Marathi Bible Reading | Wednesday 14th December 2022 | 3rd week of Advent

आगमनकाळातील तिसरा  सप्ताह   

बुधवार   १४ डिसेंबर  २०२२

 आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
✝️

क्रूसभक्त संत जॉन

वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२-१५९१)

 ✝️

 बालपणापासून त्याला देवाधर्माची व अध्यात्माची ओढ असल्यामुळे तो आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांमध्ये, धर्मगुरू तसेच धर्मभगिनींच्या सहवासामध्ये रमू लागला. आध्यात्मिक विषयावर चर्चा करणे किंवा एकत्र प्रार्थना करणे त्याला खूप आवडत असे. लवकरच त्याची अविलाच्या संत तेरेजाशी ओळख झाली आणि दोघेही आध्यात्मिक स्वभावाचे असल्यामुळे त्याची दाट मैत्री जमली.
ज्याप्रमाणे आपण धर्मभगिनींसाठी कार्मेलाईट संस्था उघडलेली आहे, त्याचप्रमाणे जॉनने देखील पुरुषांसाठी कार्मेलाईट संस्था स्थापन करावी असे मत अविलाच्या संत तेरेजाने आपला मित्र जॉन ह्याच्याकडे प्रदर्शित केले. लागलीच हे स्वप्न वास्तवात अवतरले आणि १५६८ साली डुरूएलो येथे "डिस्काल्स्ड फ्रायर्स" ह्या संघाची स्थापना झाली. संस्थापक होते क्रूसभक्त संत जॉन आणि सहसंस्थापिका अविलाची संत तेरेजा !
एका झोपडीवजा घरामध्ये पहिल्या तीन व्रतस्थ फ्रायर्सनी आपले व्रतस्थ जीवन सुरू केले. “आत्यंतिक दारिद्र्य, विरक्ती आणि दैवी चैतन्य" अशा तत्त्वांवर बेथलेहेमच्या त्या गोठ्यात (अविलाच्या संत तेरेजा त्या झोपडीला बेथलेहेमचा गोठा म्हणत असे) त्यांनी आपली संस्था उघडली. त्यानंतर शाखा, उपशाखा व अध्यात्मकेंद्रे उघडण्यात आली.

