Marathi Bible Reading | Saturday 14th January 2023| 1st Week in Ordinary Time


 सामान्यकाळातील पहिला सप्ताह

  शनिवार  दि.१४ जानेवारी  २०२३


मी नीतिमानांस नव्हे तर पापी जनांस  बोलवावयास आलो आहे."

✝️




धन्यवादीत देवसहायम् पिल्लय
रक्तसाक्षी
(२३ एप्रील १७१२ - १४ जानेवारी १७५२)
 पोप फ्रान्सिस हे देवसाय पिल्लई ह्यांना १५ मे २०२२ रोजी संत म्हणून घोषित करतील

देवसहायम् पिल्लय (जन्माच्या वेळचे मूळ नाव निळकंठ पिल्लय) ह्यांचा जन्म एका श्रिमंत नायर समाजातील कुटूंबात नत्तालम् ह्या सध्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील ठिकाणी २३ एप्रील १७१२ रोजी झाला होता. नायर समाजातील तत्कालीन मातृसत्ताक परंपरेत देवसहायम् पिल्लय ह्यांची जडनघडन त्यांच्या मामांनी केली, आणि लवकरच त्यांना हिंदू श्रद्धा व परंपरा ह्यांचेही ज्ञान झाले.

     देवसहायम् ह्यांच्या  कुटूंबावर त्रवणकोरचे राजे महाराजा मारतंड वर्मा ह्यांच्या शाही महालाचा प्रभाव होता, आणि देवसहायम् तरुणपणी महालात सेवेसाठी रुजू झाले. त्यांच्या क्षमता व उत्साह महालात दुर्लक्षीत राहिला नाही, त्यामुळे लवकरच त्यांना त्रवणकोरचे दिवण रामायन दलावा ह्यांच्या अधिकाराखाली राज्यातील घडामोडींचे अधिकृत प्रमूख म्हणून नेमण्यात आले.

 ख्रिस्ती श्रद्धेत परिवर्तन:

१७४१ मध्ये एड डच नौदल कमांडर कॅप्टन युस्टाचीयस डी लॅनॉय ह्यांना डच इंस्ट इंडिया कंपनी मार्फत त्रवणकोरच्या अखत्यारीत असलेल्या कोलाचेल ह्या बंदरावर नौदलाच्या एका मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. त्रवणकोरचे सैन्य आणि डि लॅनॉय ह्यांची माणसे ह्यांच्यात झालेल्या लढाईत डच सैन्यांची हार झाली आणि त्यांची अनेक माणसे मारली गेली व अनेक कैद करण्यात आली. युस्टाचियस डी लॅनॉय, त्याचा साथीदार डोनाडी आणि आणखी काही डच सैनीक कैदेत ठेवण्यात आले.

डी लॅनॉय व त्याच्या सैनिकांना नंतर राजाकडून ह्या अटीवर अभय मिळाले की ते त्रवणकोरच्या लष्करात सेवा देतील. डी लॅनॉय नंतर अनेक लढाया जिंकून व अनेक शेजारील राज्ये त्रवणकोरला मिळवून देऊन राजाची मर्जी संपादन करून त्रवणकोर लष्करात कंमांडर बनला.

 राजाच्या मर्जीत असतानात डी लॅनॉय आणि देवसहायम् पिल्लय ह्यांचा चांगला परिचय झाला. डी लॅनॉयच्या ख्रिस्ती श्रद्धेत देवसहायम् ह्यांना रसवाटू लागला आणि डी लॅनॉय कडून त्यांच्या मनात ही श्रद्धेची ज्योत प्रज्वलीत केली ज्याचे पर्यावसन १७४५ सालच्या त्यांच्या धर्मपरिवर्तनात झाले.

