आगमनकाळातील तिसरा रविवार
११ डिसेंबर २०२२
अंधांना दृष्टी प्राप्त होते, पंगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जातात आणि गरिबांना शुभसंदेश ऐकवला जातो. .
तो स्वर्गीय आनंद घेऊन प्रभू येशू येत आहे
प्रभू येशूच्या येण्याने देवाची पुनर्वसनाची व मानवाच्या उद्धाराची योजना साकार झाली. प्रभू पुन्हा येणार आहे व जगाचा न्याय निवाडा करणार आहे. आजच्या दुसऱ्या -वाचनात प्रभूचा प्रेषित संत याकोब प्रभूच्या पुनरागमनाचा संदेश देत आहे. संत याकोब म्हणत आहे, 'अहो बंधूनो, तुम्ही धीर धरा, आपली अंत:करणे स्थिर करा, प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे, पाहा न्यायधीश दाराजवळ उभा आहे. '
प्रभूला स्वीकारण्यास आपण सज्ज असावे, आपण कोणीही दोषी ठरु नये म्हणून आपण आज आपले जीवन आचरण तपासून पाहू या. प्रभूला शरण जाऊ या कारण, 'प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे.'
✝️
पहिले वाचन : यशया ३५ : १-६,१०
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर स्वतः येईल आणि आमचा उद्धार करील. "
अरण्य आणि रुक्ष भूमीही हर्षतील. वाळवंट उल्हासेल आणि कमलाप्रमाने फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल. आनंदाने गाऊन ते उत्सव करील. लबानोनची शोभा त्याला मिळेल. कार्मेल आणि शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.
थरथरणारे हात दृढ करा. लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्या मनाच्या लोकांना म्हणा, धीर धरा. भिऊ नका. पाहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील. बहिऱ्यांचे कान मोकळे होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील. मुक्यांची जीभ गजर करील.
मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद आणि हर्ष पावतील. दुःख आणि उसासे पळ काढतील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४६:६ - १०
प्रतिसाद : प्रभो, ये आणि आमचा उद्धार कर.
१. तो सदैव सत्यवचनी असतो.
छळलेल्यांना न्याय देतो.
भुकेल्यांना अन्न देतो.
प्रभू बंदिवानांना मुक्त करतो.
२. प्रभू आंधळ्यांना दृष्टी देतो.
प्रभू वाळून गेलेल्यांना ताठ उभे करतो.
प्रभू परक्यांना सांभाळतो.
अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो..
३. प्रभू सज्जनांवर प्रेम करतो..
पण दुर्जनांचे बेत फिसकटून टाकतो.
प्रभू सदासर्वदा राज्य करील. सियोन,
तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करील.
दुसरे वाचन :याकोबचे पत्र ५ :७-१०
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
"आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे.' "
बंधुजनहो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहात असता, त्याला पहिला आणि शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा. आपली अंत:करणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. बंधुनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःखसहन आणि त्यांचा धीर यांविषयीचा कित्ता घ्या.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ११:२-११
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच, की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी ?"
योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या शिष्यांकरवी त्याला निरोप पाठवून विचारले "ज्याचे आगमन होणार आहे ते आपणच, की आम्ही आणखी कुणाची वाट पाहावी ?
येशूने त्यांना उत्तर दिले, "जे तुम्ही ऐकत आहात आणि पाहात आहात ते जाऊन योहानला सांगा. अंधांना दृष्टी प्राप्त होते, पंगू चालतात, महारोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मेलेले जिवंत केले जातात आणि गरिबांना शुभसंदेश ऐकवला जातो. ज्याला माझी अडचण वाटत नाही तो धन्य." योहानचे जासूद जायला निघाले तेव्हा येशू जमावाला योहानविषयी विचारू लागला, “तुम्ही रानावनात काय पहायला गेला होता ? वाऱ्याच्या झोतावर डोलणारे बोरु काय ? नाही, तर मग काय पहायला गेला होता ? भरजरी वस्त्र घालणाऱ्या माणसाला पहायला काय ? अहो, तलम वस्त्र धारण करणारे राजवाड्यात असतात. मग कशाला तिकडे गेला होता ? एखाद्या संदेष्ट्याला पहायला काय ? अर्थात मी म्हणतो, संदेष्ट्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला. पहा, मी आपला जासूद तुझ्या अगोदर पाठवीत आहे. पुढे जाऊन तो तुझ्यासाठी मार्ग खुला करील, असे ज्याच्याविषयी धर्मशास्त्रात म्हटले आहे तो हाच. मी तर खरेच सांगते, स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल्या सर्वांत योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वांत कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आगमनकाळातील तिसऱ्या रविवारी आपली माता ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी आणखी काही विचार देते:
अ. आपण देवाची करुणा गृहीत धरू नये : परमेश्वराच्या क्रोधाची इस्राएली लोकांना जाणीव होती तसाच अनुभवदेखील होता. इस्राएलला शिस्त लावण्यासाठी तो जसा त्यांना शिक्षा करतो तसाच परराष्ट्रीयांना आपले सार्वभौम सामर्थ्य दर्शविण्यासाठी तो धारेवर धरतो. आजच्या पहिल्या वाचनात मात्र त्याच्या करुणेचे चित्र रंगविण्यात आलेले आहे. मात्र इस्राएलने त्याची ही करुणा गृहीत धरू नये असे यशया सुचवितो.
ब. आपण चिकाटीने प्रभूच्या येण्याची वाट पाहावी : आजच्या दुसऱ्या वाचनात याकोब एकूण तीन प्रतिमा वापरतो. शेतकरी, न्यायाधीश आणि जुन्या करारातील ईयोब हे पात्र ! हे तिघेही धैर्याने व चिकाटीने परमेश्वराच्या कृपेची वाट पाहणाऱ्यांचे प्रतिनिधी होत. शेतकरी फळांची वाट पाहतो, न्यायाधीश न्यायदानाची तयारी करतो तर ईयोब आपल्या संकटात परमेश्वराची वाट पाहात होता. आपणही त्यांचे अनुकरण करीत कुरकूर न करता धिराने प्रभूची वाट पाहायला हवी.
क. आपली पूर्वतयारी सत्याच्या भक्कम पायांवर उभारलेली असावी : शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीन प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत : वाऱ्याने हलणारा बोरू, तलम वस्त्रे पांघणारे व संदेष्टा. तो वाऱ्यानुसार पाठ फिरविणाऱ्यांपैकी नव्हता. त्याचे जीवन सत्याच्या भक्कम पायावर उभारलेले होते. त्याची जीवनशैली राजेशाही नव्हती, ती त्याच्या पाचारणाला व प्रेषितकार्याला साजेशी होती. एक संदेष्टा म्हणून त्याने अनैतिक जीवन जगणाऱ्या राजावर कडक ताशेरे ओढले व त्या सत्यासाठी प्राणार्पण केले.
आत्मपरीक्षण : प्रभूची करूणा गृहीत न धरता धैर्याने, चिकाटीने व सत्यतेने मला प्रभूच्या आगमनाची तयारी कशाप्रकारे करता येईल ?
प्रार्थना :विश्वासाने आणि खऱ्या अंत:करणाने, हे प्रभू येशू तुला सामोरे जाण्यास आम्ही पात्र ठरोवत म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या