परमेश्वराच्या देवराज्याच्या कार्यात अडथळे निर्माण करणारी अशी वरिष्ठ नेते मंडळी आज सुद्ध कार्यरत आहे. देवाचे कार्य मात्र सतत चालूच असते, कारण न्यायाने, सत्याने, नीतिने आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणारी अनेक माणसे समाजात आहेत. प्रामाणिकपणे जीवन जगून अशी माणसे देवाची सुवार्ता पसरवित असतात. परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादित झालेल्या अशा माणसांचा पूर्ण विश्वास देवावर असतो. श्रद्धावान अशा माणसाना ठावूक असते की परमेश्वर त्यांचा पाठीराखा आहे.
पहिले वाचन गणना २४:२-७,१५-१७अ
वाचक : गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
"याकोब वंशातून एक तारा उदय पावेल"
बलामने दृष्टी वर करून पाहिले तो इस्राएल लोक आपआपल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहात आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला :
"बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोब, तुझे डेरे, जे इस्राएल, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरुंसारखे ते आहेत. त्याच्या मोटांतून पाणी वाहेल. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल आणि त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल."
मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागलाः “बौरचा पुत्र बलाम बोलत आहे. ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे.. जो देवाची वचने श्रवण करतो आणि ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालतो आणि ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. मी त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबमधून एक तारा उदय पावेल आणि इस्राएलामधून एक राजदंड निघेल."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २५:५-९
प्रतिसाद : प्रभो, तुझा मार्ग मला दाखव.
१ ) हे प्रभो, तुझा मार्ग मला दाखव.
तुझी वाट मला प्रकट कर.
. तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
मला वळण लाव.
कारण तूच माझा मुक्तिदाता देव आहेस.
२) हे प्रभो, तुझे वात्सल्य, तुझे अढळ प्रेम, यांचे स्मरण कर.
ती पूर्वापार चालत आली आहेत.
प्रभो तुझे अढळ प्रेम, तुझे चांगुलपण लक्षात घेऊन,
माझी आठवण ठेव.
३) प्रभो किती चांगला आणि सरळ आहे.
तो पापीजनांना सन्मार्गाने जायला शिकवतो.
नम्रजनांना न्यायपरायणता दाखवतो.
आपला मार्ग दीनांना प्रकट करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला प्रभू येईल, आपण त्याला भेटायला जाऊ या. त्याचा आरंभ महान आहे आणि त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २१:२३-२७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला ?"
येशू मंदिरात जाऊन शिक्षण देत होता, तेव्हा प्रमुख पुरोहित आणि लोकांचे वडीलजन त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “या गोष्टी करायचा तुम्हांला काय हक्क आहे ? हा अधिकार तुम्हांला कुणी दिला ?"
येशूने त्यांना उत्तर दिले, “मीदेखील तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे जर तुम्ही उत्तर दिलेत तर या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे तुम्हांला सांगेन.” बाप्तिस्मा करायचा अधिकार योहानला कुणी दिला ? देवाने की माणसाने ?"
त्यावर वादविवाद करीत ते एकमेकांना म्हणू लागले, “आपण जर म्हणालो, 'देवाने दिला' तर हा आपल्याला म्हणेल, 'मग तुम्ही योहानवर का विश्वास ठेवला नाही ?' बरे ‘माणसाने दिला’ म्हणावे तर आपल्याला जनसमुदायाची भीती आहे, कारण योहान संदेष्टा आहे असे सगळे मानतात." तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही."
त्यावर येशू त्यांना म्हणाला, “मग या गोष्टी करायचा मला काय अधिकार आहे हे मीही तुम्हांला सांगत नाही.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : चाळीस वर्षे इस्रायली लोकांनी मिसर देशातून आपल्या वतनाकडे प्रवास केला. मोआबच्या हद्दीवर पोहोचल्यावर त्यांनी आपले मंडप उभारले आणि तेथे वस्ती केली. त्यांची लोकसंख्या पाहून मोआबचा राजा घाबरला आणि बलाम संदेष्ट्याला बोलावून इस्रायली लोकांस शापीत करावयास हुकूम दिला. परंतु बलाम संदेष्ट्याने शापाऐवजी त्यांनी आशीर्वाद दिला, कारण इस्रायलच्या लोकांविषयीच्या परमेश्वराच्या योजना त्यांने अंतर्ज्ञानाने ओळखल्या होत्या.शुभवर्तमानात आपण ऐकतो की, दुर्दैवाने मुख्य याजक आणि वडीलजन बलामसारखे समंजस, सुज्ञ आणि व्यापक दृष्टीकोनाचे नसून संकुचित वृत्तीचे आहेत. येशू हाच ख्रिस्त आहे हे त्यांना स्वीकारणे त्यास कठीण झाले. उलट ते त्याच्याकडून स्वर्गातून अद्भूत चिन्ह मागतात. विरोधाभास हा की, जुन्या करारामध्ये ख्रिस्ताविषयी असंख्य गर्भीत संदर्भ नमूद केले आहेत. त्या संदर्भाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आपली चूक स्वीकारायला ते कबूल नव्हते. आपल्या सहबांधवांविषयी आपले गैरसमज आपण कसे हाताळतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, धैर्याने आणि निष्ठेने तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या