एकदा एका मुलाच्या घशात मासळीचा काटा अडकला होता. त्यामुळे तो मुलगा तडफडून मरण्याची शक्यता होती. त्या मुलाला बिशप ब्लेस ह्यांनी वाचवले. त्यावेळेपासून घशाच्या विकारांपासून मुक्ती मिळावी म्हणून संत ब्लेस ह्यांचा धावा केला जातो. दोन मेणबत्त्यांचा क्रूस करून तो भाविकांच्या गळ्यावर ठेवत धर्मगुरू त्यांना संत ब्लेसचा आशीर्वाद देतात.
मध्ययुगीन काळात तो इतका प्रसिद्धीस आलेला होता की एकट्या रोम शहरात ३० ख्रिस्तमंदिरांना संत ब्लेसचे नाव देण्यात आलेले आहे. लोकर कमावणारे, मेण गोळा करणारे, बांधकाम करणारे आणि वैद्य इत्यादींच्या १४ पवित्र सहाय्यक व आश्रयदात्या संतांपैकी तो एक मानला जातो.
तारणाच्या इतिहासात अनेकदा संदेष्ट्यांचा सन्मान त्यांच्या स्वकीयांत झाला नाही. प्रभू येशू इतर गावांमध्ये शिक्षण देत व अद्भूत कृत्ये करीत राहिला. प्रभू येशूला स्वत:च्या गावात आणि नातेवाईकांत देवाचे कार्य करताना नकारात्मक अनुभव आला. तसाच अनुभव आपल्याला सुध्दा येऊ शकतो. आजच्या शुभवर्तमानावर आपण चिंतन करु या. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना आपल्याला सुद्धा अशा लोकांच्या नकारात्मक व संदेहात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. मात्र देवावरील एकनिष्ठा आणि श्रद्धेची ती कसोटी आहे. त्यासाठी सर्वदा सकारात्मक बनून देवावरील श्रद्धेत दृढबनण्याचा आपण प्रयत्न करुया.
✝️
पहिले वाचन इब्री लोकांस पत्र १३:१-८
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
बंधुप्रेम टिकून राहो. अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण ते करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहा असे समजून त्यांची आठवण करा; आपणही शरीरधारी आहो म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्व आदरणीय असावे आणि अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी आणि व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण त्याने स्वत: म्हटले आहे, "मी तुला सोडून जाणार नाही आणी तुला टाकणार नाही." म्हणूनच आपण धैर्याने म्हणतो,
प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?"
जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे.
हा प्रभूचा शब्द .
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र २७:१,३,५,८-९
प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे सहाय्य आहे.
१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे सहाय्य आहे,
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे,
मी कोणाचे भय धरू?
२) सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी
माझे हृदय कचरणार नाही,
माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही
मी हिंमत धरून राहीन.
३) कारण विपत्काली मला तो
आपल्या मंडपात लपवून ठेवील.
मला तो आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवील,
तो मला उंच खडकावर सुरक्षित ठेवील.
४) हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे;
तू आपले मुख माझ्या दृष्टिआड करू नको.
आपल्या सेवकाला रागाने दूर लोटू नको;
तू माझे सहाय्य होत आला आहेस.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
हे परमेश्वरा, तुझ्या नियमानुसार चालण्यास मला शिकव आणि ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे.
आलेलूया !
शुभवर्तमान मार्क ६:१४-२९
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
हेरोद राजाने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, "बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत.” कोणी म्हणत, "हा एलिया आहे," कोणी म्हणत, "हा संदेष्टा, म्हणजे संदेष्ट्यांपैकीच एक आहे." परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, "ज्या योहानचा मी शिरच्छेद केला, तोच उठला आहे." आपला भाऊ फिलीप ह्याची बायको हेरोदिया, तिच्याबरोबर लग्न केले होते म्हणून योहान त्याला म्हणत असे, "तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे शास्त्र नाही.' ह्याकरिता हेरोदने स्वत: माणसे पाठवून योहानला पकडून कैदेत जखडून ठेवले होते व हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना; कारण योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके, तेव्हा फार गोधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक सोयीस्कर दिवस आला. तेव्हा हेरोदने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार आणि गालिलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली आणि हेरोदियाच्या मुलीने स्वत: आत जाऊन आणि नाच करून हेरोदला आणि त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूष केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही हवे ते माझ्याजवळ माग, मी ते तुला देईन. माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन,"असे तो शपथ वाहून तिला म्हणाला, तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, "मी काय मागू?" ती म्हणाली, "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचे शीर." तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, "माझी अशी इच्छा आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचे शीर तबकात घालून आताच्या आता मला द्यावे." तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि दिलेल्या वचनामुळे आणि भोजनास बसलेल्या लोकांपुढे त्याला तिला नाही म्हणता आले नाही. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायाला पाठवून योहानचे शीर आणावयाची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले आणि मुलीने ते आपल्या आईला दिले. हे कळल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यानी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: इब्री लोकांना पाठवलेल्या पत्रात परमेश्वर आपणांस म्हणतो, जीवन कसे जगावे ? जीवन जगण्याचा उद्देश काय असावा ? जीवन का जगावे ? परमेश्वर आपणांस म्हणतो, “देवाला आनंद देणारे जीवन जगावे.” आता देवाला आनंद देणारे जीवन म्हणजे काय? त्यामध्ये कोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात? माणसा-माणसांमध्ये बंधुप्रेम असावे. माझा शेजारी, माझे कुटुंबीय यांच्यामध्ये बंधुभाव असावा. एकमेकांचा आदर सन्मान करावा. परस्त्री पुरुषाबरोबर व्यभिचार करू नये व परमेश्वराने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांमधील सर्वात शेवटची आज्ञा म्हणजे परधनाचा लोभ धरू नये, म्हणजेच लुबाडणूक, फसवणूक करून इतरांची संपत्ती हडप करू नये. परमेश्वर म्हणतो जेव्हा आपण इतरांना दुःख, त्रास देतो तेव्हा त्यांना होणाऱ्या गंभीर अन्यायास आपण जबाबदार असतो. त्याचे प्रतिफळ आपणांस मिळत असते. राजा हेरोदाने आपल्या भावाच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला. जॉन द बॅप्टीस्ट यांनी हेरोद राजाला पश्चात्ताप करण्याचे व या दृष्ट मार्गापासून दूर जाण्याचा सल्ला दिला. परंतु जॉन द बॅप्टीस्ट यांचा सल्ला ऐकण्याचे सामर्थ्य हेरोदाकडे नव्हते, म्हणून राजा हेरोदाने जॉन द बॅप्टीस्ट यांचा शिरच्छेद केला. आपल्या हातून झालेल्या कोणत्याही चुकांचे अथवा आपल्याकडून झालेल्या अन्यायाची कबूली करण्यासाठी पश्चात्ताप हा एकमेव मार्ग आहे.आपल्यामुळे एखाद्याचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देऊन आपण पश्चात्ताप करू शकतो.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच आमचे सर्वस्व आहेस. तुला आम्ही शरण आलो आहोत, आमचा स्वीकार कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या