एका प्राचीन ख्रिस्ती परंपरेनुसार संत ल्युसी ही इटलीमधील सायराकूस या ठिकाणी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आली होती. तिचे वडील तिच्या बालपणीच मरण पावले आणि जरी ल्युसी हिने आमरण कौमार्याचे व्रत स्वीकारण्याचा व देवाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केलेला असला तरी तिच्या विधवा आईने मात्र एका श्रीमंत परंतु मूर्तिपूजक युवकाशी तिची सोयरिक करून दिली. संत सिसिलीयाप्रमाणे आपण देखील आपल्या पतीचे मनपरिवर्तन करू आणि आपल्या पावन व्रताचा आदर राखण्यास त्याचे मन वळवू अशी आशा ती आपल्या मनाशी बाळगून होती.
ल्यूसीची आई बरीच वर्षे रक्तस्रावाने पीडलेली होती. त्यामुळे तिच्या मुलीच्या सूचनेवरून ५० मैल अंतरावर असलेल्या संत आगथाच्या चमत्कारकर्त्या थडग्याला भेट देण्याचे तिने मान्य केले. तिथे ती ताबडतोब गेली आणि संपूर्णपणे बरी झाली. आपले दुखणे कायमचे बरे झाले हे पाहून ल्युसीच्या आईला अत्यानंद झाला. तिने त्या चमत्काराप्रीत्यर्थ आपल्या मुलीकडे आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यासाठी सुपूर्द केली. यापूर्वी ल्युसीने आपल्या आईला तशी विनंती अनेकदा केलेली होती. परंतु आईने मात्र त्याला मान्यता दिली नव्हती.
आपल्या भावी पत्नीने व सासूने आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीची अशी उधळपट्टी केल्याचे कानी येताच लोभी वृत्तीच्या त्या तरुणाने रागापायी लुसीला सिसिली देशाच्या गव्हर्नरकडे आणले व ती ख्रिस्ती जीवन जगत असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले.
तो काळ ख्रिस्ती लोकांच्या (डायक्लोशियन) छळाचा काळ होता. एखादा रोमन कितीही देशभक्त असला तरी चालेल परंतु तो ख्रिस्ती असण्याला सम्राटचा तीव्र विरोध होता. जणू ख्रिस्ती धर्म राष्ट्रीय एकात्मतेला आणि लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला धोकादायक होता अशीच त्यांची धारणा झाली होती.
अशा पार्श्वभूमीवर एक कट्टर ख्रिस्ती म्हणून संत ल्यूसी हिला गर्व्हनरच्या समोर उभे करण्यात आले. तिला अत्यंत भयानक आणि लज्जास्पद मानहानीला व छळाला सामोरे जावे लागले. शेवटी ती १३ डिसेंबर ३०४ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एक कुमारिका म्हणून रक्तसाक्षी बनली. एका तरवारीने तिचा गळा चिरून तिला आरपार भोसकण्यात आले होते. ज्या कंठातून ख्रिस्ताचे नाव उच्चारले जात होते तो कंठ भेदून छेदून टाकण्यात आला होता.
ती सिसिली देशातील सायराकूस प्रांताची आश्रयदाती संत आहे. डोळे
येणे, घशाचे विकार, रक्तस्राव आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी तिचा धावा केला जातो.
चिंतन : ज्यांची हृदये शुद्ध आहेत तेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. - संत ल्यूसी
ख्रिस्ताचा आंतरिक स्पर्श झालेली व्यक्ति पापी असली तरी तिचे । परिवर्तन शक्य आहे. आपण अंतर्मुख बनून आपले ख्रिस्ती जीवन खरोखरच | देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो का ह्यावर चिंतन करु या.
पहिले वाचन सफन्या३:१- २,९-१३
वाचक : सफन्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
"सर्व गरिबांना ख्रिस्तातील तारणाचे वचन मिळाले."
