Marathi Bible Reading | Fourth Sunday of Advent | 18th December 2022


आगमनकाळातील चौथा  रविवार  

१८ डिसेंबर  २०२२

   “कुमारी गर्भवती होईल. तिला मुलगा होईल. त्याला इम्मानुएल म्हणजे 'आमच्यासह देव ' असे नाव पडेल."




शांती    (Peace ) 

तो स्वर्गीय  शांती  घेऊन प्रभू येशू येत आहे


देवाची तारण दायी योजना अमलात आण्यासाठी त्याने माणसांची निवड केलेली आपण बायबलमध्ये पाहतो.
देव विश्वसनीय आहे. देवाचे वचन विश्वसनीय आहे. देव आपल्या योजना आमलात आणतोच परंतु  त्यासाठी देवाला माणसाच्या प्रतिसादाची गरज असते. तारणाच्या इतिहासात देवाने अनेक महान नेते, राजे, शास्ते, संदेष्ट्ये आणि भविष्यवादी निवडले होते, त्याचप्रमाणे देवाने अनेक स्त्रियांची सुद्धा निवड करुन आपली योजना प्रगती पथावर नेली. शेवटी ध. कु. मरियेची निवड करुन तारणारा जगात पाठविला.

देव आपल्याला त्याची योजना अमलात आणण्यासाठी साद घालित असतो. संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगत आहे, 'तुम्हांला येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. आपण देवाच्या सुवार्ता कार्यचे साक्षीदार बनण्यासाठी प्रभू कडे प्रेरणा मागू या.

✝️   

पहिले वाचन :  यशया ७:१०-१४

वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
"पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल."

परमेश्वर आहाजाला म्हणाला, "तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो." आहाज म्हणाला, "मी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही." तेव्हा तो म्हणाला, “हे दावीदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐकः तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? यास्तव प्रभू स्वतः तुम्हांला चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासह देव) असे ठेवील."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : २४:१ - २, ३ - ४अब, ५-६

प्रतिसाद :  आपण प्रभूचे स्वागत करू या 

१) ही धरती प्रभूची आहे.
इथले सारे काही त्याचेच आहे; 
हे जग आणि इथे राहणारे सारेदेखील त्याचेच आहेत 
त्यानेच तर सागरांवर तिचा पाया घातला, 
भूमिगत जलाशयांवर तिची स्थापना केली.

२) प्रभूच्या पर्वतावर कोण चढेल ? 
त्याच्या पवित्र क्षेत्रात कोण उभा राहील ? 
ज्याचे हात निष्कलंक आणि अंत:करण शुद्ध आहे,
 ज्याचे मन असत्याचा मागे धावत नाही तोच.

३) त्याला प्रभूकडून आशीर्वाद प्राप्त होईल 
उद्धारकर्त्या देवाकडून न्याय मिळेल. 
असेच लोक त्याला शरण येतात. 
याकोबच्या देवाचे दर्शन घेऊ इच्छिणारे ते हेच

दुसरे वाचन :पौलाचे रोमकरांस पत्र  १:१-७

वाचक : पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

 “परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त हा दावीद वंशात जन्मला.”

पवित्रजन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या शुभवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून : ह्या शुभवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्याच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही शुभवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृताच्या पुनरुत्थानाद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषितपद मिळाले. अशासाठी त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहा. त्या तुम्हांला देव जो आपला पिता आणि येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
“पाहा, कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.” (ह्या नावाचा अर्थ, 'देव आमच्यासह आहे')
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १:१८-२४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"दावीदचा पुत्र योसेफ ह्याच्याशी वाग्दत्त झालेल्या मरियेपासून येशूचा जन्म होईल "

येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली : त्याची आई मरिया हिचा योसेफशी वाड्-निश्चय झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच, पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वाङ् निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला “दावीदपुत्र, योसेफ, आपली बायको म्हणून मरियेचा स्वीकार करायला मागेपुढे पाहू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोचआपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.
या घटना घटण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्ट्यामार्फत वदवले होते, “कुमारी गर्भवती होईल. तिला मुलगा होईल. त्याला इम्मानुएल म्हणजे 'आमच्यासह देव ' असे नाव पडेल."
मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :१७ डिसेंबरपासून आपण आगमन काळातील दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. या टप्प्यात आपण येशूजन्माच्या महोत्सवाची पूर्वतयारी करीत असतो. आजची वाचने | आपल्यासमोर भाकित, पूर्तता आणि नवजीवन अशा तीन पायऱ्या सादर करतात  
अ. संदेष्ट्याकरवी परमेश्वर त्याच्या भक्तांना आपल्या आगमनाची पूर्वसूचना देतो : युद्ध अटळ आहे याची जाणीव झाल्यावर इस्राएलचा राजा आहाज ह्याने संदेष्टा यशया याचा संदेश मनावर घेतला नाही. त्याने सिरियाशी दोस्ती करून बलाढ्य असिरियाशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचा पराभव झाला. मानवी तर्कविर्तकाला दैवी शहाणपणाची जोड नसली तर ते तर्कवितर्क साफ चुकीचे ठरू शकतात. ब.ईश्वराच्या पुढाकाराने संदेष्ट्याचे भाकित पूर्णत्वास जाते : यशयाने केलेले भाकित शेवटी प्रभू येशू व पवित्र मरिया त्यांच्याठायी कसे पूर्णत्वास जाणार आहे त्याचा खुलासा देवदूत संत योसेफाला करून देतो. इथे योसेफ आहाजाप्रमाणे आपल्याच तर्क वितर्कांवर अवलंबून राहात नाही तर त्वरीत देवाची योजना स्वीकारितो. क. नवजीवनाची सुरूवात नम्रतेच्या पायरीवर होत असते: संत पौल रोमच्या लोकांना जाणीव करून देतो की, पवित्र जन होण्यासाठी परमेश्वराने त्यांना बोलावलेले आहे. त्याला स्वतःच्या प्रेषितपदाची जाणीव आहेच. ह्या सगळ्या कृपादानांमुळे आपण ऊतून किंवा मातून न जाता नम्रपणे परमेश्वराच्या कृपेवर विसंबून आपण जीवन जगत राहावे असे तो सुचवितो. त्यातच नवजीवनाचे गमक दडलेले आहे अशी त्यांची धारणा आहे.

आत्मपरीक्षण : संदेष्ट्याचे वचन, परमेश्वराची कृपा आणि देवदूताचे स्पष्टीकरण माझ्या जीवनातील कोणकोणत्या क्षेत्रांत दिसून येते ? त्याद्वारे मी येशूच्या जन्मोत्सवाची तयारी कशाप्रकारे करू शकेन ?

प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या तारणादायी योजनेत सहभागी होऊन, तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हांला धैर्य व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या