Marathi Bible Reading | 12th February 2023 | 6th Sunday in Ordinary Time |

सामान्यकाळातील सहावा  रविवार 

 दि.१२ फेब्रुवारी  २०२३

“नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे




तुमचे बोलणे, ‘होय तर होय,' ‘नाही तर नाही', एवढेच असावे,
✝️


पहिले वाचन बेन सिरा १५:१५-२० 
 
वाचक :    बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"त्याने कोणालाही अधार्मिक होण्याची आज्ञा केली नाही. "

तुमची इच्छा असेल तर तुम्ही आज्ञापालन कराल आणि विश्वासूपणाने वागणे हा सर्वस्वी तुमचा निर्णय राहील. त्याने तुमच्यासमोर विस्तव आणि पाणी ठेवले आहे; तेव्हा हात पुढे करून तुम्ही दोहोंपैकी काहीही निवडू शकता. माणसासमोर जीवन आणि मरण उभे असते आणि तो जे निवडील ते त्याला दिले जाईल. कारण देवाचे ज्ञान महान आहे; तो बलवान आहे आणि तो सर्व काही पाहतो. त्याचे डोळे, जे त्याला भितात त्यांच्याकडे लागलेले असतात आणि त्याला माणसांची सर्व कृत्ये माहीत आहेत. त्याने कोणालाही अधार्मिक होण्याची आज्ञा केली नाही, तसेच त्याने कोणालाही पाप करण्यास परवानगी दिली नाही.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११९:१-२, ४-५,१७-१८,३३-३४

प्रतिसाद : जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य !

१) जे आपले वर्तन चोख ठेवून 
परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य ! 
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून 
त्याचा शोध करतात ते धन्य !

२) तुझे आदेश आम्ही मन:पूर्वक पाळावे 
म्हणून तू ते आम्हाला लावून दिले आहेत. 
व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे.
तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक

३) आपल्या दासाला औदार्य दाखव, 
म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन. 
तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या 
नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

 ४) हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग 
मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. 
मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; 
खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.


दुसरे वाचन १ करिंथकरास  २:६-१०

वाचक : पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"गुप्त ठेवलेले ज्ञान देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते. "

जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नव्हे आणि ह्या युगाचे नाहिसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नव्हे. तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो; ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवाकरिता नेमले होते. ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यांतील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला क्रुसावर खिळले नसते. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे:
"डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही आणि माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे."
देवाने ते आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा आणि देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो.
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ५:१७-३७

वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"प्राचीन लोकांस मी जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे; परंतु मी तुम्हांला हे सांगतो."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला:

“नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हांला खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. कारण (मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.

"खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल" असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, “जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल.) जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा,' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी अरे मूर्खा, असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.) ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खचित सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.

('व्यभिचार करू नको' म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सागतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडेकामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.) तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून काढून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.'

'कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे' हे सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. '

('खोटी शपथ वाहू नको तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर' म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांस सांगतो, शपथ वाहूच नका;) स्वर्गाची शपथ वाहू नका, कारण ते देवाचे राजासन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; येरुशलेमचीही नका, कारण ते थोर राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. (तर तुमचे बोलणे, ‘होय तर होय,' ‘नाही तर नाही', एवढेच असावे, ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.)

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन:  अस्सल ज्ञानाची ओढ ही खऱ्या खुऱ्या धार्मिक जीवनासाठी आवश्यक असते असे इस्राएली लोक मानीत. शलमोन हा यहुदी ज्ञानसाहित्याचा जनक मानला जाई. कुटुंब, राजदरबार आणि मंदिर ह्या ठिकाणाहून राजकीय, धार्मिक, सामाजिक व व्यावहारिक स्वरूपाचे शिक्षण दिले जाई. आजची वाचने मात्र त्याहीपुढे जाऊन आपल्याला ज्ञानाविषयी मार्गदर्शन करतात : 
अ. परमेश्वर हा सर्व ज्ञानाचा उगम आणि कळस आहे : इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला बेनसिरा नावाचा प्रज्ञावंत आजच्या पहिल्या वाचनात (प्रवक्त १५:१५-२०) आपल्या शिष्यांना ज्ञानप्राप्तीसाठी पाचारण करतो. ज्ञान आणि मूर्खपणा ह्यांची तुलना जीवन आणि मरण ह्यांच्याशी करून परमेश्वर हाच ज्ञानाचा उगम असल्याने खरे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी व्यक्तीने नम्रपणे देवाकडे यावे असे तो सुचवितो. 
ब. माणसाने ईश्वरी ज्ञानाची उत्कंठा बाळगावी : आजच्या दुसऱ्या वाचनात (१करिंथ २:६-१०) संत पॉल भौतिक स्वरूपाचे ज्ञान आणि ईश्वरी ज्ञान यामधील भेद दाखवून देतो. माणूस भौतिक ज्ञान मिळविण्यासाठी जेवढा झटतो, तेवढाच प्रयत्न जर त्याने ईश्वरी ज्ञान प्राप्त करण्यासाठी केला तर तो स्वर्गीय आनंद अनुभवू शकतो. 
क. ईश्वरी ज्ञान माणसाच्या अंतःकरणात दडलेले आहे : आजचे शुभवर्तमान (मत्तय ५:१७-३७) केवळ बाह्य नियम पाळण्यापेक्षा माणसाने आपल्या अंतरात्म्याचा कौल घेणे कसे आवश्यक आहे त्याविषयीचे ज्ञान आपल्यापुढे सादर करते.

आत्मपरीक्षण : माझ्या स्वरूपाचे ज्ञान कार्यरत आहे ? भौतिक की ईश्वर स्वरूपाचे? ईश्वरी स्वरूपाचे ज्ञान मिळविण्यासाठी मी काय केले पाहिजे ?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमची प्रत्येक कृती तू जाणतोस, सार्वकालिक जीवन देणाऱ्या आज्ञाचे पालन करण्यास आम्हाला प्ररेणा व शक्ती दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या