बंडखोर, भ्रष्ट आणि बलात्कारी नगरीचा धिक्कार असो. तिने वचन मानले नाही. बोध घेतला नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही. ती आपल्या देवासमीप आली नाही. मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन आणि परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नावाचा धावा एकचित्ताने करतील. कुशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील. ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील. ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करशील त्याविषयी त्या दिवसात तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही. कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणाऱ्यांना तुझ्यातून नाहिसे करीन. माझ्या पवित्र पर्वतावर तू यापुढे तोरा मिरवणार नाहीस. मी तुझ्यामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन.. ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील. इस्राएलचे उरलेले जन काही अनिष्ट करणार नाहीत. लबाडी करणार नाहीत. त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळावयाची नाही. ते चरतील आणि विश्रांती मिळवतील. कोणी त्यांना भिववणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३३:२-३, ६-७,१६.१८-१९.२३
प्रतिसाद : मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला.
१) मी प्रभूला सदासर्वदा धन्यवाद देईन
त्याचे स्तवन सतत माझ्या मुखी असेल.
प्रभूविषयीचाच अभिमान माझ्या मनी बसेल.
हे ऐकून नम्र लोकांना आनंद होईल.
२ )त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते.
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही.
मी पामराने धावा केला आणि प्रभूने तो ऐकला
आणि माझी संकटे हरण केली.
३) वाईट करणाऱ्यांची आठवणदेखील
प्रभू त्यांना विन्मुख होतो.
सात्त्विक जन धावा करतात,
प्रभू ऐकती, तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.
४) ज्यांची कंबर खचली आहे
अशांच्या जवळ प्रभू असतो.
ज्यांचे अवसान गळाले आहे
अशांचा तो उद्धार करतो.
प्रभू आपल्या सेवकांचे प्राण वाचवतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
पहा, आपला प्रभू त्याच्या लोकांचे तारण करण्यास येईल. जे त्याला भेटण्यासाठी सज्ज आहेत ते धन्य.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २१:२८-३२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"योहान आला आणि त्यावर पाप्यांनी विश्वास ठेवला. "
येशू मुख्य याजक आणि वडीलजन ह्यांना म्हणाला, “तुम्हांला काय वाटते, सांगा बरे ? एका माणसाला दोन मुलगे होते. तो थोरल्याकडे गेला आणि म्हणाला, 'मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.' मुलाने उत्तर दिले, 'बाबा, मी जातो' पण तो गेलाच नाही. बापाने मग जाऊन धाकट्याला तसेच सांगितले. धाकट्याने उत्तर दिले, 'मी नाही जात' पण नंतर त्याला वाईट वाटले आणि तो गेला. मग या दोघांपैकी कुणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले ?”
ते म्हणाले, “धाकट्याने.”
येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरेच सांगतो, नाकेदार आणि वारांगना तुमच्याही अगोदर देवराज्यात जातील. योहानने तुमच्याकडे येऊन तुम्हाला सन्मार्ग दाखवला पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण नाकेदारांनी आणि वारांगनांनी ठेवला. तुम्ही हे पाहिले तरी नंतरही तुम्ही पश्चात्ताप केला नाही आणि विश्वासही ठेवला नाही.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : येरूशलेम ही परमेश्वराची नगरी होती. परमेश्वर यहुदी लोकांचा एकमेव देव होता. कारण परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता. परंतु प्रत्यक्षात हे लोक परमेश्वराच्या इच्छे विरुद्ध वागले. प्रामुख्याने यहुदी धार्मिक पुढारी. परमेश्वराची इच्छा प्रमाण न मानता ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागले. आजच्या शुभवर्तमानात दोन मुलांच्या दाखल्याद्वारे येशू यहुदी धार्मिक पुढाऱ्यांची तुलना पहिल्या मुलाबरोबर करतो जो आपल्या पित्याला “मी जातो" म्हणाला पण गेला नाही. पहिल्या मुलाप्रमाणे यहुदी धार्मिक पुढारी पश्चात्ताप करावयास तयार नाहीत. येशू दुसऱ्या मुलाची तुलना जकातदार, पापी आणि जातीभ्रष्टांबरोबर करतो कारण पापी असूनसुद्धा ख्रिस्ताच्या पश्चात्तापाचा संदेश त्यांनी गांभिर्याने पाळला. दैनंदिन जीवनात आपण कोणत्या मुलांसारखे आहोत ? पहिल्या किंवा दुसऱ्या ?
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे पश्चात्तापी व परिवर्तनशील जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या