Marathi Bible Reading | Monday 19th December 2022 | 4th week of Advent

आगमनकाळातील चौथा  सप्ताह   

सोमवार १९ डिसेंबर  २०२२

"तुझी पत्नी अलिशबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव 'योहान' ठेव.
✝️


संत नेमेसिअन ह्यांचा सण 
(रक्तसाक्षी)


जखऱ्या व आलीशिबा ह्या वयातीत जोडप्याला देवाने महान आशीर्वाद दिला व तारण योजनेचा भक्कम पाया रचला. जखऱ्या, एक भक्तीमान, श्रद्धावान आणि देवाची सेवा करणारा दास होता,  देवाने जखऱ्याला पवित्र स्थानावर दर्शन देऊन म्हटले, 'जखऱ्या तुझी पत्नी  अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल.' जखऱ्या भयभीत झाला व विश्वास ठेवेनासा झाला मात्र देवाचा आशीर्वाद आणि देवाचे वचन कधीच विफल होत नाही. म्हातारपणी अलीशिबेला दिवस गेले आणि योहान बाप्तिस्ता जन्माला आला. पवित्र शास्त्रामध्ये आब्राहाम व सारा ह्यांना सुध्दा म्हातारपणी अपत्य प्राप्ती झाली व इसाहाक जन्माला आला. शमशोनाचा जन्मपण देवाच्या वचना प्रमाणे झाला आणि योहानाचा जन्मसुध्दा दैवी योजनेनुसारच झाला.

देवावरील अतूट श्रद्धा आणि देवाच्या आज्ञांचे पालन ह्यामुळे देवाचे वचन आपल्या जीवनात पूर्णत्वास येते. आपल्या सर्वांच्या जीवनात देवाचे वचन सक्रीय व फलदायी बनावे म्हणून प्रार्थना करु या.


पहिले वाचन : शास्ते १३:२-७,२४-२५

वाचक :  शास्ते  या पुस्तकातून घेतलेले वाचन

सरा गावी दानवंशातला मनोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, “पाहा, तू वांझ असून तुला मुलबाळ झाले नाही. पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नको, कारण जन्मापासून तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्राएलाला पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.” त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, "एक देवमाणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अतिगौरवशाली होते. पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही आणि त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, “पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, ह्यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपरयंत देवाचा नाजीर राहील." पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला. आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा आणि अष्टावोल ह्याच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ७१:३:६,१६-१७

प्रतिसाद : प्रभु, तुझे स्तवन साऱ्या दिवसभर माझ्या तोंडी असते.

१) माझा आधारस्तंभ हो.

तिथेच मला सदैव थारा मिळेल. 

तूच माझ्याभोवती संरक्षक तट आहेस. 

निर्दयी लोकांच्या तावडीतून माझी सुटका कर.


२)हे माझ्या प्रभू, तू माझी आशा आहेस. 

हे प्रभुराया, बाळपणापासून तुझ्यावरच माझा भरवसा आहे. 

जन्मापासूनच तुझ्यावर माझा हवाला आहे. 

मातेच्या उदरातून आल्यापासून माझा संरक्षणकर्ता तूच आहेस.


३) हे प्रभुराया, मी तुझ्या महान कार्याचे गुण गाईन. 

केवळ तुझीच न्यायप्रियता जाहीर करीन. 

हे देवा, लहानपणापासून तू मला शिकवत आला आहेस 

आणि आजवर मी तुझी अलौकिक कृत्ये जाहीर करीत आलो आहे.

जयगोष                                                                       

आलेलूया,आलेलूया !

लोकांना निशाणी म्हणून नेमलेल्या इशायच्या मुला , ये आणि आता आमचे तारण कर, विलंब करू नकोस.

आलेलूया !

शुभवर्तमान 

लूक  १:५-२५

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा याजक होता. त्याची पत्नी अहरोनच्या कुळातील असून तिचे नाव अलिशबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा आणि विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. उभयता वयातीतही झाली होती. 

एकदा जखऱ्या आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आलेले याजकाचे काम करीत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ आणि भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, "जखऱ्या , भिऊ नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव 'योहान' ठेव.

त्याच्या जन्माने तुला आनंद होईल आणि उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील.

कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, तो द्राक्षरस आणि मद्दय  कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल.

तो इस्राएलच्या संतानांतील पुष्कळांना त्याचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. बापांची अंत:करणे मुलांकडे आणि आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल."

तेव्हा जखऱ्या देवदूताला म्हणाला, "हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे आणि माझी पत्नीही वयातीत आहे." देवदूताने त्याला उत्तर दिले, "मी देवासमोर उभा राहणार आहे आणि तुझ्याबरोबर बोलायला व ही सुवार्ता तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही. कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाही." इकडे लोक जखऱ्याची वाट पहात होते आणि त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले. तो त्यांस खुणा करीत होता आणि तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.

त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतात राहिली ती म्हणत असे की, "प्रभूने माझ्याकडे पाहिले आणि लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी असे केले."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात याजक जखऱ्याचा उल्लेख केला आहे. म्हातारपणात त्याला मुलगा झाला. त्याच्या मुलाचे नाव योहान बाप्तिस्ता होते. जखऱ्याचा मुलगा या नात्याने योहान बाप्तिस्ताची सुद्धा याजक वर्गात गणणा केली जाते. मंदिराएवजी तो वाळवंटात यार्देनच्या काठी देवराज्याची घोषणा करत असे. तो लोकांना पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रवृत्त करत होता. विखुरलेल्या प्रजेला पुन्हा एकत्र गोळा करण्याचा त्याचा मुख्य उद्देश होता. म्हणून तो ख्रिस्ताचा अग्रदूत म्हणून ओळखला जातो. ख्रिस्ताचा सुद्धा जगात वस्ती करायचा मुख्य उद्देश देवराज्याची स्थापना करणे हा होता. दाविद राजाप्रमाणे विखुरलेल्या प्रजेला गोळा करणे. ख्रिस्त नवीन दाविद राजा आहे कारण दाविद राजा जे पूर्ण करू शकला नाही ते कार्य ख्रिस्त सिद्धीस आणतो. परमेश्वराने त्याची तारणाची योजना संपुष्टात आणण्यासाठी योहान बाप्तिस्ताचा उपयोग केला. आपल्या जीवनात परमेश्वराच्या योजना सिद्धीस आणण्यासाठी तो कोणाचा उपयोग करतो ?

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या