वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला तर पुष्कळ पीक देतो."
सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते, त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रेयाला सांगितले आणि आंद्रेया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल, जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.
आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू ? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मीह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली, दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ख्रिस्तसभा आज संत जॉन दिब्रीटोचा सण साजरा करीत आहे. भारतीय लोकांच्या स्थानिक संस्कृतीमध्ये ख्रिस्ती धर्माचा विश्वास मिसळून त्यांनी कार्य केले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्युनंतर संत जॉन भारतातील मदुराई या ठिकाणी आला व आपल्या प्रेषितीय कार्याला सुरूवात केली. लोकांना आपलेसे करण्यासाठी सर्वप्रथम लोकांमध्ये मिसळणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले म्हणून संत जॉन यांनी आपल्या स्वतःच्या संस्कृतीचा त्याग केला व स्थानिक लोकांची संस्कृती स्वीकारली. जेणेकरून लोकांना समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी समजणे हे सर्व सोपे होईल. त्यांनी आपले नाव बदलले. आपला उंची पोषाख, राजेशाही राहणी या सर्वांचा त्याग केला. लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी भाषा हा महत्वाचादुवा होता म्हणून सेंट जॉन हे स्थानिक भाषा शिकले मांसाहारी अन्नाचा त्यांनी त्याग केला व शाकाहारी अन्न पद्धती स्वीकारली. या सर्व त्याग करण्याच्या पद्धतीमुळे लोकांनी जॉनला लगेच स्वीकारले व आपलेसे केले. संत पौलांनी करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये आपल्याला समजते की, लोकांना , ख्रिस्ताकडे आणण्यासाठी त्यांनी समान धोरण स्वीकारले. तो सर्व लोकांसाठी सर्वकाही बनला. सर्व लोकांसाठी सर्व गोष्टी बनणे सोपे नसते व त्यासाठी येशू ख्रिस्ताने शुभवर्तमानात दिलेल्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो जोपर्यंत तुम्ही स्वतः मरत नाहीत तोपर्यंत तुम्हाला फळ मिळणार नाही.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास मला तुझे सामर्थ्य व कृपा, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
0 टिप्पण्या