Marathi Bible Reading |Thursday 9th February 2023 | 5thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील पाचवा  सप्ताह

गुरुवार    दि.९ फेब्रुवारी  २०२३

तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.




संत मिंग्वेल कोर्देरो 
•वर्तनसाक्षी (१८५४-१९१०)


चिंतन : “येशूला जसा हवा तसा त्याने माझा वापर करावा म्हणून मी स्वतःला संपूर्णत: त्याच्या हाती सोपवतो. मी लिहिलेला प्रत्येक शब्द, वाचलेले सर्व काही, माझ्या टेबलावर जे काही मी करतो आणि शाळेतील माझी सर्व कार्ये मी देवाच्या महान गौरवासाठी अर्पण करू इच्छितो.” संत मिंग्वेल कोर्डेरो

प्रभू येशूला श्रद्धेने आपला तारणारा व जीवनदाता म्हणून  स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला प्रभू त्याच्या कृपाशिर्वादाने भरुन टाकीत असतो.  आज अनेक ख्रिस्तेतर बंधु-भगिनी श्रद्धेने ख्रिस्ताच्या कृपासनाजवळ येत आहेत.  प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा त्यांना अनुभव मिळत आहे. प्रभू येशूचा सर्व  प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांवर आणि भूतांवर अधिकार आहे. म्हणूनच प्रभूला आपण शरण जाऊन आपले सर्वस्व त्याला समर्पित करु या

 ✝️   

पहिले वाचन उत्पत्ती २:१८-२५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

“परमेश्वराने तिला आदांमकडे नेले; ती दोघे एकदेह झाली."

परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्यांच्यासाठी अनुरूप मदतनीस मी करीन." परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले, तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्रण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली; पण आदामला कोणी अनुरूप मदतनीस मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला,
“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.” यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. आदाम आणि त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यांना संकोच वाटत नसे.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १२८:१,२-३, ४-५

प्रतिसाद :   जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो तो धन्य ! 

१ जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य !
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील; 
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. 

2) तुझ्या माजघरात तुझी स्त्री 
सफळ द्राक्षवेलीसारखी होईल, 
तुझ्या मेजासभोवती तुझी 
मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. 

३) पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला 
असा आशीर्वाद मिळेल. 
परमेश्वर सियोनतून तुला तुझ्या 
आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो!


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 जे देवाचे वचन ऐकतात, सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. ते धन्य होत.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क  :२४-३०

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात."

गनेसरेत येथून निघून येशू सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफूनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली “माझ्या मुलीतून भूत काढा.” तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." यावर तिने उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात." तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  परमेश्वर आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. भक्तांची योग्य ती गरज ओळखून त्यानुसार मदत करत असतो. जुन्या करारात व नव्या करारात यासंबंधी आपल्याला अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. विश्वास ठेवून केलेल्या प्रार्थनेला परमेश्वर नेहमी उत्तर देतो हे लोक देखील जाणतात. मानवी शरीर हे परमेश्वराने निर्माण केलेला सर्वात मोठा चमत्कार आहे. त्यामुळे मानवी मन, आत्मा, मेंदू व शरीर या सर्वांची गरज परमेश्वर ओळखतो. गरजवंत व्यक्ती जेव्हा परमेश्वरापुढे हात जोडून उभा राहतो तेव्हा त्याची गरज ओळखून परमेश्वर त्याला मदत करतो. त्याला कधीच निराश करत नाही. जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वराने जगाची निर्मिती केली. सर्व सुखसोयी माणसासाठी निर्माण केल्या व मातीपासून आदामाची निर्मिती केली. नाकामध्ये प्राणवायूची फुंकर मारून त्याला जिवंत केले. सर्व काही गोष्टी आजूबाजूला असताना सुद्धा आदाम मात्र नाराज होता; कारण तो एकटा होता परमेश्वराने ओळखले व आदामाला गाढ झोप दिली व त्याच्या फासळीपासून त्याला सोबतीण म्हणून वेची निर्मिती केली. आदामाने न सांगताही परमेश्वराने त्याची गरज ओळखली. परमेश्ववर प्रत्येक व्यक्तीच्या गरजेवर लक्ष ठेवून असतो हे आपल्याला येथे समजते. परमेश्वराने आदामाची फासळीच का काढली? हा प्रश्न येथे निर्माण होतो. फासळी हा हृदयाचा एक भाग आहे. फासळीपासून बनलेल्या स्त्रीला माणूस हृदयामध्ये स्थान देईल हा परमेश्वराचा उद्देश होता. म्हणजेच येथे स्त्रीचीही गरज परमेश्वराने ओळखली व तिला पतीच्या हृदयात स्थान दिले. बायबलच्या एका उताऱ्यामध्ये एक स्त्री तिच्या मुलीला अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती मिळावी म्हणून परमेश्वराजवळ घेवून येते. सुरूवातीला प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला नकार देतो, परंतु त्या स्त्रीची सततची विनवणी याचना ऐकून परमेश्वर तिच्या मुलीला अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती देतो. पुष्कळ वेळेला आपण परमेश्वराकडे मागितलेली गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. आपण नाराज होतो, परंतु परमेश्वर म्हणतो धीर धरा, प्रार्थना करा. तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल.

प्रार्थना :हे प्रभू येशू, आम्हा पाप्यावर दया कर, आमची श्रद्धा दृढ बनव, आमेन..

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या