Marathi Bible Reading | Wednesday 21st December 2022 | 4th week of Advent

आगमनकाळातील चौथा  सप्ताह   

बुधवार २१  डिसेंबर  २०२२

“स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून?  




 संत पीटर कनेशिअस

वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५२१-१५९७)

 ✝️

 पवित्र मरिया मातेसारखे प्रार्थनामय, श्रद्धापूर्ण आणि आणि सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला तिच्या गुणांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. म्हणूनच मरिया भक्तीद्वारे आपण प्रभू येशूच्या रहस्यमय जीवनात सहभागी होऊ या.

 

पहिले वाचन गीतरत्न :८-१४
वाचक : गीतरत्न या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"पाहा, माझा वल्लभ; डोंगरावरून उड्या टाकीत येत आहे."
हा माझा वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या टाकीत, टेकड्यावरून दौडत येत आहे ! माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे. पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे. तो खिडकीतून डोकावत आहे. तो झरोक्यातून पाहत आहे.
माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. पाहा, हिवाळा गेला आहे. पाऊस संपून गेला आहे. पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत. पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे.
आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत. द्राक्षवेलीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे. माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशाला राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे, कारण तुझा कंठ मधुर आहे. तुझे मुख रम्य आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३३:२-३,११-१२,२०-२१
प्रतिसाद :  प्रभूशी एकरूप होऊन आनंदित व्हा.

१) वीणेवर प्रभूच्या उपकारांचे स्मरण करा. 
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. 
त्याच्याकरिता एखादे नवे गीत गा. 
वीणेवर आपली कला पणाला लावा. 
आनंदाने गजर करा.

२) प्रभूची योजना सदैव टिकते 
त्याच्या मनातले विचार पिढ्यान्पिढ्या अढळ असतात. 
प्रभू ज्या राष्ट्राचा देव, तेच सुखी. 
प्रभूने त्यांना लोक म्हणून निवडलेले आहे.

३)आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे. 
तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल. 
आमच्या मनाला होणाऱ्या आनंदाचा उगम 
त्याच्याच ठायी आहे. 
त्याच्या पवित्र नामावर आमचा भरवसा आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
सकाळच्या नक्षत्रा, चीरप्रकाशाच्या तेजा, 
नीतिसूर्या, ये आणि अंधारात राहाणाऱ्यांना 
आणि मृत्यूच्या छायेत असलेल्यांना प्रकाशित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:३९-४४

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?"

मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावाला त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशबेला अभिवादन केले. अलिशबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने हालचाल केली व अलिशबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, “स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात मरियेची अलिशिबेला भेट ही घटना कथन केली आहे. गाब्रिएल देवदूताने मरियेला संदेश देताना घोषणा केली होती की, येशू हा नवीन दाविद राजा असेल. (लूक १:३२). हा संदेश मनात ठेवून मरिया मोठ्या उत्साहाने अलिशिबा, याजक जखऱ्याची | बायको हिला भेटावयास यहूदातील एका डोंगराळ प्रदेशातील गावात घाईघाईने गेली. याच यहूदा प्रांतात दाविद राजाला कराराचा कोश सापडला होता. जे परमेश्वराच्या सतत सहाय्याचे प्रतीक होते. याच टेकडीवर आता मरिया येते जी देवपुत्राची आई होणार आहे. (लूक१:४३). अर्थात मरियेचा गर्भाशय हा नवीन कराराचा कोश आहे. त्यात परमेश्वर वस्ती करतो. पुढे अलिशिबा घोषणा करून म्हणते, “तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली", हा बाळक योहान बाप्तिस्ता असून नवीन कराराच्या कोशापुढे दाविद राजाच्या नृत्याची नक्कल करतो. महान राजापुढे आराधनेचे कृत्य, मरिया व अलिशिबा इस्रायलच्या गोरगरिबांचे प्रतीक आहे ते तारणकर्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. या आगमन काळात प्रभू येशूची जन्माची तयारी करीत असताना पुन्हा एकदा आध्यात्मिक तयारी करून आतुरतेने ख्रिस्ताच्या स्वागतासाठी तत्पर राहूया.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, श्रद्धेने व निष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या