Marathi Bible Reading | Tuesday 6th December 2022 | 2nd week of Advent

आगमनकाळातील दुसरा  सप्ताह   

मंगळवार ६ डिसेंबर  २०२२

या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही.”



बारीचे संत निकोलस
महागुरू, वर्तनसाक्षी (--- ३५०)
✝️

आशिया मायनर येथील मायरा ह्या धर्मप्रांताचे ते महागुरू होते. ख्रिस्मस काळामध्ये सांता क्लॉस किंवा नाताळबाबाची जी परंपरा ख्रिस्तसभेमध्ये सध्या प्रचलित आहे त्याचा संबंध ह्याच संत निकोलसशी आहे.
पवित्र नगरी येरूशलेम येथून तीर्थयात्रेवरून परतत असताना ते मायरा येथे आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चर्चमध्ये गेले. योगायोगाने त्या धर्मप्रांताचे महागुरूस्वामी नुकतेच मरण पावले होते आणि स्थानिक धर्मगुरूंनी असे आपसात ठरविले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी देवळात प्रवेश करणाऱ्या पहिल्या पुरुषाला नवीन महागुरू म्हणून घोषित करावयाचे. अशा प्रकारे निकोलसच्या गळ्यांत महागुरूपदाची माळ आपोआपच पडली.
डायक्लेशियन सम्राटाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा जो छळ झाला त्यावेळी संत निकलस ह्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. परंतु ३१३ साली कॉन्स्टन्टाईन राजाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला व “यथा राजा तथा प्रजा” म्हणून त्याने ख्रिस्ती धर्म आपल्या संपूर्ण साम्राज्यात पसरावा असेही जाहीर केले. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. कॉन्स्टन्टाईन राजाने सर्व ख्रिस्ती लोकांना खास सवलती जाहीर केल्या व तुरुंगातील कैद्यांना ताबडतोब मुक्त केले. त्यामुळे संत निकोलसचा तुरुंगवास तात्काळ संपला. एक महागुरू ह्या नात्याने त्यांनी लागलीच ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये सहभाग घेतला.
• देवाने संत निकोलस ह्याच्याद्वारे अनेक अद्भुत चमत्कार घडवून आणले. मुलांसाठी असलेले त्याचे प्रेम आणि गोरगरिबांविषयी त्याला वाटणारी काळजी हा पुढे वाक्प्रचार व सुभाषितांचा विषय बनला. गरिबांवर व लहान मुलांवर त्याचे प्रेम होते (त्याचे परोपकारकार्य मात्र गोपनीय होते). कसे ते पुढील घटनेवरून दिसून येते.
एकदा एका कुटुंबातील तीन मुली उपवर झाल्या होत्या; परंतु त्यांच्या लग्नासाठी  बापाजवळ पैसा नव्हता. त्यात हुंड्याचा प्रश्न तर अक्षरश: आ वासून त्या बापासमोर उभा राहिला. पहिल्या मुलीच्या लग्नावेळी वधुपित्याला आपल्या घरात कोणीतरी सोन्या-नाण्यांनी भरलेली थैली टाकल्याचे आढळून आले. त्याने गुपचूप विवाहसमारंभ उरकून घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या मुलीच्या लग्नावेळीदेखील हीच घटना घडली. मात्र तिसऱ्या लग्नाच्या वेळी हे दयाकृत्य संत निकोलस ह्यांचे होते हे सत्य लपू शकले नाही.
ह्या घटनेवरून मायराचे लोक त्याच्या जन्म दिवसाची स्मृती साजरी करताना आदल्या दिवसाच्या रात्री आपल्या मुलांसाठी घरामध्ये बक्षिसांचा पुडा ठेवून देत आणि सकाळी उठल्यावर मुलांना सांगत की, रात्री संत निकोलस येऊन तुमच्यासाठी 'गिफ्ट' (भेटवस्तू) देऊन गेले. पुढे ही प्रथा नाताळच्या मध्यरात्री म्हणजे प्रभू येशूच्या जन्म दिनाच्या रात्री पाळण्यात येऊ लागली आणि संत निकोलसचे नाव जगभर सांता क्लॉस किंवा ख्रिस्मसबाबा म्हणून प्रसिद्ध झाले.
युरोपमधल्या काही भागात मात्र, उदा. ऑस्ट्रिया सारख्या देशातील कॅथोलिक भागांमध्ये चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना ६ डिसेंबर रोजी खास भेटवस्तू दिली जाते आणि वाईट वागणूक असलेल्या खोडकर मुलांना कोळशाचा तुकडा आणि विजेचे बटण दिले जाते. तुझ्या जीवनातील काळा डाग सद्गुणाच्या प्रकाशाने उजळून काढ असा सल्लाही त्याला दिला जातो.
दक्षिण इटलीतील बारी ह्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांनी संत निकोलस
ह्यांचे अवशेष आणले आणि आजपर्यंत ते तेथे असल्याचे आढळते. त्या अवशेषांमध्ये आजारमुक्तीचे सामर्थ्य आहे. त्याच्या सणाच्या दिवशी संत निकोलस ह्यांची इमाज बोटीद्वारे समुद्रात नेली जाते आणि मिरवणुकीने रात्री विजेच्या झगमगाटात पुन्हा देवळात आणली जाते. हा सोहळा मोठ्या थाटा-माटात आजही साजरा केला जातो.
संत निकोलस हा जहाजचालक आणि प्रवाशांचा आश्रयदाता संत मानला जातो. त्यामुळे तो समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या लोकांमध्ये अधिक लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. निरपराध आणि चुकलेल्यांचाही संरक्षक आहे. तसाच तो सर्व मुलांचाही आवडता संत आहे. शिवाय तो रशिया, ग्रीस, सिसिली, लॉरेन, लाईम्रीक आणि नेपल्स ह्या देशांचा आश्रयदाता आहे.

