Marathi Bible Reading | 15th January 2023| 2nd Sunday in Ordinary Time


 सामान्यकाळातील दुसरा 

  रविवार  दि.१५ जानेवारी  २०२३


'ज्या कोणावर आत्मा उतरत असताना आणि स्थिर राहताना पाहशील तोचपवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.'

✝️






हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू!

 यशया संदेष्टा इस्त्राएल घराण्याला सर्व राष्ट्रांचा प्रकाश होण्याकरिता पाचारणाचा संदेश देत आहे. इस्त्राएल घराण्यातूनच सर्वांचा उद्धारकर्ता व तारणारा जन्माला येणार असल्याची शाश्वती यशयाने दिली. त्या तारणाऱ्याची सुवार्ता विश्वाच्या दिगंतापर्यंत घोषविण्यासाठी यशयाने आवाहन केले आहे.

जगाचे पाप हरण करणारा व जगाला तारणारा एकमेव प्रभू येशू, सर्वांपर्यंत त्याचा प्रकाश व त्याची सुवार्ता पोहोचली पाहिजे. योहान बाप्तिस्ताने जशी साक्ष दिली तशीच साक्ष प्रभू येशूविषयी आपण सर्वांना देता यावी म्हणून कृपा मागू या. त्याची वाणी ऐकू या.



पहिले वाचन यशया  ४९:३,५-६

वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

“माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."

परमेश्वर मला म्हणाला, “तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.” परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि तो माझा देव, माझे सामर्थ्य झाला. तो परमेश्वर म्हणतो, “याकोबच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही विशेष नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४०:२,४,७-१०

प्रतिसाद : हे परमेश्वरा, हा बघ मी आलोच ! मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे.

१ )मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली ते

व्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. 

त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.


२) यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही, 

तू माझे कान उघडले आहेत. होम आणि 

पापांबद्दल तू अर्पण मागत नाहीस. 

ह्यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे."


३) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, 

हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे.

तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.


४) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले. 

हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


दुसरे वाचन :  १ करिंथ १:१-३

वाचक :  पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो."

करिंथ येथील देवाच्या मंडळीस, ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या आणि पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा आणि आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला मी पौल आणि आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो!

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलूया,आलेलूया !

हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. 

सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. 

आलेलूया !

शुभवर्तमान योहान १:२९-३४

वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू."

येशूला आपणाकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू! 'माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता,' असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो. तरी त्याने इस्राएलला प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो. तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते 'ज्या कोणावर आत्मा उतरत असताना आणि स्थिर राहताना पाहशील तोचपवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.' मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताविषयी योहान बाप्तिस्ताने साक्ष देत म्हटले की, 'हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.' जगातील सर्व प्रकारच्या अंधकाराचा आणि पापाचा नाश करून तारणाचा प्रकाश बनून स्वतः प्रभू  येशू ख्रिस्त जगात आला. सर्वांच्या पापांचा नाश करण्यासाठी तो स्वतः देवाचा कोकरा बनून त्याने स्वतःचा यज्ञ बळी समर्पित केला.  संत पौलाप्रमाणे आपल्या सर्वांना जगाचा प्रकाश बनण्यासाठी पाचारण आहे.  प्रभू येशूची देवराज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी आपल्या सर्वांना आज प्रभू व ख्रिस्तसभा बोलवित आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच जगाचा प्रकाश आहेस हे सत्य जाणण्यास व तुझा तारणदायी प्रकाश इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रेरणा, सामर्थ्य व कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या