आगमनकाळातील दुसरा सप्ताह
गुरुवार ८ डिसेंबर २०२२
कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला,
“हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबरअसो."
"पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव"
Immaculate Conception of the
Blessed Virgin Mary.
✝️
मानवी जीवनाच्या पहाटेपासूनच शुद्धता हा गुण कोणत्याही प्रकारची व्रतवैकल्ये, उपासतापास, नवस-सायास आणि यज्ञ-बलिदान या पेक्षा श्रेष्ठ गणला गेलेला आहे. त्यामुळेच पवित्र पैक्यातील दुसरी व्यक्ती जेव्हा भूतलावर अवतरण्याचा समय जवळ येऊन ठेपला तेव्हा मानवाच्या पापांसाठी व पापीवृत्तीबद्दल खंडणी म्हणून स्वतःच्या जीवनाचे सत्पात्र व स्वीकारणीय बलिदान अर्पण करण्यासाठी "मूळ पापावाचून गर्भी संभवलेल्या पवित्र मरियेची निवड देवाने करावी हे कोणालाही पटण्यासारखे सत्य आहे. अशी पूर्वतयारी हा देवपुत्राच्या ऐश्वर्याचा व पावित्र्याचा सन्मानच होता." असे संत अल्फोन्सस ह्यांनी लिहिलेले आहे.
संत आन्सेल्म ह्याने म्हटल्याप्रमाणे “ज्या शुद्धतेपेक्षा केवळ देवालाच अतिशुद्ध असणे शक्य आहे अशा शुद्धतेने देवाने पवित्र मरियेला सजविले आणि मग तिच्याभोवती कृपेचे वस्त्र लेवविले.” कारण संत जॉन दमासिन ह्यांच्या मते, स्वतः पवित्र असणारा देव केवळ पवित्र अशाच ठिकाणी वसती करतो. तर संत थॉमस अक्वायनस नावाचा तत्त्वज्ञ आणि धर्मपंडित म्हणतो, “पवित्र मरिया पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झालेली असल्यामुळे तिला पवित्र आत्म्याचे मंदिर किंबहुना प्रभूचे निवासस्थान म्हणणे उचितच आहे.”
पवित्र मरियेविषयी बायबलमध्ये पुढील वचने शब्दबद्ध करण्यात आलेली आहेत. गीतरत्न नावाच्या पुस्तकात, “माझ्या प्रिये, तू सर्वांगसुंदर आहेस. तुझ्यात काही व्यंग नाही” (गीतरत्न ४:७). तर यहुदीथ ह्या पुस्तकात, “तू इस्त्रायलचे वैभव आहेस! तू जेरूसलेमचा महागौरव आहेस! तू आमच्या राष्ट्राचा अभिमान आहेस!” (यहुदीथ १५:९).
वरील शास्त्रवाचनांचा आधार घेऊन वेगवेगळ्या ख्रिस्ती धर्मपंडितांनी दिलेल्या शिकवणुकीचा ख्रिस्तसभेने आपल्या प्रार्थनेमध्ये समावेश केला आहे: "हे पवित्र मरिये, तू सर्व पाप्यांची कैवारिणी आहेस. तू अतिसमंजस कुमारी आहेस. तू दयाळू माता आहेस. तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आम्हांसाठी विनंती कर” इत्यादी.
प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवलग शिष्य संत योहान ह्याने पवित्र मरियेला आपल्या घरी ठेवून घेतले होते असा उल्लेख बायबलमध्ये सापडतो (योहान १९:२७). त्याच संत योहानच्या मृत्यूनंतर बराच काळ प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवावर श्रद्धा प्रकट करण्यात आल्याचे धर्मपंडितांच्या लिखाणावरून दिसून येते. पौर्वात्य ख्रिस्तसभेत हा सोहळा सातव्या शतकापासून तर पाश्चात्य ख्रिस्तसभेत हाच सोहळा नवव्या शतकापासून साजरा करण्यात येतो.
इ. स. १४९७ मध्ये पॅरीसच्या विश्वविद्यालयाने आणि नंतर इतर अनेक प्रशिक्षण केंद्रांनी तर असा कायदाच करून टाकलेला होता की "तिथून अभ्यासकेलेल्या व पदवी प्राप्त करून घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचे समर्थन व संरक्षण करण्याची शपथ घ्यावी.” लोरेटो येथे लिहिण्यात आलेल्या पवित्र मरियेच्या विनंतीमालेमध्ये १८३९ पासून पुढील दयायाचनादेखील समाविष्ट करण्यात आली, “मूळ पापावाचून संभवलेले राणी, आम्हांसाठी विनंती कर" आणि १८४६ साली बाल्टीमोर येथे भरलेल्या परिषदेमध्ये पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवामुळे ती संयुक्त संस्थानांची आश्रयदाती संत म्हणून घोषित करण्यात आलेली आहे.
