आगमनकाळातील दुसरा सप्ताह
शुक्रवार ९ डिसेंबर २०२२
येशू म्हणाला, “या पिढीची मी कोणाशी तुलना करू ?
✝️
पहिले वाचन यशया ४८:१७-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरविले असते तर किती छान झाले असते."
तुमचा उद्धारकर्ता इस्राएलचा पवित्र प्रभुदेव असे म्हणतो, “मी तुमचा प्रभुदेव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच मी तुम्हांला शिक्षण देतो. ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हांला नेतो.
माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरवले असते तर किती छान झाले असते. मग निरंतर वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुम्हाला शांती लाभली असती. तुमची सात्त्विकता सागराच्या लाटांप्रमाणे भरून वाहिली असती.
तुमचा वंशविस्तार वाळूसारखा विपुल झाला असता तुमची संतती रेतीच्या कणांसारखी अगणित झाली असती त्यांचा नाश व्हावा किंवा नावनिशाणी मिटावी असे मी घडू दिले नसते."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १:१-४,६
प्रतिसाद : प्रभो, तुझ्यामागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल.
१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही,
पापीजनांच्या वाऱ्याला उभा रहात नाही,
किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही,
उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो,
त्याच्या धर्मशास्त्राचे रांत्रदिवस मनन करतो तो धन्य
२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते,
यथाकाळी त्याला बहर येतो,
त्याची पाने कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा तो असतो.
तो हाती घेतो ते सर्व सफळ होते.
३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत.
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते.
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पाहा, आपला राजा,
जगाचा मालक येईल.
तो आपल्याला दोरखंडाच्या बंधनातून मुक्त करील
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:१६-१९
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्यांनी योहानचे ऐकले नाहीच परंतु परमेश्वरपुत्राचेसुध्दा त्यांनी ऐकले नाही."
येशू म्हणाला, “या पिढीची मी कोणाशी तुलना करू ? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवंगड्यांना म्हणतात, 'आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही.' त्याप्रमाणे ही पिढी आहे.
कारण योहान आला त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात 'त्याला भूत लागले आहे' मानवपुत्र आला आणि तो खातोपितो तर सगळे म्हणतात, 'बघा, कसा खादाड आणि दारूबाज आहे, हा नोकरदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे.' पण देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञान्यांच्या कृत्यांवरून पटते."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानामध्ये यहुदी धार्मिक पुढाऱ्यांच्या श्रद्धेची तुलना लहान मुलांच्या हेकेखोर स्वभावाबरोबर केली आहे. साध्या- भोळ्या यहुदियांनी योहान बाप्तिस्तावर विश्वास ठेऊन त्याच्या हातून बाप्तिस्मा स्वीकारला. परंतु यहूदी धार्मिक पुढाऱ्यांनी त्याचा बाप्तिस्मा नाकारला. उलटपक्षी त्याला भूत लागले आहे असे ते उद्गार काढू लागले. कारण तो काटकसरी आणि तपस्वी जीवन जगत होता. येशूख्रिस्तावरसुद्धा ते नाखुश होते. ते त्याला खादाड, दारूड्या आणि पातक्यांचा मित्र या नावाने संबोधायचे. ख्रिस्ताचा बाप्तिस्मासुद्धा यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी नाकारला. यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी ख्रिस्तावर आणि योहान बाप्तिस्तावर अविश्वास दर्शविला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा संकुचित दृष्टीकोन आणि त्यांचा अहंकार. येशू ख्रिस्त आणि योहान बाप्तिस्ता त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत हे त्यांना कधीच पटले नाही. त्यांच्या अहंकारामुळे आणि संकुचित दृष्टीकोनामुळे त्यांनी आपल्या मनाचे आणि हृदयाचे दरवाजे बंद ठेवले होते. आपल्या मनातील किल्मीष दूर करून पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनापासून मुक्त राहण्यासाठी परमेश्वराची कृपा मागूया, जेणेकरून सुज्ञपणा आणि समंजसपणा आपल्यात वाढीस लागेल.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वाचून जीवन असार आहे. तुझी वचने व आज्ञा पाळण्यास व कृपेचे जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या