Marathi Bible Reading | Thursday 12th January 2023| 1st Week in Ordinary Time


 सामान्यकाळातील पहिला सप्ताह

  गुरुवार  दि.१२ जानेवारी  २०२३

जोपर्यत 'आज' म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. 


 संत बेनेडिक्ट बिस्कोप

(मठाधिकारी, वर्तनसाक्षी (६२८-६९०))



पहिले वाचन इब्री  :७-१४

वाचक :इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

    पवित्र आत्मा म्हणतो, 'आज जेव्हा तुम्ही त्याची वाणी ऐकाल तेव्हा रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.' त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, 'हे सतत भ्रमिष्ट अंत:करणाचे लोक आहेत, ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.' म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, 'हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही.' बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हांतील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यत 'आज' म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ ठेवला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार ठरु.


हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९५:६-१२

प्रतिसाद : आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!

१)चला, आपण त्याला नमन करु 

आणि त्याच्यापुढे लोटांगण घालू. 

आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वरापुढे आपण गुडघे टेकू या 

कारण तो आपला देव आहे आणि 

आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो.


२) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! 

मरिबा येथल्याप्रमाणे, ओसाड प्रदेशात मस्सा येथील 

प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे 

तुम्ही आपली मने कठीण करू नका. 

तेव्हा तुमच्या वडिलांनी माझे कार्य पाहिले होते 

तरीही त्यांनी माझी परीक्षा पाहिली आणि माझी कसोटी घेतली.


३) चाळीस वर्षे त्या लोकांनी मला वैताग आणला 

आणि मी म्हणालो : हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, 

त्यांना माझे मार्ग कळलेले नाहीत. 

म्हणून मी रागाने शपथ वाहिली: 

ह्यांना माझ्या विश्रामस्थानी मुळीच प्रवेश द्यायचा नाही.


जयघोष

आलेलूया,आलेलूया !

हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या धर्मशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

आलेलूया,


शुभवर्तमान मार्क   १:४०-४५

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. "

 एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, "आपली इच्छा असली तर मला बरे करायला आपण समर्थ आहा." तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, बरा हो,” तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, "पाहा, कोणाला काही सांगून नको. प्रमाण पटावे म्हणून जाऊन स्वत:स याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले आर्पण कर." पण त्याने तेथे जाऊन घोषणा करुन त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना. म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला, तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात येशूच्या दयाळू स्वभावाचा आपणांस परिचय होतो. नियम मोडलेल्या माणसाला येशू दूर लोटत नाही. कुष्ठरोग्याला त्याच्या बरोबर बोलण्याचा अधिकार नव्हता तरी येशू मानवी गरजेची असमानता ओळखून, समंजसपणाने आणि दयाळूपणाने त्याला भेटतो. 
येशू आपला हात पुढे करून त्याला स्पर्श करतो. तो अशुद्ध माणसाला स्पर्श करतो. तो येशूसाठी अशुद्ध नाही तर एक साधाभोळा मनुष्य आहे. 
त्याला शुद्ध केल्यावर येशू त्याला नियमाची किंवा विधीची पूर्तता करण्यासाठी पाठवतो. त्याद्वारे मानवी प्रेम आणि मानवी नीतिमत्ता ह्या प्रती येशूचा आदर दिसून येतो. आजच्या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात येशूची दया, सामर्थ्य आणि त्याचा शहाणपणा दिसून येतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेने तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास मला प्रेरणा व  कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या