Marathi Bible Reading | Tuesday 7th February 2023 | 5thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील पाचवा  सप्ताह

मंगळवार   दि.७ फेब्रुवारी  २०२३

तथापि जो शेवट पर्यंत टिकेल तोच तरेल..

“आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. "





संत गोन्सालो गार्सिया आणि त्याचे सहकारी 
-  रक्तसाक्षी (१५५६-१५९७)


✝️


इ. स. १८६२ साली पोप पायस नववे ह्यांनी ३ येशूसंघीय, ६ फ्रान्सिस्कन्स, आणि १७ प्रापंचिक लोकांचा मिळून बनलेल्या २६ जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकूट प्रदान केला. 

त्याच्या जीवनाचा शेवटचा टप्पा फार काळ टिकला नाही. जेव्हा जपानमध्ये ख्रिस्ती धर्मियांचा व मिशनऱ्यांच्या  छळ सुरू झाला तेव्हा गोन्सालो गार्सिया ह्याच्यासह  पाच फ्रान्सिस्कन, तीन येशूसंघीय आणि सतरा जपानी प्रापंचिक (धर्मशिक्षक) ह्यांना नागासकीच्या टेकडीवर ५ फेब्रुवारी १५९७ रोजी क्रुसावर खिळण्यात आले. पोप पायस नववे ह्यांनी १८६२ रोजी त्यांना संतपदाचा मुकूट बहाल केला.

चिंतन : रक्तसाक्षींच्या रक्तावरच आजची ख्रिस्तसभा उभी आहे. आजच्या रक्तसाक्षींवर उद्याची ख्रिस्तसभा उभी राहील.

ख्रिस्तसभा आज वसईचा सुपुत्र संत गोन्सालो गार्सियाचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. ख्रिस्ताची व सुवार्तेची साक्ष देताना नागासकी येथे संत गोन्सालो ह्यांना क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले संत गोन्सालो व सहकाऱ्यांनी धैर्याने सुवार्ता पसरविली. त्यांना आपण आज वंदन करु या. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी | कृपा मिळावी म्हणून मध्यस्थी मागू या.



✝️   

पहिले वाचन २ करिंथ. ६ : ४-१०
वाचक :पौलचे करिंथकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आम्ही मरणोन्मुख असे मानलेले आहोत तरी पाहा, आम्ही जिवंत आहो."
सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंगाधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने, आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पाहा आम्ही जिवंत आहो. शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जिवे मारलेले नाही. दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, नि मानलेले तरी पुष्कना सचन करणारे, काफल्लक असे मानलेले सवपत्र, अशो आम्ही आपली पात्रता पटवून देतो.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ३०:२-४,११-१२
प्रतिसाद :  मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करीन.

१)हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धांवा केला 
आणि तू मला रोगमुक्त केलें.
 हे परमेश्वरा, तूं माझा जीव अधोलोकांतून वर काढिला; 
गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखिलें

२ अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; 
आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण 
करितांना त्याचा धन्यवाद करा.
त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो. 
त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; 
रात्री विलापाने बिहाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनि होतो.

३ मी तर आपल्या संपत्काली म्हटले, 
मी कधी ढळणार नाही.
 तूं माझा विलाप दूर करून मला 
नाचावयास लाविले आहे;
तूं माझें गोणताट काढून मला
 हर्षरूपि वस्त्र नेसविलें आहे;

४) ह्यासाठी की माझ्या आत्म्याने 
तुझें गुणगान गावें, गप्प राहू नये
हे परमेश्वरा, माझ्या देवा, 
मी सर्वकाळ तुझें उपकारस्मरण करीन.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो
तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय १० :१७-२२

वाचक :  मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल." 

माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानांत तुम्हांला फटके मारतील, आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करितील तेव्हां कसें अथवा काय बोलावें ह्याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावें हे त्याच घटकेस तुम्हांस सुचविलें जाईल.  कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठायीं बोलणारा आहे. भाऊ भावाला व बाप मुलाला जिवें सारण्यासाठी धरून देईल, 'मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील; आणि माझ्या नांवामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील; तथापि जो शेवट पर्यंत टिकेल तोच तरेल.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  आज ख्रिस्तसभा संत गोन्सालो गार्सिया यांचा सण साजरा करीत आहे. संत गोन्सालो गार्सिया यांचा जन्म भारतात झाला व जपान मध्ये त्यांना वधस्तंभावर खिळण्यात आले. आजचे शुभवर्तमान आपल्याला परमेश्वराच्या शिष्यांचा व भक्तांचा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी झालेला छळ व त्यांना मिळालेले दुःख यावर विचार करण्यास सांगत आहे. संत पौल आपल्या पत्रात म्हणतो, एक सच्चा ख्रिस्ती आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जे शस्त्र वापरतो ते सर्वांपेक्षा वेगळे म्हणजेच “धार्मिकतेचे शस्त्र” असते. या शस्त्राने कोणाला शारीरिक इजा होत नाही मात्र शत्रु मनातून नक्कीच खचून जातो, विचार करतो व त्याला पापाचे पश्चात्ताप करण्याची सुबुद्धी मिळते. हेच धार्मिकतेचे शस्त्र ख्रिस्ती लोकांना त्यांच्या विश्वासात कठोर परिश्रम,सहनशीलता व प्रेमात खंबीर राहण्यासाठी प्रोत्साहित करते. संत पौल समाजाला आवाहन करतो की, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविताना कितीही छळ, दुःख सहन करावे लागले तरीसुद्धा त्यांनी न घाबरता, न डगमगता व मागे न वळता आपले कार्य चालू ठेवावे. या सर्वांचे उत्तम उदाहरण म्हणजे संत गोन्सालो गार्सिया. जपानमध्ये त्यांचा खूप छळ झाला तरीसुद्धा ते आपल्या वचनापासून मागे हटले नाहीत. पवित्र शुभवर्तमानात येशू देखील आपल्या शिष्यांना असेच सावध करतो. कारण ते नेहमी येशूची साक्ष देत. येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “घाबरू नका. पवित्र आत्मा तुम्हाला बळ देईल व संकटाच्या काळात तुमचे नेतृत्व करेल.” खंबीर राहण्यासाठी व शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रोत्साहन देतो. आमेन.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून तुझ्या धैर्याचा आत्मा आम्हाला दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या