वाटते. प्रभू येशूने म्हटले आहे, “जे सौम्य ते  धन्य” आपणसुद्धा नम्रपणे विधात्यासमोर प्रार्थना करावी.

प्रभू येशू परुशी व जकातदार ह्यांचे उदाहरण सर्वांसमोर ठेवित आहे. दोघेही देवाच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आलेले होते. परुशी अहंकारी व गर्विष्ठ होता. स्वतःच्या धार्मिकतेवर त्याला अभिमान होता. आपण कसे धार्मिक व नीतिमान आहोत हे तो आपल्या प्रार्थनेद्वारे सांगत होता. त्याचबरोबर त्याच मंदिरात असलेल्या इतरांपेक्षा मी अधिक चांगला असल्याचा तो देखावा करीत आहे. जकातदार मात्र नतमस्तक व नम्र बनून  देवाकडे केवळ एकच प्रार्थना करतो की, “हे देवा, मज पाप्यावर दया कर."
परमेश्वर आपले धन, आपली प्रतिष्ठा व वैभव पाहत नाही किंवा किती मोठा दानधर्म केला ते पाहत नसून आपले विनयशील व नम्र अंत:करण पाहतो.

 प्रभूच्या चरणाशी नतमस्तक होऊ या. रिक्त अंतःकरणाने त्याला शरण जाऊ  या. पश्चातापी अंत:करणाने आपण प्रभूठायी दयेची याचना करू या. ख्रिस्तसभा आज मिशन रविवार साजरा करीत आहे.
✝️   
पहिले वाचन :बेनसिरा ३५:१२-१४.१६-१८ 
वाचक : बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

 "दीनजनांची प्रार्थना ढगांच्या पार जाते. '

प्रभू न्यायाधीश आहे आणि त्याच्याकडे भेदभाव नाही. 
गरीब माणसाच्या बाबतीत तो आपले-परके करत नाही. 
ज्यावर अन्याय झाला त्याची प्रार्थना तो ऐकतो. 
अनाथाच्या मागणीकडे किंवा विधवेच्या करुण कहाणीकडे तो दुर्लक्ष करत नाही. ज्याची सेवा प्रभूला आवडते त्याचा स्वीकार होईल आणि त्यांची प्रार्थना ढगांकडे जाईल. 
दीनजनांची प्रार्थना ढगापार जाईल आणि प्रभूने ती ऐकेपर्यंत त्यांचे समाधान होणार नाही. 
परात्पर त्याच्याकडे लक्ष पुरवीपर्यंत ती थांबणार नाही. 
नीतिमानांना न्याय मिळेपर्यंत आणि न्यायाची अमंलबजावणी होईपर्यंत तो थांबणार नाही आणि प्रभू उशीर लावणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ३४:२-३, १६.१८, १९-२३

प्रतिसाद :  ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने
तो ऐकला

१) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन, 
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. 
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील. 
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.

२ )वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू 
नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो..
 नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर 
त्यांना त्यांच्या संकटातून मुक्त करतो.

३) परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो, 
अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. 
त्याचा आश्रय घेणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.

दुसरे वाचन  २ तिमथी  ४:६-८,१६-१८
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
 
"माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकूट ठेवला आहे. "

आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे. धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल.
माझ्या पहिल्या जबानीच्या वेळेस माझ्या बाजूचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते. ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, 
जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना 
त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 
आलेलुया!

शुभवर्तमान  लूक १८:९-१४
वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
"जकातदार नीतिमान ठरला आणि घरी गेला, पण परूशी नाही."

आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते त्यांनाही येशूने दाखला सांगितला, “एक परूशी आणि एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यासाठी वर मंदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वतःशी प्रार्थना केली: "हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.” जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपले ऊर बडवीत म्हणाला, 'हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.' मी तुम्हांला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरला व आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंचावतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंचावला जाईल."

लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

चिंतन :  प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि या शुद्ध हृदयाने तुम्हांला सर्वत्र परमेश्वराचे दर्शन घडेल.” - धन्यवादित मदर तेरेजा. आजची वाचने प्रार्थनेत नम्रभाव किती महत्वाचा आहे त्यावर प्रकाश टाकतात. 
अ. विनयशील प्रार्थना मेघांना छेदून जाते : आजच्या पहिल्या वाचनात आपल्या शिष्यपरिवाराला मार्गदर्शन करताना बेनसिरा त्यांना प्रार्थनेतील विनम्रतेचे महत्व पटवून देतो. अशी नम्रता केवळ प्रार्थनामय वातावरणापुरती मर्यादित राहात नाही तर ती दिवसभराच्या आचार-विचारांतून ठिबकत राहते. भीती, चिंता, अनिश्चिती ह्यांच्या मेघांना छेदून पार जाते. 
ब. नम्र माणसाची शक्ती त्याच्या प्रार्थनेमध्ये असते : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तीमथ्यापुढे आपले मन मोकळे करतो. एखादे युद्ध लढावे, एखाद्या शर्यतीत भाग घ्यावा. एखाद्या सिंहाच्या जबड्यात अडकून पडावे तशी पॉलची स्थिती झालेली होती. परंतु सर्वांनी सोडून दिलेले असताना साक्षात परमेश्वर आपल्याला त्याच्या तळहातावर झेलत असल्याचा अनुभव त्याने घेतला. जे मानवी डोळ्यांना अशक्यप्राय वाटते ते नम्र माणसाकरवी परमेश्वर करून दाखवितो. 
क. नम्र माणसाला आपल्या मर्यादांची जाणीव असल्यामुळे तो परमेश्वराच्या दयेवर विसंबून राहतो : आजच्या शुभवर्तमानात येशू परुशी आणि जकातदार ह्यांचा दाखला देतो. परुश्यांची भिस्त स्वतःच्या कर्तृत्वावर होती. आपल्या तथाकथित नीतिमत्तेची त्याला एवढी धुंदी चढलेली होती की तो इतरांना स्वतःपेक्षा तुच्छ मानीत होता. जकातदाराला तर आपल्या अपात्रतेची एवढी जाणीव होती की तो दृष्टी वर करू इच्छित नव्हता. त्याचे ऊर बडविणे अस्सल नम्रतेचे प्रतीक होय. त्याने एका ओळीत केलेली टीचभर प्रार्थना परुश्यांच्या ढीगभर शब्दांपेक्षा प्रभावी ठरली. या मिशन रविवारी मिशनसाठी प्रार्थना करू या.

आत्मपरीक्षण : प्रार्थना करीत असताना माझे लक्ष कोणाकडे असते ? देवाकडे, स्वतःकडे की| इतरांकडे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, विनयशील व नम्रपणे तुझ्या वेदीसमोर येण्यास व । पश्चात्तापी अंत:करणाने प्रार्थना करण्यास प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या