स्नानसंस्कार: ख्रिस्ती श्रद्धेचा स्विकार करून देवसहायम ह्यांनी वडक्कनकुलम गावातील(आताच्या तमीलनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील) रोमन कॅथोलीक लॅटीन राईट चर्च मध्ये बाप्तीस्मा घेतला, जिथे येशुसंघीय धर्मगुरू मठ चालवीत असत. निळकंठ पिल्लय हे त्यांचे जन्माच्या वेळचे नाव त्यावेळी बदलून लाझर ठेवण्यात आले तरी ते त्यांच्या नावाच्या तमीळ व मल्याळम भाषांतराने बनणारे देवसहायम ह्या नावानेच सगळीकडे सुपरिचीत आहेत(ज्याचा अर्थ होतो देवाचे सहाय). तोपर्यंत त्यांचा विवाह त्रवणकोर मधील भार्गवी अम्मल ह्यांच्याशी झाला होता. पतीकडून त्यांचेही पुढे मनपरिवर्तन होऊन त्यांनीही ख्रिस्ती श्रद्घा स्विकारली. त्यांना बाप्तीसम्याच्या वेळी ग्नानापू अम्मल(ज्याचे तमीळ व मल्याळम भाषांतर तेरेसा असे होते) हे नाव देण्यात आले होते. धर्मांतरामुळे त्यांच्या गावात त्यांच्या विरुद्घ उठलेल्या रोशाच्या भीतिने तिने त्या गावचे विस्थापीत नागरीक म्हणून राहणे पसंत केले. देवसहायमच्या कुटुंबियांनीही नंतर बाप्तीसमा स्विकारला.

चर्च इतिहासकार सांगतात की, राज्यातील ब्राहामण मुख्य पुरोहीत, सामंत स्वामी, राजघराण्याचे सदस्य आणि नायर समाजाने दिवान रामायन देलावा ह्यांच्यासमोर देवसहायमवर चुकीचे आरोप केले. देवसहायम ह्यांना त्यांच्या सेवेतून पदच्यूत करण्यात आले आणि त्यांच्यावर राजद्रोह केल्याचा व राज्याची गुपिते प्रतिस्पर्धी   युरोपीयन ह्यांच्यासमोर फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना नंतर अटक करण्यात आली व तीन वर्षे त्यांचा छळ करण्यात आला.

नीलकंठ पिल्लई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ मध्ये त्रावणकोर राज्यातील  एका हिंदू कुटुंबात झाला.  ते त्रावणकोरचे महाराज मार्तंड वर्मा यांच्या दरबारात अधिकारी म्हणून कार्य करत होते. सदरच्या काळात त्यांची ओळख डच नाविक कॅप्टन युस्टाशिअस डे लेनाॅय यांच्याशी झाली. कॅप्टननी निलकंठ  ह्यांना कॅथोलिक विश्वासाची ओळख दिली व ख्रिस्ती श्रद्धेत मार्गदर्शन केले. बाप्तिस्माच्या वेळी त्यांनी देवसहाय्यम (लाजरस) हे नाव घेतले.  त्यांनी आपला कॅथोलिक विश्वास जाहीर केल्यामुळे त्रावणकोर राज्यात त्यांना  रक्तसाक्षी म्हणून मरण आले इसवी सन 2004 मध्ये कोट्टर डायोसिस, तामिळनाडू विशपांची काउंसिल व भारतीय कॅथोलिक बिशपांची परिषद यांनी देवसहाय्यम पिल्लई यांच्या धन्यवादिपणाची प्रक्रिया सुरू करण्याविषयी वॅटिकनला विनंती केली. 28 जून 2012 रोजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी संती करण्याची प्रक्रिया पाहणाऱ्या संघटनेला/ समितीला देवसहाय्यम पिल्लई यांना आशीर्वादित रक्तसाक्षी म्हणून त्याविषयी योग्य कार्यवाही करण्याविषयी सूचना केली. 2 डिसेंबर 2012 रोजी दक्षिण भारतातील कॉटर कॅथलिक डायलिसिस मधील नागरकोईल येथे देव सहायम पिल्लई यांचं धन्यवादितपणाचा व रक्तसाक्षी म्हणून बहुमान करण्याचा विधी पोपचसाहेबांचे  प्रतिनिधी कार्डिनल अांजेलो अमातो यांच्या पौरोहित्याखाली पार पडला. देवसहाय्यम  हे पहिले भारतीय प्रापंचिक आहेत ज्यांना धन्यवादित घोषित करण्यात आले आहे. आणि कॅथोलिक कॅनल लाॅ च्या अनुषंगाने त्यांचं संतीकरणाच प्रक्रिया ही फक्त एक पाऊल अजून बाकी आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी पोप फ्रान्सिस ह्यांनी देवसहाय्यम यांच्या मध्यस्थीने झालेल्या चमत्काराला अधिकृत मान्यता दिली. आणि त्यांच्या संती करणाची प्रक्रिया पुढे चालवावी असे सांगितले



