Marathi Bible Reading |Monday 13th February 2023 | 6thWeek in Ordinary Time |

सामान्यकाळातील सहावा  सप्ताह

सोमवार  दि.१३ फेब्रुवारी  २०२३

“ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.


संत कॅथरीन डि रिक्की 

- कुमारिका (१५२२-१५९०)

कॅथरीनचे बालपणीचे नाव आलेक्सांद्रा रोमोला असे होते. इटलीतील फ्लॉरेन्स येथे जन्मलेल्या ह्या नीतिमान व देवभिरू मुलीचे कुटुंब व्यापारी आणि सावकारी घराण्यातील होते. घरात ख्रिस्ती धर्माचा कुठलाही लवलेश नव्हता. मात्र आलेक्सांद्रा हिला इटलीत राहिल्यामुळे येशूविषयी आणि त्याची सेवा भक्तिभावाने करणाऱ्या जोगिणीविषयी खूप आदर वाटे. त्यामुळे बालपणापासूनच ती एकांतात प्रार्थना करीत असे.

देवाने या निष्पाप मुलीचे पावित्र्य पाहून वयाच्या १३ व्या वर्षी डॉमिनिकन कॉन्व्हेन्टमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिच्या जीवनात अनुकूल परिस्थिती निर्माण केली. प्रातो ह्या ठिकाणच्या कॉन्व्हेन्टमध्ये आपल्या व्रतविधीच्या वेळी तिने कॅथरीन हे नाव धारण केले. तेथील पहिल्या पाच वर्षात तिची अतिधार्मिक वृत्ती पाहून तिच्याविषयी फार मोठा गैरसमज निर्माण झाला. परंतु हा गैरसमज फार काळ टिकला नाही.तिचे पवित्र व सभ्य वर्तन पाहून तिच्या सहकारी जोगीणींनी तिचा आदर सन्मान करायला सुरुवात केली. लवकरच तिला नवशिष्यिणींचे प्रमुख (नॉव्हीस मिस्ट्रेस) नेमण्यात आले. त्यानंतर तिला व्रतस्थ संघाचे उपप्रमुख आणि शेवटी १५६० साली प्रमुख पद देण्यात आले. त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ३० वर्षे ती ह्या प्रमुखपदी अत्यंत नम्रपणे कार्यरत होती.

प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनात ती अतिशय तन्मयतेने सहभागी होई. इतकी की शेवटी १५४२ साली गुरुवारी दुपारी १ वाजेपासून शुक्रवारी संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत ती देहभान हरपून त्यातच गुंग होती. तिला तहानभूक व झोपेची शुद्ध नव्हती. दर आठवड्याला हे आकस्मितपणे घडू लागले. अशा प्रकारचा तिचा आध्यात्मिक अनुभव पुढे १२ वर्षे चालू राहिला.

दरम्यानच्या काळात ह्या भयंकर आत्मक्लेशापासून आपली मुक्तता व्हावी म्हणून कॅथरीनने प्रार्थना करायला सुरुवात केली परंतु तोपर्यंत ह्याविषयीची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. तिच्या दर्शनासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागले. त्यात तीन भावी पोप महाशयांचाही समावेश होता. ह्या घटनेमुळे आपल्या कॉन्व्हेंटमधील दैनंदिन कार्यक्रमावर परिणाम होत असल्याचे पाहून ती कमालीची त्रस्त होई.

तिच्या ह्या आत्मक्लेशाची ख्रिस्तसभेने बारीक चिकित्सात्मक चौकशी केल्यावर तात्कालीन ख्रिस्ती लोकांना असे आढळून आले की, ह्या आत्मक्लेशाच्या काळात कॅथरीन प्रभूयेशूच्या संपूर्ण दुःखसहनात शारीरिकदृष्ट्या सहभागी होई. तिच्या मस्तकावर काटे खुपसल्याच्या खूणा व रक्त दिसून येई. शुक्रवारी दुपारपर्यंत आपल्या खांद्यांवर क्रुसाचे अवजड ओझे घेऊन ती चालत अडखळत वाहात असल्याचे दिसे. त्यानंतर तिच्या हातापायाला क्रुसावर खिळलेल्या येशूच्या जखमांचे व्रण दिसत असत.

