Marathi Bible Reading | Tuesday 10th January 2023| 1st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह

  मंगळवार दि.१० जानेवारी  २०२३

"हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात."



संत आगाथो थोमातुर्गस
परमगुरू, वर्तनसाक्षी (६८१)

इटली येथील सिसिली नावाच्या प्रांतात राहणारा आगाथो ह्याने २० वर्षे वैवाहिक जीवनात घालविली. त्यानंतर ऐहिक सुखाचा त्याग करून पालेर्मो आणि नंतर रोम येथील बेनेडिक्टाईन मठवासी म्हणून जीवन जगण्यास त्यांनी सुरूवात केली.

ख्रिस्ती परंपरेपुनार जेव्हा पोपपदी त्यांची निवड झाली तेव्हा त्यांचे वय १०० वर्षांहून अधिक होते. इ. स. ६७८ साली त्यांना पोपपदी नियुक्त करण्यात आले होते. आपल्या तीन वर्षांच्या परमाचार्यपदाच्या कारकीर्दीत त्यांनी कनवाळूपणा, ममता आणि हसतमुख चेहऱ्यांने सर्वांच्या हृदयांवर राज्य केले.

ह्या त्यांच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत (६७८-८१) कॉस्टॅन्टिनोपल येथे भरलेली सहावी विश्वपरिषद विशेषरित्या यशस्वी ठरली. त्याच्या निमित्ताने त्यांनी पाश्चात्य ख्रिस्तसभेत अनेक बैठका, महासभा व परिषदा बोलावल्या. वृध्दत्वामुळे त्यांना अशा महत्त्वाच्या बैठकांना जाता आले नाही; परंतु आपल्या विद्वान आणि श्रद्धावंत अशा, विश्वासू प्रतिनिधीमार्फत त्यांनी ह्या विश्वपरिषदेची जय्यत तयारी केली.

प्रभू येशू ख्रिस्ताच्या केवळ मानवीपणावर श्रद्धा ठेवणाऱ्या पाखंडी मतवाद्यांविरुद्ध आगाथो ह्या पोपमहोदयांनी विशेष आवाज उठविला आणि खरी ख्रिस्ती श्रद्धा (येशूचा मानवी आणि दैवी स्वभाव) प्रकट करणारे एक अधिकृत परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केले. त्या परिपत्रकाचे विश्वपरिषदेमध्ये आणि संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेमध्ये मोठ्या आदरातिथाने स्वागत झाले. “संत पीटर आगाथोच्या मुखातून बोलला" हे वचन सर्वांच्या तोंडून निघाले. परंतु पाखंड- मतवादयाविरूद्धची ही शिकवण रोममध्ये पोहोचण्याआधीच पोपमहाशयांचा मृत्यू झालेला होता.

पोप आगाथो ह्यांना थॉमातुर्गस ही पदवी अथवा उपनाव देण्यात आलेले आहे. कारण त्यांच्या हातून अनेक अद्भूत कृत्ये आणि चमत्कार घडत असत. त्यांनी इंग्लंड येथे अत्यंत सुरेख आवाजात गायन करणारे गायक, गायिका व गायकवृंदांचे नेते पाठवून रोमन उपासनागीतांचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला.


पहिले वाचन इब्री २:५-१२

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहो ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे :

"मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? तू त्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले आहे, तू त्याला गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, तू सर्व काही त्याच्या अधीन-त्याच्या पायांखाली ठेवले आहे.' 

सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही. परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.

कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो प्रवर्तक त्याला दु:खसहनाद्वारे त्याने परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत; ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, "मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन."

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ८:२,५-९

प्रतिसाद :प्रभो, आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला स्वामित्व दिले आहेस.

१) हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, 

साऱ्या भूतलावर तुझे नाम कितीतरी थोर आहे! 

तू मर्त्य मानवाची आठवण करावी, 

क्षुद्र मानवजातीची तू पर्वा करावी, असा तो कोण?


२) तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस; 

त्याला वैभव आणि मोठेपणा ह्यांनी अलंकृत केले आहेस, 

आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस, 

सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस. 


३) शेरडेमेंढरे, गुरे ढोरे, 

अगदी एकूणएक जंगली जनावरे, आकाशातली पाखरे, 

समुद्रातले मासे, सागरात संचार करणारे 

प्राणी देखील तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
माझ्या प्रभो, तुझा मार्ग मला दाखव, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क १: २१-२८

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

   येशू आणि त्याचे शिष्य कफर्नाहुमस  गेले आणि लागलेच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो ओरडून म्हणाला "हे येशू नाझरेथकरा तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय ? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच." परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, "गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ , तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, "हे आहे तरी काय ? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात." ही त्याचा कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन: 'प्रभू येशु ख्रिस्ताचा अधिकार स्वर्ग आणि पृथ्वी व्यापून टाकणारा आहे. संत पौलाने म्हटले आहे. 'स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखालील प्रत्येक गुढघा प्रभू येशूच्या नावाने टेकला जाईल आणि जीभ कबुली देईल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे' (फिलिपै २:१०).  येशू ख्रिस्ताला शरण जाऊन आपण आपले सर्वस्व म्हणून त्याला स्वीकारले आहे  तर मग कोणत्याही दुष्ट शक्तीची किंवा सैतानाची आपल्याला भीती असता कामा नये.
सर्व अधिकार प्रभू येशूकडे सोपविले आहेत. म्हणूनच तर येशूने अधिकारयुक्त वाणीने अशुद्ध आत्म्याला एका माणसातून बाहेर काढले. प्रभू येशू देवाचा पुत्र म्हणजेच देव आहे. त्याचा अधिकार सर्वव्यापी आहे.
प्रभू येशूच्या नावाने आपण अशुद्ध आत्म्याला हाकलून लावू शकतो.

प्रार्थना :  तुझ्या वचनावर व सामर्थ्यवर अवलंबून विश्वासाने जीवन जगण्यास प्रभू येशू आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या