Marathi Bible Reading | 5th February 2023 | 5th Sunday in Ordinary Time |

सामान्यकाळातील पांचवा रविवार 

 दि.५ फेब्रुवारी  २०२३

“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा;


"तुम्ही जगाचा प्रकाश आहात. "

✝️

प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांना दोन महान उपमा दिल्या आहेत. मीठ आणि प्रकाश. मीठामुळे अन्न पदार्थ रुचकर बनतात. मीठ घालून अनेक पदार्थ खूप दिवस टिकवून ठेवता येतात. मीठाचा गुणधर्म विशेषतः रुचकरपणा आणण्यासाठी आहे, व तो गुणधर्म म्हणजे खारटपणा. प्रकाश म्हणजे अंधाराचे नाहिसेपण. प्रकाश म्हणजे आनंद, प्रकाश म्हणजे पारदर्शकता, प्रकाश म्हणजे  प्रसन्नता. ख्रिस्ती माणसाने दुसऱ्यांसाठी मीठ आणि प्रकाश बनावे ह्यासाठी प्रभूयेशू  बोलावित आहे.

ख्रिस्ती माणसांना पवित्र व प्रकाशाचे जीवन जगून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास व त्यांना ख्रिस्ताचा तारणदायी प्रकाश देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. जिथे दुःख आहे, भूकेने व्याकूळ माणसे आहेत, ज्यांच्या जीवनात निबिड अंधकार आहे तिथे प्रकाशाचा दीप लावण्यासाठीच ख्रिस्ती माणसाचे जीवन आहे. म्हणूनच तर प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला म्हणत आहे, 'तुम्ही जगाचे प्रकाश आहेत.' मीठा प्रमाणे आपल्या जीवनातील रुचकरपणा कायम टिकवून इतरांच्या जीवनात रुचकरपणा आणण्यासाठी आपण प्रयत्नशील बनूया. प्रभूयेशू म्हणत आहे, ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्व


✝️   

पहिले वाचन यशया ५८:७-१० 
वाचक :    यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल."

परमेश्वर म्हणतो, “तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे, तू लाचारांना आणि निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. तू आपल्या बांधवांपुढे तोंड लपवू नये हाच तो उपवास आहे असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल. जेव्हा तू हाक मारशील तेव्हा ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे."
“जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे आणि दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या मनाला योग्य ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंध:कारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल."

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११२:४-५, ६-७,८अ - ९

प्रतिसाद :  सुजनांना अंधःकारात प्रकाश प्राप्त होतो.

१) सुजनांना अंध:कारात प्रकाश प्राप्त होतो; 
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत. 
जो मनुष्य दया दाखवतो आणि उसने देतो 
त्याचे कल्याण होते, 
तो न्यायाने आपला व्यवसाय करील.

२) तो कधीही ढळणार नाही;
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील. 
तो वाईट बातमीला भिणार नाही, 
त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते.

३) त्याचे मन स्थिर असते. 
त्याने सढळ हाताने गरिबांस दान दिले आहे; 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील, 
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.


दुसरे वाचन १ करिंथकरास  २:१-५

वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन २:१-५

“येशू ख्रिस्त, म्हणजे क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा ठाम मी निश्चय केला."

बंधुजनहो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हांला सांगत आलो असे नाही. येशू ख्रिस्त, म्हणजे क्रुसावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला आणि मी तुमच्याजवळ अशक्य, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा आणि सामर्थ्य ह्यांची निर्दशक होती
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंत:करण प्रफुल्लित कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ५:१३-१६

वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुम्ही जगाचा प्रकाश आहा.'

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल ? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही."

“तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या, की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  परमेश्वर मानवाला ज्या मिशनकार्यावर पाठवितो त्यासाठी बायबलमध्ये विविध प्रतिमा वापरण्यात आलेल्या आहेत. आजची वाचने त्यापैकी प्रकाश ही प्रतिमा विविध अर्थांनी वापरतात. 
अ.परमेश्वराचा प्रकाश त्याच्या मिशनऱ्यांच्या जीवनातून परावर्तित होतो : आजचे पहिले वाचन (यशया ५८:७- १०) उपवासाचा नवीन अर्थ स्पष्ट करते. केवळ स्व- समाधानासाठी केलेला उपवास नव्हे तर शेजाऱ्याचे कल्याण साधणारा उपवास जगात खरा प्रकाश पसरविण्यास साहाय्यक ठरतो. 
ब. परमेश्वरी प्रकाश हा मानवी प्रयत्नाचे फलित नसते : आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्या प्रभावी वक्तृत्वाचे किंवा बुद्धिमत्तेचे गोडवे गात नसून आपल्या दुर्बळतेतून परमेश्वराची कृपा कशी कार्यरत असते त्यावर भर देताना आढळतो (१ करिंथ २:१-५). अशाप्रकारे स्वतःला रिक्त करणाऱ्या मिशनऱ्यांमधून प्रभूचा प्रकाश सर्वत्र पसरतो. 
क. मिशनऱ्याचा प्रकाश परमेश्वराच्या गौरवासाठी असतो : आजच्या शुभवर्तमानात (मत्तय ५:१३-१६) प्रभू येशू आपल्या अनुयायांसाठी “पृथ्वीचे मीठ” आणि “जगाचा प्रकाश” अशा प्रतिमा वापरतो. ह्या दोन्ही प्रतिमा जगाच्या कल्याणासाठी वापरल्या जातात. इतरांसाठी झटण्याच्या प्रयत्नात जन्माला येणारी सत्कृत्यांची फळे पाहून लोक परमेश्वराचा गौरव करतात.

आत्मपरीक्षण : माझ्या मिशनकार्याद्वारे लोकांना परमेश्वराचा प्रकाश आणि परमेश्वराला लोकांकडून गौरव लाभावा म्हणून मी काय करतो? काय करायला हवे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच जगाचा खरा प्रकाश आहेस, तुला अनुसरण्यास व तुझा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचविण्यास आम्हाला सशक्त बनव, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या