पाच वर्षे संत जॉन अविलाच्या संत तेरेजांना आणि तिच्या धर्मभगिनींना अविला येथे आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असे. परंतु धर्मसुधारकांच्या काळात (सोळाव्या शतकात धर्मसुधारक आले त्यात मार्टिन ल्यूथरचा समावेश होता) त्या दोघांना खूप मानसिक त्रास आणि आत्मक्लेश ह्यांना सामोरे जावे लागले. पोप महाशयांच्या राजदूताने दिलेले आदेश, संस्थेच्या जनरलने केलेले नियम आणि जाहीर परिषदांमध्ये घेतले गेलेले नियम ह्यांचा कुठेच मेळ बसत नव्हता.
तशात नऊ महिने जॉनला त्याच्या स्वतःच्या संस्थेतील धर्मबंधूंनी एका आखूड खोलीत कोंडून ठेवले आणि त्याच्याविषयी उगाच नाही त्या कागाळ्या करायला आणि अफवा पसरायला सुरुवात केली; परंतु देव नीतिमानांना कधीही टाकून देत नाही ह्याचा प्रत्यय स्वत: जॉनला आला. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे जसा पेत्रही देवाच्या दूताद्वारे कडक बंदोबस्त असलेल्या तुरुंगातून सोडविण्यात आलेला होता (प्रे. कृ. १२:७-११) तसाच संत जॉनदेखील चमत्कारिकरित्या त्या आखूड खोलीतून बाहेर आला. मात्र ह्या नऊ महिन्यांच्या अंधाऱ्या भूतकाळातच त्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ दृष्टान्त आणि दैवी साक्षात्काराचा प्रकाशझोत दडलेला आहे.
धर्मसुधारक आणि कार्मेलाईट संस्था ह्यांच्यात फूट पडल्यानंतर संत जॉन हा प्रांताधिकारी म्हणून कार्यभार सांभाळू लागला. त्याच्या ठायी आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता, सहानुभूती ह्यांचे जणू घडेच्या घडे भरलेले होते. शिवाय त्याचा पिंड कवीचा होता. ह्याच त्याच्या स्वभावामुळे त्याच्या हातून अलौकिक अशी सेवा आणि साहित्यनिर्मिती झालेली आहे.
पुढे पुन्हा एकदा अंतर्गत बंडाळी माजली आणि त्यामुळे त्याला आपले प्रांताधिकारीपद सोडावे लागले. त्याला दूरवरच्या एका ओसाड मठामध्ये पाठविण्यात आले. तिथे तो एकाकी होता, त्यामुळे लवकरच आजारी पडला. त्यात अपमान, गैरसमज, मानहानी ह्यांना तोंड देत अखेरीस १४ डिसेंबर १५९१ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी तो मरण पावला. येशूप्रमाणे आपल्याला देखील दुःख, हालअपेष्टा सहन करीत असताना मृत्यू यावा अशी त्यानेच केलेली प्रार्थना अशा प्रकारे ऐकली गेली.
सेगोव्हिया येथे पुरण्यात आलेला त्याचा मृतदेह आजही अविनाशी अवस्थेत पाहायला मिळतो. पुढे पोप बेनेडिक्ट तेरावे ह्यांनी त्याला १७२६ साली संतपदाचा मान बहाल केला. तो साक्षात्कारी होता. साक्षात्कारी जीवनाचं जे ईशज्ञान आहे, त्याचा विद्वान पंडित म्हणून संत जॉन क्रूसवीर ह्याला गौरविले गेलेले आहे. शिवाय त्याने लिहिलेल्या साक्षात्कारी पुस्तकांमुळे त्याला सर्व साक्षात्कारी संतांचा प्रमुख म्हणून सन्मानीत करण्यात आलेले आहे.
क्रूसभक्त संत जॉन ह्याने माऊंट कार्मेलवरील आरोहण, एका आत्म्याची काळरात्र, आध्यात्मिक स्तोत्र, प्रेमाची जिवंत ज्वाला, अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यात त्याने आध्यात्मिक जीवनाचा मूलमंत्र, तंत्र पद्धती गरज आणि गहनता ह्याचा सांगोपांग विचार सुव्यवस्थितपणे मांडलेला आहे. ह्या जगातील ऐहिक सुखापासून जो दूर आहे, जे अधिक कठीण आहे, अधिक अप्रिय आहे आणि अधिक दुःखदायक आहे त्याला मिठी मारण्यास जो तयार आहे त्यांच्यासाठी सदर पुस्तके निश्चितच कल्याणकारी आहेत.

संत जॉनची आध्यात्मिकताही खूप प्रगल्भ होती. “आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर ह्या जगातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण बाळगू नये. केवळ श्रद्धेच्या माध्यमातूनच आपला आत्मा देवाशी तादात्म्य पावू शकतो. एकरूप होऊ शकतो” असे परखड विचार त्याने अध्यात्मसंदर्भात लिहून ठेवलेले आहेत.
अध्यात्म्याच्या क्षेत्रात त्याने केलेल्या ह्या अजोड कामगिरीबद्दल पोप पायस अकरावे ह्यांनी त्याला २४ नोव्हेंबर १९२६ रोजी ख्रिस्तसभेचा विद्वान धर्मपंडित हा किताब बहाल केला.
चिंतन: जो आत्मा दैवी ज्ञानासाठी आसुसलेला असतो त्याला पहिल्या प्रथम क्रुसाला वेंगेत घेण्याची तयारी ठेवावी लागते. क्रूसभक्त संत जॉन 

 ✝️
पहिले वाचन यशया ४५: ६-८,१८,२१,२५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"हे आकाशा, वरून वृष्टी कर."

