Marathi Bible Reading |Wednesday 8th February 2023 | 5thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील पाचवा  सप्ताह

बुधवार   दि.८ फेब्रुवारी  २०२३

कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरता, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात.'




संत जोसेफिन बाखीता


✝️   

पहिले वाचन उत्पत्ती २:४-९.१५-१७
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

“परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत नेऊन ठेवले." 

आकाश आणि पृथ्वी यांची ज्या दिवशी उत्पत्ती झाली, म्हणजे परमेश्वर देवाने आकाश आणि पृथ्वी ही केली त्या काळचा उत्पत्तिक्रम हा होय. शेतातले कोणतेही उद्भिज अद्यापि पृथ्वीवर नव्हते. शेतातली कोणतीही वनस्पती अद्यापि उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमीनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता; मात्र जमिनीवरून धुके वर जात असे आणि त्याने भूमीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला आणि त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणि झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तिच्यामध्ये आपण घडवलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर आणि स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनवृक्ष आणि बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगविली.
परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत आणि राखण करण्यास ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामला आज्ञा दिली "बागेतील वाटेल त्या झाडाची फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १०४:१२, २७-२८, २९-३०

प्रतिसाद :  हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे ! 

१ )हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे ! 
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस, 
तू प्रताप आणि महिमा ह्यांनी मंडित आहेस; 
तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस.

२ )तू त्यांना यथाकाली भक्ष्य देशील 
म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. 
जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात, 
तू आपली मूठ उघडतोस तेव्हा 
उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते.

३) तू आपले तोंड लपवतोस तेव्हा 
ते व्याकूळ होतात, तू त्यांचा श्वास काढून घेतोस 
तेव्हा ते मरून मातीस मिळतात. 
तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात;
तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे,
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  :१४-२३

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. "

येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, "तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते." तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, "तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहा की काय ? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय ? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते आणि शौचातून बाहेर पडते." (अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.) आणखी तो म्हणाला, "जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरता, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात.'

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  आजच्या पवित्र वाचनात आपण मानवी विचारांमुळे मानवी जीवन कसे अपवित्र आहे यावर विचारमंथन करणार आहोत. परमेश्वराने सर्वकाही
देऊन सुद्धा माणूस कसा कृतघ्न झाला व परमेश्वरालाच कसा विसरला यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण परमेश्वराने सृष्टीची निर्मिती कशी केली, मातीपासून मानवाची निर्मिती कशी झाली हे आपण पाहिले. स्वतःचा श्वास देऊन, स्वतःचा प्राण देऊन या मातीच्या मानवाला जिवंत माणसांमध्ये रूपांतरित केले. संपूर्ण जगाची निर्मिती करत असताना परमेश्वराने मानव आनंदित कसा राहील याचा सर्वप्रथम विचार केला.
माणसाच्या आनंदासाठी अनेक गोष्टींची निर्मिती केली. जेणेकरून कोणत्याही गोष्टींची कमी पडणार नाही. निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचा माणूस पुरेपुर
उपभोग घेईल व आनंदी राहील व त्याद्वारे परमेश्वराची स्तुती आराधना करील ही परमेश्वराची इच्छा होती. मोशेच्या नियमानुसार मानवासाठी अनेक गोष्टी हे अपवित्रतेचे स्त्रोत ठरले. परमेश्वराने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती ही पवित्र अपवित्र, शुद्ध - अशुद्ध अशी नाही.
परमेश्वराने लोकांच्या या संकुचित वृत्तीला अनेक प्रश्न विचारून आव्हान दिले. परमेश्वर म्हणतो, “पृथ्वीवर निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट शुद्ध व पवित्र
आहे. उदरनिर्वाहासाठी आपण काम करतो व त्या कामातून मिळालेल्या पैशातून अन्न घेऊन आपण आपले पोट भरतो. मग ते अन्न अपवित्र कसे असू
शकेल? मानवी हृदयातून निघणारे दृष्ट विचार,संकुचित वृत्ती, हेवेदावे हेच माणसाला अपवित्र अशुद्ध बनवतात. "

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, सर्वदा तुझी स्तुति करण्यास व अंतर्यामी निर्मळ बनण्यास आमचे विचार, कल्पकता व कृती ह्यामध्ये पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभू दे.. आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या