सामान्यकाळातील पाचवा सप्ताह
सोमवार दि.६ फेब्रुवारी २०२३
जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.
रक्तसाक्षी
इ. स. १८६२ साली पोप पायस नववे ह्यांनी ३ येशूसंघीय, ६ फ्रान्सिस्कन्स, आणि १७ प्रापंचिक लोकांचा मिळून बनलेल्या २६ जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्रदान केला.
त्याच्या जीवनाचा शेवटचा टप्पा फार काळ टिकला नाही. जेव्हा जपानमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा व मिशनऱ्यांच्या छळ सुरू झाला तेव्हा गोन्सालो गार्सिया ह्याच्यासह संत पॉल मिकी व सहकारी पाच फ्रान्सिस्कन, तीन येशूसंघीय आणि सतरा जपानी प्रापंचिक (धर्मशिक्षक) ह्यांना नागासकीच्या टेकडीवर ५ फेब्रुवारी १५९७ रोजी क्रुसावर खिळण्यात आले. पोप पायस नववे ह्यांनी १८६२ रोजी त्यांना संतपदाचा मुकूट बहाल केला.
चिंतन : रक्तसाक्षींच्या रक्तावरच आजची ख्रिस्तसभा उभी आहे. आजच्या रक्तसाक्षींवर उद्याची ख्रिस्तसभा उभी राहील.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती १:१-१९
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"देव बोलला आणि तसे झाले. "
प्रारंभी देवाने आकाश आणी पृथ्वी ही उत्पन्न केली. तेव्हा पृथ्वी आकारविरहीत आणि शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंध:कार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.
तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला तो आवडला. देवाने प्रकाश आणि अंध:कार हे वेगवेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस आणि अंध:काराला रात्र म्हटले आणि सायंकाळ झाली व सकाळ झाली; हा पहिला दिवस.मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलास दुभागणारे होवो.” असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळाखालच्या आणि वरच्या जलास दुभागिले आणि तसे झाले. देवाने अंतराळाला आकाश म्हटले आणि सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा दुसरा दिवस.
मग देव बोलला, “आकाशाखाली जलांचा एके स्थळी संचय होवो आणि कोरडी जमीन दृष्टीस पडो” आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीला भूमी म्हटले आणि जलांच्या संचयाला समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे तेव्हा देव बोलला, "हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो.” आणि तसे झाले. हिरवळ, आपआपल्या परी बीज देणारी वनस्पती आणि आपआपल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की है। चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा तिसरा दिवस.
मग देव बोलला, “दिवस आणि रात्र हे भिन्न करण्यासाठी आकाशमंडळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशमंडळात त्या दीप होवोत.” आणि तसे झाले. देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत आणि तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पाडावा, दिवस आणि रात्र यावर प्रभुत्व चालवावे आणि प्रकाश व अंधकार यांस भित्र करावे, म्हणून देवाने आकाशमंडळात त्या ज्योती ठेवल्या, देवाने पाहिले की हे चांगले आहे. सायंकाळ झाली आणि सकाळ झाली; हा चौथा दिवस.
हा प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०४:१-२अ, ५-६, १०.१२, २४-३५क
प्रतिसाद : परमेश्वराला आपल्या कृतीपासून आनंद होवो !
१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस,
तू सन्मान आणि महिमा ह्यांनी मंडित आहेस;
तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस.
२) तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस
की ती कधीही ढळणार नाही.
तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादले,
पर्वतांवर जले स्थिर राहिली.
३) तो खोऱ्यातून झरे काढतो,
ते डोंगरांमधून वाहतात.
त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात;
ते वृक्षांच्या फांद्यांवरून गातात.
४) हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत !
ती सर्व तू सुज्ञतेने केली.
तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.
आलेलुया!
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूला जितके स्पर्श करीत तितके बरे होत असत."
येशू आणि त्याचे शिष्य पलीकडे जाऊन गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहचले तेव्हा त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरताच लोकांनी त्याला ओळखले आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत सुटले आणि जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले तेथे तेथे ते आजाऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो खेड्यापाड्यांत, नगरात किंवा शेतामळ्यांत कोठेही जावो, तेथे ते आजाऱ्यांना भर बाजारात आणून ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्याला विनंती करीत आणि जितके त्याला स्पर्श करीत तितके बरे होत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: पवित्र शनिवारी वाचल्या जाणाऱ्या वाचनातील पहिले वाचन हे उत्पत्तीच्या पुस्तकातील असते. या वाचनात देवाने पृथ्वी, सृष्टी व मानवजात कशी निर्माण केली हे आपल्याला समजते. पृथ्वी आकार विरहीत व शून्य होती. तिला रूप नव्हते, तेज नव्हते कारण तिच्यावर कोणतीही जीवसृष्टी, सजीव सृष्टी निर्माण झाली नव्हती. देवाने हे सर्व पाहिले व त्याने या पृथ्वीला आकार व नवीन तेज देण्याचा विचार केला. देव केवळ बोलत गेला व सर्व गोष्टी निर्माण होत गेल्या. चंद्र-तारे, फुल व फळ झाडे, नद्या- समुद्र, आकाश-पाताळ हे केवळ देवाच्या शब्दाने निर्माण झाले यावरून देवाचा शब्द किती सामर्थ्यशाली होता हे आपल्या लक्षात येते. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्दही तितकाच सामर्थ्यशाली होता. केवळ शब्दाने परमेश्वराने मृत माणसाला जिवंत केले, मुक्यांना वाचा दिली, आंधळ्यांना डोळे दिले,बहिऱ्यांना कान दिले. नव्या करारामध्ये आपण बघतो येशू जिथे जिथे जायचे तिथे तिथे लोक त्याला स्पर्श करण्यासाठी धावपळ करायचे. जेणेकरून परमेश्वराच्या स्पर्शाने आपल्याला नवजीवन मिळेल अशी लोकांची आशा होती व त्या आशेचे रूपांतर नवजीवनामध्ये झाले. हा परमेश्वराचा स्पर्श आपल्याही जीवनात व्हावा व आपल्याला नवजीवन मिळावे म्हणून आपणही प्रयत्न केले पाहिजे. आमेन.
प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, मला स्पर्श कर आणि मला शुद्ध करून नवजीवनाचे वरदान दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या