आठ वर्षानंतर इ.स. १८५४ साली पोप पायस नववे ह्यांनी एका अधिकृत परिपत्रकाद्वारे पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा ख्रिस्ती विश्वासांगिकाराचा एक घटक म्हणून जाहीर केले, “सदर धर्मत्त्व हे देवाने प्रगट केलेले आहे आणि म्हणूनच सर्व श्रद्धावंतांनी सातत्याने आणि भक्कमपणे ह्या ख्रिस्ती शिकवणुकीवरआपला विश्वास व्यक्त करावा” असे आवाहनही त्यांनी केले. पुढे १८५८ सालीलुर्डस् येथील आपल्या दर्शनामध्ये पवित्र मरियेने आपल्या 'निष्कलंक गर्भसंभव' विषयीचे रहस्य प्रकट केले.
अशा महान सणाच्या दिवशी आपल्या हेतूमध्ये शुद्धता राखून आपण पवित्र मरियेचे अनुकरण करावे असे आवाहन संत आल्फोन्सस ह्यांनी केलेले आहे.
चिंतन :"पवित्र मरियेच्या अतिपवित्र गर्भामध्ये जरी येशू ख्रिस्ताच्या रूपाने गव्हाचा केवळ एक दाणा पेरला गेलेला असला तरी ती गहू कोठाराची एक प्रचंड रासच समजली पाहिजे. कारण त्या एका दाण्यांमध्ये हजारो-असंख्य नीतिमानांना पोसण्याची ताकद होती." - मिलानचे बिशप-संत अंब्रोज
पवित्र मरियेचा सन्मान करीत असताना तिच्यासारखे शुद्धतेचे, पवित्रतेचे व परोपकाराचे जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ या. विशेषरितीने तिच्यासारखे ख्रिस्त केंद्रित जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन उत्पती ३:९-१५,२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन."
आदामने त्या झाडाचे फळ खाल्यावर परमेश्वर देवाने आदामला हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो,” देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय?” आदाम म्हणाला, "जी स्त्री तू मला सोबतीला दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले.” परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस?” स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला,
“तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके ठेचील आणि तू तिची टाच फोडशील."
आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९८ :१-४
प्रतिसाद : परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा.
१)परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुतकृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.
२) परमेश्वराने स्वतः सिध्द केलेले तारण प्रकट केले आहे.
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
इस्राएलंच्या घराण्यावरील आपली दया
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.
३)पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र१ : ३-६, ११-१२
वाचक :: पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. "
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्य असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आम्हांला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुल प्रमाणात केली आहे.
आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहो, ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे कृपापूर्ण मरिये, नमस्कार,
प्रभू तुझ्याबरोबर असो.
स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १:२६-३८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १ : २६-३८
"हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो"
देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गेब्रियल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबरअसो." ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव.
“तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”
मरियेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही."
देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण "देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, "पाहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो,” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज देऊळ माता धन्य कुमारी मरियेचा निष्कलंक गर्भसंभव सोहळा साजरा करत आहे. हा सोहळा ह्या सत्याची आठवण करून देत आहे की, परमेश्वराने मरियेला एक असाधारण देणगी दिली. ती म्हणजे तिच्या गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून तिला मूळ पापापासून दूर ठेवलेले होते. या वस्तुस्थितीची जाणीव गाब्रिएल दूताच्या अभिवादनाद्वारे कळते. गाब्रिएल देवदूत मरियेला संबोधून म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये”. आज सुद्धा नमो मरिया प्रार्थनेत या शब्दांचा आपण उच्चार करतो. काही समालोचकांची आणि चर्चच्या धर्मगुरूंची अशी धारणा आहे की, “कृपापूर्ण” याचा अर्थ असा की, मरिया विपुल कृपेने संपन्न होती. गाब्रिएल देवदूताने तिला फक्त मरिया या नावाने न संबोधता “कृपापूर्ण” या नावाने संबोधले. कारण ती एक साधारण स्त्री नसून देवाची आई होणार होती. मरियेप्रमाणे पवित्र आणि सेवाभावी जीवन जगण्यासाठी तिच्याकडे मध्यस्थीची याचना करूया.
प्रार्थना : हे धन्य कुमारी मरिये, परमेश्वराला शरण जाण्यास व त्याची कृपा अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा दे व आम्हासाठी विनंती कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या