Marathi Bible Reading |Satrday 11th February 2023 | 5thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील पाचवा  सप्ताह

शनिवार  दि.११ फेब्रुवारी  २०२३

“हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” 


लुर्ड्सची माता  धन्य कुमारी पवित्र  मरियेचा सण 

 
 ✝️   

ख्रिस्तसभा आज पवित्र मरियेने लुर्डस् येथील तिचा सन्मानदिन साजरा करीत आहे.  काना गावातील प्  मरियेची भूमिका अखिल मानवावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. अडचणीत आलेल्या घरधन्याच्या मदतीला मरिया माता धावून आली. तिच्या पुत्रापाशी गरिने विनंती केली आणि कानागावी पाण्याचा द्राक्षरस झाला. . पवित्र मरिया आपल्या सर्वांसाठी तिच्या पुत्रापाशी विनंती करीत  म्हणते, '(प्रभू येशू) हा तुम्हाला जे सांगले ते करा. प्रभू येशू शिकवण, वचने व आज्ञा आपण आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपण पवित्र मरिये जवळ गेल्यावर ती आपल्याला येशूकडे जाण्यास सांगते. आपण  मरिया माता सांगते त्याप्रमाणे येशू जवळ जाऊ या. त्याची आज्ञा व वचने पाळू या.  पवित्र जपमाळेचा संदेश आपल्या जीवनात उतरवू या आणि आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेत जपमाळेच्या प्रार्थनेला प्राधान्य देऊ या. गरजवंतांच्या सहायाला धावून जाणे म्हणजेच मरियेमातेचा सन्मान करणे होय.


पहिले वाचन यशया ६६:१० -१४
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, नदीप्रमाणे शांती मी तिच्याकडे वाहवितो."

“येरुशलेमबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्हासा, तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा, म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल आणि तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल."
कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती आणि पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवितो. तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.
जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन, येरुशलेममध्ये तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल.”
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र यहूदीथ १३:१८-१९
प्रतिसाद :  प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
१)"मुली परात्पर देवाने पृथ्वीवर साऱ्या 
स्त्रियांमध्ये तुला धन्य केले आहे. 
प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
आपल्या शत्रूचे शीर तोडण्यास त्यानेच तुला मार्गदर्शन केले.

२) देवाचे सामर्थ्य आठवीत असताना 
लोकांच्या मनात तू निर्माण केलेली
 आशा कधीच मावळणार नाही.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 तेव्हां मरीया म्हणाली :
'माझा जीव प्रभूला' थोर मानितो आणि 
'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे माझा आत्मा 'उल्हासला आहे;
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान  २: १-११

वाचक :  योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“तो बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."

गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यातले काढून भोजनकारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभाऱ्याने चाखले, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, "प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस वाढतो, तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत राखून ठेवला आहेस.” येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  आज ख्रिस्तसभा लुडर्स मातेचा सण साजरा करीत आहे. यशया संदेष्टा पहिल्या वाचनात मरिया मातेच्या सांत्वनावर प्रकाश टाकतो. यशया संदेष्टा म्हणतो की, जशी आई आपल्या मुलांचे सात्वन करते, त्याचप्रकारे देव त्याच्या लोकांचे सांत्वन करील. अडचणी आणि परीक्षांच्या वेळी देव त्याच्या लोकांना सांत्वन देईल. सर्व शोक आनंदात बदलेल. देवाच्या सांत्वनाने आपली अंतःकरणे आनंदीत होतील आणि त्याचे लोक भरभराट पावतील. वाचनात आपण काना येथील लग्न समारंभाचा दाखला ऐकतो. द्राक्षरसाचा तुटवडा असल्याने कुटुंब व्यथीत झाले. यावेळी आपण मरिया मातेची संवेदनशीलता पाहतो. जी त्याचे दुःख आणि त्यांची गरज जाणण्यास सक्षम आहे. या संकटाच्या काळात येशूच त्यांना मदत करू शकतो हे पूर्णपणे जाणून ती येशूकडे मध्यस्थी करते. अशाचप्रकारे, आपल्या जीवनात जेव्हा आपल्याला विविध संकटांचा सामना करावा लागतो, तेव्हा आपली आई मरिया नेहमीच आपल्या समस्यांबद्दल आणि आपल्या गरजांबद्दल संवेदनशील असते. ती आपल्यासाठी मध्यस्थी करून आपल्याला सांत्वन देते की, आपल्या निराशेच्या काळात आपल्याला सांत्वन देण्यासाठी देव आपल्या जीवनात चमत्कार करू शकेल. आमची आई ही एक सांत्वन देणारी आई आहे आणि आमचा देव नेहमीच आमची काळजी आणि संरक्षण करतो.

प्रार्थना :हे पवित्र मरिये, तु महान आहेस. आमच्या सर्व गरजा तू भागवतेस गरजवंताच्या सहाय्याला धावून जाण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या