आगमनकाळातील दुसरा सप्ताह
बुधवार ७ डिसेंबर २०२२
हो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहाणाऱ्यांनो माझ्याकडे या मी तुम्हांला विसावा देईन
संत अंब्रोज
महागुरू, धर्मपाल, धर्मपंडित, वर्तनसाक्षी (३४०-३९७)
✝️
गल्लीया या प्रांतात ज्यावेळी गॉल, ब्रिटन आणि स्पेन ह्या देशांचा समावेश होता त्यावेळी गल्लियाचा प्रमुख असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीच्या घरी अंब्रोज ह्याचा जन्म झाला. तेव्हा हे प्रमुखपद म्हणजे सरकारी दरबारातील सर्वोत्कृष्ट जागा होती. अशा उच्चपदस्थाच्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे अंब्रोजचे बालपण खूप सुखासमाधानात गेले.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अंब्रोजचे संपूर्ण कुटुंब रोम शहरात परतले आणि तेथील शालेय महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर अंब्रोजने कायद्याचा अभ्यास आरंभिला. त्याची कुवत आणि बुद्धिमत्ता पाहून राजा देखील प्रभावित झाला. वयाच्या ३३ व्या वर्षी सम्राटाने त्याला उत्तर इटलीचा गव्हर्नर राज्यपाल नेमले.
इथे असताना अंब्रोजने कनवाळू वृत्तीने, हळूवारपणाने आणि सुव्यवस्थित न्यायप्रदानाद्वारे मिलानच्या लोकांची मने जिंकली. जेव्हा मिलानमधील एरियनवादी पाखंड वृत्तीचे बिशप मरण पावले आणि कर्मकांडाला महत्त्व देणाऱ्या ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांमध्ये व त्याच्या अनुयायांमध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या पदावरून वाद निर्माण झाला, अशावेळी अंब्रोजने आपला अधिकार वापरून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळविले व लोकांसमोर खणखणीत आवाजात एक भाषण केले. त्याने प्रभावित होऊन अचानक जमावातील एका छोट्या मुलाने आवाज दिला “बिशप अंब्रोज विशप अंब्रोज!!" त्या लहान मुलाच्या आवाजाला संपूर्ण जमावाने प्रतिसाद दिला आणि त्याला अंब्रोजने प्रखर विरोध करूनही लोकसमुदायाने त्याला नवीन विशप म्हणून निवडून दिले. विशेष म्हणजे तोपर्यंत अंब्रोजने बाप्तिस्मादेखील घेतलेला नव्हता.
मात्र ह्या घटनेमुळे अंब्रोजच्या जीवनाला नवीन कलाटणी मिळाली. त्याने आपली वैयक्तिक मालमत्ता व गडगंज संपत्ती गोरगरीब व दीनदलितांमध्ये वाटून टाकली. आपला जमीन जुमला त्याने ख्रिस्तसभेला देऊन टाकला. ख्रिस्ती धर्मपंडितांची शिकवण आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास ह्यामध्ये त्याने आपले मन रमविले. एकाच वेळी त्याला शिकण्याचे व शिकविण्याचे काम करावे लागले. तो स्वत: एक नवशिक्या ख्रिस्ती होता आणि त्याचबरोबर लोकांचा मेंढपाळही होता. लवकरच त्याच्या छोट्या छोट्या, प्रभावी, व्यावहारिक आणि तितक्याच धाडसी प्रवचनांनी तमाम मिलानकरांना भारावून टाकले.
