आगमनकाळातील दुसरा सप्ताह
शनिवार १० डिसेंबर २०२२
मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही.
✝️
लॉरेटाची धन्य कुमारी मारिया माता
✝️
ख्रिस्तसभा आज लोरेटोची धन्य कुमारी मरिया माता हिचा सन्मान करीत आहे. लोरेटोचे तिर्थस्थान युरोपमधील लूर्डस् आणि फातिमा ह्या नंतर तिसऱ्या स्थानावर येते. १२९१ साली धर्मयुद्धानंतर १० डिसेंबर १२९४ साली नाझरेथातून ध.कु. मरियेच्या घरांचे अवशेष आणि इतर पवित्र वस्तू लोरेटो येथे आणल्या गेल्या. ह्याच घरात गाब्रियल दुताने मरियेला दर्शन दिले होते. रोम पासून तिन तासांच्या अंतरावर असलेल्या ह्या तिर्थस्थानाची स्थापना १९९८ साली झाली. ख्रिस्ती श्रद्धा जोपासून तिची भरभराट करण्याचे ते एक महत्वाचे स्थान निर्माण झाले आहे.
प्रभू येशूच्या आज्ञेत राहून त्याच्या वचनानुसार खरे ख्रिस्ती जीवन जगण्याचा आपण निर्धार करु या. प्रभू येशू पुन्हा येणार आहे, त्याला कोणत्याही क्षणी सामोरे जाण्यास आपण आपल्या मनाची तयारी करु या. तो पुन्हा येईल. ह्या आशेवरच आपण त्याच्या पुनरुत्थानाचे सहभागिदार बनणार आहोत हे स्वीकारु या.
✝️
पहिले वाचन बेन सिरा ४८:१-४,९-११
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"एलिया पुन्हा येईल.”
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास !
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद : प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा,
आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे.
तुझा पराक्रम गाजव आणि
आमचा उद्धार करायला धावून ये.
२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर,
स्वर्गातून नजर टाकून बघ.
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने
लावलेल्या रोपाची काळजी घे.
३ ) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी
समर्थ केलेल्या मानवावर
तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही
तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही.
आम्हांला नवजीवन दे
म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे.
पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १७:१०-१३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही."
पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, “मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत ?"
येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या पहिल्या वाचनाचा आणि शुभवर्तमानाचा विषय आहे. “एलीया प्रथम येणार". एलीया हा इ.स.पू. नवव्या शतकातला संदेष्टा होता. ज्याने मोठ्या आवेशाने इस्रायलच्या देवासाठी राजा अहाब, राणी इजाबेल आणि तिच्या फसव्या संदेष्ट्यांना लढा देऊन त्यांच्यावर मात केली. या लढ्यामध्ये त्याला असंख्य दुःखे भोगावी लागली. एलीयाप्रमाणे योहान बाप्तिस्ताला सुद्धा राजा हेरोद आणि त्याची बायको हेरोदीया ह्यांच्याकडून क्लेश आणि रक्तसाक्षीत्व भोगावे लागले. ख्रिस्तालासुद्धा योहान बाप्तिस्ता आणि एलीयाप्रमाणे व्यथा आणि मरण ह्यांना तोंड द्यावे लागले. कालवरी आणि क्रूस हाच ख्रिस्ताच्या वैभवाचा आणि गौरवाचा महामार्ग आहे. ख्रिस्ताचा जन्म, मृत्यू आणि पुनरुत्थान मानवाच्या तारणासाठी झाला होता. ह्या सत्याची जाणीव आगमनकाळ आपल्याला करून देत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनातली दुःख ख्रिस्ताच्या चरणी मांडून मानवाच्या तारणाचे आणि उद्धाराचे वाटेकरी होऊया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, अंतर्मनाने तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या