प्रभू म्हणाला, "मीच प्रभू आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी देव नाही. प्रकाशाचा जनक मीच आणि अंधकाराचाही जनक मीच. कल्याण मीच करतो आणि अरिष्टही मीच आणतो. ह्या साऱ्या गोष्टी करणारा मी प्रभू आहे. हे आकाशा, वरून वृष्टी कर. धार्मिकतेचा पाऊस पाड, हे पृथ्वी, तू उघड, म्हणजे तारण आणि धार्मिकता ही रोपाप्रमाणे उगवतील. ह्या सर्वांचा जनक मी प्रभू आहे." आकाशाचा उत्पन्नकर्ता देव प्रभू आहे. त्यानेच पृथ्वी बनवली. तिला आकार दिला आणि भक्कम केले. त्याने तिला उत्पन्न केले ते ती निर्जन राहावी म्हणून नव्हे तर लोकांनी तिच्यावर वस्ती करावी म्हणून. तेव्हा तो असे म्हणतो, "मी प्रभू आहे. माझ्याशिवाय न्यायी आणि तारणकर्ता इतर कोणी देव नाही. "
पृथ्वीवरल्या सर्व लोकांनो, तुम्ही माझ्याकडे वळा आणि आपला उद्धार करून घ्या. “कारण मी अनन्य देव आहे. मी स्वतः ची शपथ घेऊन सांगतो की, प्रत्येकजण माझ्यापुढे गुडघा टेकवील आणि माझ्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ आपल्या तोंडाने वाहील " माझ्या मुखातून सात्त्विकपणे निघालेला हा शब्द आहे त्यात बदल होणार नाही.
“न्यायनीती आणि सामर्थ्य केवळ प्रभूपाशीच आहे, असे माझ्यासंबंधी म्हणतील. ज्यांनी माझा द्वेष केला, ते लज्जित होऊन मला शरण येतील. प्रभूकडूनच इस्राएलच्या वंशजांना विजय आणि वैभव मिळेल."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८५ :९-१४
प्रतिसाद :   हे आकाशा, वरून वृष्टी कर.

१) प्रभूदेव काय म्हणतो ते मी ऐकेन, 
कारण तो आपल्या लोकांचे, 
आपल्या भक्तांचे क्षेमकुशल इच्छितो. 
त्याचे ऐश्वर्य आमच्या देशात नांदावे,
म्हणून त्याची भक्ती करणाऱ्यांचाउद्धार करायला तो सिद्ध असतो.

२) दया आणि निष्ठा यांचा संगम झाला आहे.
 नीती आणि शांती यांचे मीलन झाले आहे. 
भूमीवर मानवी निष्ठा वर झेप घेत आहे.
 स्वर्गातून देवाची न्यायपरायणता खाली डोकावत आहे.

३) खरोखर, प्रभू आमची भरभराट करील.
आमची जमीन आम्हाला पीकपाणी देईल.
नीती त्याच्या आघाडीला राहील..
शांती त्याच्या पावलांवर पाऊल टाकील.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा. 
तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक   ७:१-२३

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा."

योहानने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले की, "जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पहावी ?" ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानने आम्हांला आपल्याकडे असे विचारायला पाठवले आहे की, जो येणार आहे तो आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? त्याच घटकेला येशूने पुष्कळ लोकांना रोग, पीडा आणि वाईट आत्मे ह्यांपासून मुक्त केले होते आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टी दिली होती. मग त्याने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या योहानला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या वैभवाचे आणि गौरवाचे गुणगाण गातो. आकाशाच्या ताऱ्यांकडे पाहिल्यावर परमेश्वराच्या वैभवाची प्रचिती होते कारण तो प्रत्येक ताऱ्याला नावाने ओळखतो. प्रत्येक तारा त्याच्यासाठी मौल्यवान आहे. एका सैनिकाप्रमाणे तो ताऱ्यांचा मार्गक्रम लक्षपूर्वक पाहतो. यशया संदेष्टा म्हणतो, ज्याअर्थी परमेश्वर ताऱ्यांना ओळखतो त्याअर्थी तो प्रत्येक मनुष्याला सुद्धा ओळखतो. ह्यास्तव परमेश्वर आपल्याला कधीच विसरणार नाही. मनुष्याची संकटे आणि व्यथा परमेश्वराच्या कधीच नजरेआड नसतात. सर्वाधिकार संपन्न ईश्वराच्या पुढे कुठलेच संकट किंवा अनिष्ठ टिकणार नाही. कारण परमेश्वर पराक्रमी आहे. म्हणून शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला परमेश्वरावर भिस्त ठेवून त्याच्या चरणी आपली संकटे सोपविण्यासाठी आमंत्रण करत आहे. 'तूच मला आसरा प्रभू रे, ह्या प्रसिद्ध गीताचे शब्द आठवून ख्रिस्तावर विसंबून राहण्यासाठी विशेष प्रार्थना करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, आमच्या जीवनात ये आणि आमच्या जीवनाचा ताबा घे, आम्हाला सर्व पापांपासून दूर कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या