पहिले वाचन इब्री  :१२-१६

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

 आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.

देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्यांच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे.

तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर स्वीकारला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलता विषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही. तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहीला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १९:८,९,१०,१५

प्रतिसाद : प्रभो, तुझी वचने ही आत्मा आणि जीवन अशी आहेत.

१ परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहेत, 

ते मनाचे पुनरुज्जीवन करते, 

परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, 

तो साध्याभोळ्यांस शहाणपण देतो.


२ परमेश्वराचे नियम सरळ आहेत, 

ते हृदयाला आनंदित करतात. 

परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 

ती नेत्रांना प्रकाश देते.


३ परमेश्वराचे भय शुद्ध आहे, 

ते सर्वकाळ टिकणारे आहे. 

परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, 

ते सर्वथैव न्याय्य आहेत.


४ हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, 

माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द 

आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असोत.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. 

म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.

आलेलूया !

शुभवर्तमान मार्क २: १३-१७

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे."

येशू तेथून निघून समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला, तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला तेव्हा त्याने त्याला म्हटले, "माझ्यामागे ये," तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.

नंतर तो त्याच्या घरी जेवावयास बसला. तेथे बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीत बसले. तेव्हा त्याला जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून परुश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याच्या शिष्यांना म्हटले, "हा जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, "निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना बोलवावयास आलो आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  देवाच्या एका वचनाद्वारे माणसाच्या संपूर्ण जीवनाचे अवलोकन होऊन त्यामध्ये पूर्ण बदल व परिवर्तन होऊ शकते. प्रभू येशूच्या  केवळ एका हाकेने जकातदार लेवीला पाचारण मिळाले.

 प्रभू येशूला माणसाच्या जीवनातील योग्यता  व अयोग्यता सर्व ठावूक आहे. कोण कसा आहे व कोणास कशाची गरज आहे  हे तो जाणतो म्हणूनच तो म्हणतो 'मी नीतिमानांस नव्हे तर पाप्यांस बोलवावयास आलो आहे'. अस म्हणतात की देव वाकड्या रेषेत सरळ  लिहितो, त्याप्रमाणे तो कोणत्याहि व्यक्तीची निवड करुन त्याच्याद्वारे महान  कार्य घडवून आणू शकतो. 
 देवाचे वचन ग्रहण करुन प्रभू येशूच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाचे जीवन पूर्णपणे बदलू शकते.

प्रभू आपल्या प्रत्येकाला बोलावून सांगत असतो, 'माझ्या मागे ये.' आपण त्याच्या वचनावर चिंतन करुन आपण प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आचरण करतो का? आपल्या प्रत्येकाला  प्रभू येशूने देवाची सुवार्ता सांगण्यास पाचारण केलेले आहे. 


प्रार्थना : हे प्रभू येशु, तुझी हाक ऐकण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन  आचरण करण्यास मला प्रेरणा व शक्ती दे, आमेन



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या