एकदा एका युवकाची आई विशप अंब्रोज ह्यांच्याकडे आली आणि आपला मुलगा कसा हाताबाहेर गेला आहे, पापाच्या चिखलात लोळत आहे असे तिने साश्रू नयनांनी बिशपांना सांगितले. तेव्हा विशपांनी तिला धीर देत म्हटले, "बाई, ज्या तुझ्या मुलासाठी तू अश्रू ढाळतेस तो तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही. परमेश्वर त्याला एक दिवस सन्मार्गावर आणील" आणि झालेही तसेच हा युवक हळूहळू देवळात येऊ लागला. अंब्रोजची अधिकारयुक्त वाणी आणि एखादा मुद्दा पटवून सांगण्याची हातोटी निश्चितच भाविकांच्या हृदयाला हात घालीत असे' अशी साक्ष खुद्द त्या युवकाने दिलेली आहे. पुढे हा युवक अंतर्बाह्य बदलून गेला व हिप्पो शहराचा बिशप बनला. अखिल जगतातील स्विस्तसभेत त्याला धर्मपंडित म्हणून गौरविण्यात आले. त्याचे नाव होते संत अगस्तीन,
मिलानचे बिशप अंब्रोज हे आपल्या कळपावर व्यक्तिशः लक्ष ठेवून होते. हजारो लोकांना जरी एकाच वेळी स्नानसंस्कार द्यावयाचा असला तरी प्रत्येक नवख्रिस्ती व्यक्तीला ते व्यक्तिशः भेटत असत. साधुवृत्तीचे जीवन जगत असताना ते क्वचितच जेवण घेत. संपूर्ण दिवस ते लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असत. गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच हा भेदभाव त्यांच्या गावीही नव्हता. रात्रीच्या वेळी ते पत्रांना उत्तरे देण्यात आणि आपल्या पुस्तकांचे लिखाण करण्यात घालवीत असत. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे ख्रिस्तसभेची भूमिका स्पष्ट केली. नैतिकता आणि प्रशासन क्षेत्रातील तिचा अधिकार समजावून सांगितला आणि शासकीय किंवा सरकारी व्यवस्थेकडे ख्रिस्तसभा संरक्षणाच्या भावनेने पाहात असते हेही ठणकावून सांगितले.
असे असूनही मिलानच्या सम्राज्ञी ज्युस्टीना आणि कित्येक दरबारी व अधिकारी लोक एरियस ह्या पाखंडवाद्याच्या मताला चिकटून होते. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तिघांच्या समानत्वावर व तितक्याच प्रमाणातील वैशिष्ट्यावर ही मंडळी विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. बिशप अंब्रोज ह्याने नव्याने उभारलेले महामंदिर राणीच्या स्वाधीन करावे म्हणून त्यांनी ३८६ साली संत अंब्रोजवर दडपणही आणले. परंतु ह्याचा परिणाम उलट झाला. पवित्र आठवड्यातील उपासनाविधीसाठी बिशप अंब्रोज आणि त्याचे ख्रिस्ती श्रद्धावंत प्रार्थना करीत आणि संत अंब्रोज ह्याने रचलेली धार्मिक गाणी व स्तोत्रे गात सतत देवळातच राहू लागली.
असा आपल्या कळपाचे लांडग्यांपासून रक्षण करणारा महान मेंढपाळ, खऱ्या ख्रिस्ती शिकवणुकीच्या हिरव्या कुरणावर त्यांना नेणारा आणि आपल्या मोजक्या शब्दातील व मधुर आवाजातील प्रवचने व गीते ह्यांच्या संथ पाण्यावर नेणारा मेंढपाळ बिशप अंब्रोज ४ एप्रिल ३९७ साली ख्रिस्तवासी झाला.
चिंतन : “जे निद्रावस्थेत जीवन जगतात त्यांना नव्हे तर जे जागृतावस्थेत असतात त्यांनाच देवाचा आशीर्वाद व कृपादाने मिळतात. - संत अंब्रोज
✝️
पहिले वाचन : यशया ४०:२५-३१
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्वसमर्थ परमेश्वर दुर्बलांना सबल करतो.”
पवित्र प्रभू विचारतो, “माझी कुणाशी तुलना कराल ? माझ्यासमान कोण आहे ? वर नजर टाका. कुणी निर्माण केलेत हे तारे ? त्यांची गणना करून त्यांना सेनेप्रमाणे बाहेर आणणाऱ्याने आणि त्या सर्वांना त्यांच्या नावाने हाक मारणाऱ्यानेच. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती इतकी अफाट आहे की, एकही तारा कधी मागे रहात नाही.
