सामान्यकाळातील पहिला सप्ताह
बुधवार दि.११ जानेवारी २०२३
शुभवर्तमान मार्क १:२९-३९
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना बरे केले. "
येशू सभास्थानातून निघाल्यावर तो लगेच याकोब आणि योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रेया ह्यांच्या घरी गेला. शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
त्या सायंकाळी, सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजाऱ्यांस आणि भूतग्रस्तांस त्याच्याकडे आणले आणि सबंध शहर दाराशी लोटले. तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पीडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले आणि अनेक भुते काढली. त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांस बोलू दिले नाही.
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले आणि तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करीत आहेत." तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे." मग तो सबंध गालिलात त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.
✝️
0 टिप्पण्या