हा आगमनकाळ म्हणजे देवाने पुन्हा एकदा त्याच्या सहवासात येण्यासाठी दिलेली संधी आहे. आपण स्वत:साठी तसेच इतरांसाठी प्रार्थना करु या आणि प्रभूचे अंत:करणापासून स्वागत करु या.
✝️   

पहिले वाचन : यशया ४०:१-११
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"परमेश्वर आपल्या लोकांचे सांत्वन करील." तुमचा देव म्हणतो,

“सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, येरुशलेमच्या लोकांना धीर द्या. त्यांना म्हणा तुमचे कष्टाचे दिवस आता संपले आहेत. तुमच्या दुष्कर्माचे प्रायश्चित्त झाले आहे. प्रभूकडून तुमच्या सगळ्या पापांबद्दल तुम्हाला पुरेपूर शिक्षा मिळून चुकली आहे.”
ऐका, कुणी ओरडून सांगत आहे : “रानावनातून प्रभूसाठी रस्ता तयार करा, आमच्या देवासाठी अरण्यातून सरळ राजमार्ग बनवा. दऱ्याखोऱ्यात भराव टाका आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी भुईसपाट करा. उंचसखल जमीन सपाट करा आणि ओबडधोबड जमीन गुळगुळीत करा, म्हणजे प्रभूचे वैभव प्रकट होईल आणि सारी मानवजात मिळून ते पाहील."
ही प्रभूच्या तोंडची वाणी आहे. “घोषणा कर," अशी वाणी झाली. तेव्हा मी म्हणालो, “काय घोषणा करू ?"
“मानवजात म्हणजे गवत, तिचे सौंदर्य म्हणजे वनातल्या रानफुलाचे सौंदर्य. गवत सुकते, फूल कोमेजते. कारण प्रभूची फुंकर त्याच्यावर पडते. खरेच मानव म्हणजे गवतच. गवत सुकते, फूल कोमेजते, परंतु आमच्या देवाचा शब्द चिरकाल टिकतो.”
हे सियोनासाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, उंच पर्वतावर चढ. हे येरुशलेमसाठी शुभसंदेश आणणाऱ्या जासुदा, मोठ्याने बोल. भिऊ नको, आपला आवाज चढव. यहुदाच्या नगरांना सांग, "हा पहा तुमचा देव.” आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभूदेव येत आहे. बघा, त्याच्या हातात सत्ता आहे. त्याच्या कमानी म्हणजे त्याने मुक्त केलेले लोक तो घेऊन येत आहे.
तो त्यांना देणार असलेले पारितोषिक त्याच्याबरोबर आहे. एखाद्या मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपाचा प्रतिपाळ करील. लहान कोकरांना तो वेंगेत उचलून घेईल आणि दूध पाजणाऱ्या मेंढ्यांना सांभाळून नेईल.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र :९६:१-३,१०-१३
प्रतिसाद :   आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत प्रभुदेव येत आहे.

१ एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. 
पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा.
प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नामाचा धन्यवाद गा. 
त्याने केलेल्या उद्धाराची दिवसेंदिवस घोषणा करा.

२ देशोदेशी त्याचा महिमा वर्ण 
साऱ्या मानवजातीला त्याची 
अलौकिक कृत्ये जाहीर करा. 
सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, 
प्रभू राजा आहे. 
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.

३ आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो. 
समुद्र आणि त्यातले प्राणी गर्जना करोत. 
मळे आणि त्यातले सगळे मग
 वनातले सारे वृक्ष खूश होवोत. 
प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील 

४ कारण तो येणार आहे. 
पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे. 
तो सात्त्विकतेने जगाचा न्याय करील. 
मानवजातीचा यथार्थ न्याय करील.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
प्रभो, ये, उशीर लावू नकोस आपल्या लोकांना क्षमादान दे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय १८:१२-१४
वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला काय वाटते? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले तर बाकीची नव्याण्णव डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधत फिरत नाही काय? मी तुम्हाला खरेच सांगतो, ते सापडले की, न चुकलेल्या नव्याण्णव मेंढराबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आनंद त्याला होतो. त्याचप्रमाणे या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : इस्त्रायली लोकांनी मुर्तिपूजा केली. ते परमेश्वराबरोबर एकनिष्ठ राहिले नाही. म्हणून परमेश्वराने त्यांना शासन केले. स्थलांतरामुळे ते बरेच काही गमावून बसले. उदाहरणार्थ, त्यांची मातृभूमी, स्वातंत्र्य, सन्मान, संप्रदाय आणि मुख्य म्हणजे जेरूसलेम मंदिर. त्यांच्या अभिमानाचे चिन्ह आणि ओळख. हद्दपारीत त्यांना असंख्य दुःखाना तोंड द्यावे लागले. परंतु जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आपण आशेचा दीपक प्रज्वलीत ठेवतो तोपर्यंत कुठलेच दुःख किंवा अरिष्ट आपल्याला निराशावादी करू शकणार नाही. आशेचा किरण तेवत ठेवण्यासाठी आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा त्यांचे सांत्वन करून सांगतो की, पश्चात्तापामुळे त्यांचे वाईट दिवस संपुष्टात येणार आहेत. कारण त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे. शुभवर्तमान आपल्याला शाश्वती देते की, ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्या खेड्यात, शेतमळ्यात आणि नगरात वस्ती करतो. तो आपल्या अद्भूत सामर्थ्याने लहान आणि दुर्बळांचे रक्षण करून त्यांना जपणार. संकटकाळी ख्रिस्तावर आपली श्रद्धा दृढ करण्यासाठी प्रार्थना करुया.

प्रार्थना : हे प्रभू येशू, मी अपात्र असतांना देखिल तू मला नवजीवनाची संधी देतोस त्याबद्दलमी तुझे मनापासून आभार मानतो, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या