हे याकोब, कशाला कुरकुरतोस ? हे इस्रायला का बडबडतोस? “माझी दैन्यावस्था प्रभूच्या नजरेआड झाली आहे. माझा देव माझ्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो,” असे का म्हणतोस ?
तुम्हांला कळत नाही का ? तुम्ही ऐकले नाही का ? प्रभू हा सनातन देव, अफाट विश्वाचा निर्माता आहे. तो दमत नाही की थकत नाही. त्याच्या बुद्धीचा कुणाला ठाव लागत नाही. दमलेल्यांना तो चैतन्य देतो. दुर्बलांना सबळ करतो. तरुणदेखील दमतात आणि थकतात. नवजवान थकवा आल्याने धडपडतात. परंतु प्रभूवर भरवसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील. गरुडाप्रमाणे पंख फडफडवीत ते भरारी मारतील. ते धावतील पण थकणार नाहीत. ते चालतील पण त्यांना शीण येणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४३:१- २,३- ४,८.१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा.
१ हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा
हे माझ्या अंत:करणा, त्याच्या मंगल नावाचे धन्यवाद गा.
हे मना, प्रभूचे धन्यवाद गा.
त्याचे अनंत उपकार विसरू नकोस.
२ तो माझे सगळे अपराध पोटात घालतो.
माझे सगळे रोग दूर करतो.
मृत्यूच्या खाईतून तो माझा उद्धार करतो.
आपल्या वात्सल्याची आणि अपार करुणेची
पाखर माझ्यावर घालतो.
३. प्रभू करुणेचा आणि प्रेमाचा सागर आहे.
तो मंदक्रोध आणि दयानिधी आहे.
आमच्या पापांप्रमाणे तो आमची फेड करत नाही.
आमच्या दुष्कृत्यांप्रमाणे आमची परतफेड करीत नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पाहा, आपला सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर येईल. आणि आपल्या दासाचे डोळे प्रकाशित करील.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:२८-३०
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"कष्ट करणाऱ्यांनो, माझ्याकडे या."
तेव्हा येशूने म्हटले “अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहाणाऱ्यांनो माझ्याकडे या मी तुम्हांला विसावा देईन. माझे जू आपल्या मानेवर घ्या. माझ्यापासून शिका. कारण मी लीन आणि नम्र अंत:करणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या वैभवाचे आणि गौरवाचे गुणगाण गातो. आकाशाच्या ताऱ्यांकडे पाहिल्यावर परमेश्वराच्या वैभवाची प्रचिती होते कारण तो प्रत्येक ताऱ्याला नावाने ओळखतो. प्रत्येक तारा त्याच्यासाठी मौल्यवान आहे. एका सैनिकाप्रमाणे तो ताऱ्यांचा मार्गक्रम लक्षपूर्वक पाहतो. यशया संदेष्टा म्हणतो, ज्याअर्थी परमेश्वर ताऱ्यांना ओळखतो त्याअर्थी तो प्रत्येक मनुष्याला सुद्धा ओळखतो. ह्यास्तव परमेश्वर आपल्याला कधीच विसरणार नाही. मनुष्याची संकटे आणि व्यथा परमेश्वराच्या कधीच नजरेआड नसतात. सर्वाधिकार संपन्न ईश्वराच्या पुढे कुठलेच संकट किंवा अनिष्ठ टिकणार नाही. कारण परमेश्वर पराक्रमी आहे. म्हणून शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला परमेश्वरावर भिस्त ठेवून त्याच्या चरणी आपली संकटे सोपविण्यासाठी आमंत्रण करत आहे. 'तूच मला आसरा प्रभू रे, ह्या प्रसिद्ध गीताचे शब्द आठवून ख्रिस्तावर विसंबून राहण्यासाठी विशेष प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, कृपा व दयेच्या सागरा, तुझ्या सहवासात विसावण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या