सामान्यकाळातील पाचवा सप्ताह
शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३
तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
संत स्कोलास्टिका
- कुमारिका (४८०-५४७)
स्कोलास्टीका ही इटलीतील नर्सिया या ठिकाणी जन्मली होती. संत बेनेडिक्ट (सण ११ जुलै) ह्यांची ती जुळी बहीण होय. एकदम बालवयात तिने आपल्या भावाप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या संपत्ती व ऐश्वर्यावर पाणी सोडून त्याच्यासह सुबियाको येथे जाण्याचे व आयुष्यभर देवाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि मोठेपणी दोघेही सुबियाको येथे जाऊन ते स्वप्न पूर्ण केले. परंतु नंतर बेनेडिक्ट दक्षिण इटलीतील मोन्टे कॅसिनो येथे गेल्यामुळे तिने सुबियाको येथेच राहून बेनेडिक्टाईन आचारसंहितेवर आधारित एका कॉन्व्हेन्टची स्थापना केली. तिथे तिला बऱ्याच तरूण मुली येऊन मिळाल्या होत्या.
हे दोघे भाऊ-बहिणी वर्षातून केवळ एकदाच उपवासकाळामध्ये आध्यात्मिक गोष्टींवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भेटत असत. दोघांची आध्यात्मिक प्रगती एवढी विलक्षण झालेली होती की त्यांचे समकालीन संत ग्रेगरी महान ह्यांनी त्यांच्या एकत्र भेटीतील मौल्यवान आध्यात्मिक विचारांचे संकलन केलेले आहे. दोघांच्या शेवटच्या भेटीचे त्यांनी केलेले हृदयस्पर्शी वर्णन तर आपल्याला दोघांच्या आध्यात्मिक उदात्ततेची जाणीव करून देते.
“आपला मरणकाळ जवळ येऊन ठेपला आहे असे जाणवताच स्कोलास्टिका हिने आपल्या पवित्र भावाला विनंती केली की, आपण रात्रभर व पहाटेपर्यंत आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करू." परंतु बेनेडिक्ट हे आपल्या मठवासीय आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणारे होते. त्यामुळे अंधार पडण्याआधी आपल्याला आपल्या मठाच्या नियमानुसार परतले पाहिजे ह्याविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली. अशा वेळी स्कोलॅस्टिका हिने देवाजवळ कळकळीची याचना केली की, बेनेडिक्टच्या मनातील विचार बदलून त्याने रहावे कारण ही रात्र शेवटची रात्र आहे. तिची विनंती ऐकली गेली. एकाएकी आभाळ भरून आले. सोसाट्याचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. मुसळधार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या प्रचंड गडगडाटाने भूमी हादरून गेली. ह्या परिस्थितीपुढे बेनेडिक्टने हात टेकले. ही देवाची इच्छा आहे असे मानून बेनेडिक्टने आपल्या मठात परतण्याचा बेत रद्द केला. न्याय आणि शिस्तीचा कायदा प्रेमाच्या सामर्थ्यापुढे जणू पांगळा ठरला होता. दोन्ही संतांनी रात्रभर आध्यात्मिक मेजवानी झोडली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे आपापल्या संघात निघून गेले.
तिसऱ्या दिवशी बेनेडिक्टला निरोप मिळाला की, आपली बहीण स्वर्गवासी झालेली आहे. त्यावेळी दोघे ६७ वर्षांचे होते. बेनेडिक्टने मॉन्टेकॅसिनो येथे स्वत:साठी एक थडगे तयार ठेवले होते. त्यात त्याने आपल्या स्वतःच्या हातांनी स्कोलास्टिकाला मूठमाती दिली. थोड्याच दिवसांनी २१ मार्च रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली. त्याला तिच्या शेजारीच पुरण्यात आले.
अशा प्रकारे दोन महान संतांचा एकत्र जन्म व एकत्र मृत्यू झाला (४८० ५४७). ह्या दोन संतांनी स्थापन केलेल्या व्रतस्थ संघातून १४ शतकात जवळजवळ ५०० संत ख्रिस्तसभेला देण्यात आलेले आहेत. वादळवाऱ्यात संत स्कोलास्टिकाचा धावा केला जातो.
प्रभू येशू, जो वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर आहे तो सर्वांसाठी आरोग्यदान व आध्यत्मिक दान देण्यास तयार आहे. सर्वांना प्रभू बंधमुक्त करु इच्छित आहे. आपण त्याच्या सहवासात जाऊन श्रद्धेने त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा निर्धार । करु या व जीवनातील सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळे होऊ या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती ३:१-८
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल. "
परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय ?" स्त्रीने सर्पाला म्हटले, "बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे: पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की, 'ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.' 333 सर्प स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल." त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही दिले आणि त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यांना कळून आले, तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टने केली.
यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम आणि त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.
हा प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३२:१-२, ५, ६-७
प्रतिसाद : ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, तो धन्य !
१) ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे,
ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे, तो धन्य !
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही
आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य !
२) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले;
मी आपली अनीती लपवून ठेवली नाही.
मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन
असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.
३) ह्यासाठी प्रत्येक भक्ताने वेळीच तुझी प्रार्थना करावी.
जलांचा महापूर आला तरी त्याला
त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस;
तू संकटापासून माझे रक्षण करशील.
मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे;
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ७ :३१-३७
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."
येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनवरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने निःश्वास सोडला आणि म्हटले, “इफ्फाथा," म्हणजे "मोकळा हो.” तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागलीच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले, परंतु तो त्यांना जसेजसे सांगत गेला तसेतसे ते अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे, हा बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: मोह माणसाला कळत नकळत पापाच्या बेडीत अडकवतो, व सहजपणे पापाच्या बेड्या माणसाच्या हातात पडतात. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण पाहतो परमेश्वराने सुंदर जग निर्माण केले. आदाम एवेची निर्मिती केली. या दोघांच्या सुखासाठी सर्व सुखसोयी, फळझाडे, फुलझाडे निर्माण केली. बागेत असलेल्या सर्व फळांचा आस्वाद घेण्याची मोकळीक त्यांना दिली; परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी मात्र दिली नव्हती. असे म्हणतात, जिथे देव आहे तिथे दानवही आहे. पवित्र, पापभीरू अशा आदाम व एवेच्या मनात सैतानाने पापाचे बीज पेरले व अगदी अलगदपणे ते त्याला सामोरे गेले. देवाविरुद्ध बंड करण्यासाठी, देवापासून दूर जाण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून सैतान आपल्याला मोहित करत •असतो. आदाम व एवावरही सैतानाने हाच प्रयोग केला व ते सैतानाच्या भूलथापांना मोहीत होऊन परमेश्वराच्या विरुद्ध वागले व बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ त्यांनी खाल्ले. फळ खाताच त्यांचे डोळे उघडले; परंतु हे डोळे मात्र पापांनी उघडलेले होते. नवीन करारात येशूने केलेले अनेक चमत्कार आपण पाहतो. येशूने आंधळ्यांना डोळे दिले, बहिऱ्यांना कान दिले व मुक्यांना वाचा दिली. येशू हा देवाचा आज्ञाधारक पुत्र होता व या आज्ञेला धरूनच त्यांनी आपले काम केले. आपणही देवाच्या आज्ञेनुसारच वागले पाहिजे. म्हणजे देवाच्या प्रेमळपणाचा व परिपूर्णतेचा आपल्याला अनुभव घेता येईल.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या कृपेच्या सहवासात येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमचे जीवन बंधमुक्त कर, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या