कॅथरीनला अद्भुत कृत्ये करण्याचीदेखील देणगी लाभलेली होती. रोमच्या संत फिलीप नेरी आणि फ्लॉरेन्सच्या संत मेरी माग्दालेन डी पाइझी ह्या संतांशी तिने आपले प्रातो येथील कॉन्व्हेंटमध्ये राहूनच चमत्कारिकरित्या संभाषण केल्याचे आढळून आले.

कॅथरीन दीर्घकालीन आजारानंतर २ फेब्रुवारी १५९० रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी मरण पावल्या.

✝️

 
प्रभू येशू सर्वांनाच उदारपणे देत राहिला. अंधांना दृष्टी, भुकेल्यांस अन्न, बहिऱ्यांस कान, मुक्यांना वाचा आणि रोग्यांना आरोग्य देऊन प्रभूने त्याचे दैवी सामर्थ्य प्रकट केले. तरी सुद्धा कठोर अंत:करण आणि संशयी वृत्तीने वागणाऱ्या परुश्यांनी प्रभूकडे चिन्हाची माणगी केली. देवाचे वचन व देवाची दया महान आहे. येशूला ओळखण्यासाठी त्याचे सामर्थ्य जाणण्यासाठी व त्याच्या योजना समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची कृपा आवश्यक आहे.
विश्वासाने आपले सर्वस्व प्रभूचरणी समर्पित करु या. 
 ✝️   

पहिले वाचन उत्पत्ती ४:१-१५,२५
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

"काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्यास ठार केले. "

आदामने आपली स्त्री एवा हिला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काइनला जन्म दिला. ती म्हणाली, “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुत्रसंतान लाभले आहे.” नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काइन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलनेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काइन आणि त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काइन संतापला आणि त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनला म्हणाला, "तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले ? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे, याकरिता तू पापाला सत्तेखाली ठेव.” एके दिवशी काइन आपल्या भावाला म्हणाला, "चल, आपण शेतात जाऊ. त्याप्रमाणे ते शेतात असता काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. मग परमेश्वराने काइनला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे ?" तो म्हणाला, “मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे ?" परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केले? ऐक. तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. तू जमिनीत मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होशील.” तेव्हा काइन परमेश्वराला म्हणाला, "ही माझी शिक्षा मला सोसावणार नाही इतकी भारी आहे. पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टिआड लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होईन आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील." परमेश्वर त्यास म्हणाला, “तर मग जो कोणी काइनला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यास येईल" आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली. आदामने आपल्या बायकोला पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेथ ठेवले. ती म्हणाली, "काइनने, हाबेलचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे."

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५०: १.८, १६ बक- १७,२०-२१
प्रतिसाद :  देवाला आभाररूपी यज्ञ कर.

१ देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, 
त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत 
पृथ्वीला हाक मारली आहे. 
"तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोलावीत नाही,
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.”

२ "माझे नियम विदित करणारा तू कोण ? 
माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण ? 
माझी वचने मागे झुगारून देतोस."
तू तर शिस्तीचा द्वेष करतोस,

३ “तू आपल्या भावाविरूद्ध बोलत बसतोस, 
तू आपल्या सख्ख्या भावाची चहाडी करतोस.
असे तू केले तरी मी गप्प कसा बसू ? 
मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले काय ?

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ८:११-१३

वाचक :  मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“ही पिढी चिन्ह का मागते? 

परुशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या अंतःकरणात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही." नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: रमेश्वराला अर्पण करताना आपल्याजवळ जे आहे त्यामधून न करता आपल्याकडे जे सर्वोत्कृष्ट आहे त्यामधून अर्पण केले तर परमेश्वर आपले अर्पण स्वीकारतो. उत्पत्तीच्या पुस्तकात जगातील पहिले स्त्री पुरुष आदाम व एवा यांचे दोन सुपुत्र काईन व आबेल यांच्याबद्दल आपण  वाचतो. परमेश्वर कोणाचे अर्पण स्वीकारतो व ते का स्वीकारतो हे आपण पाहणार आहोत. आबेलने केलेले अर्पण परमेश्वराने स्वीकारले, परंतु काईनचे अर्पण स्वीकारले नाही. आबेलने त्याच्याकडे जे होते त्यामधून अर्पण न देता त्याच्या जवळ जे सर्वोत्कृष्ट होते त्यामधून अर्पण केले. काईनने मात्र त्याच्याजवळ जे काही उरले होते त्यामधून देवाला अर्पण केले. म्हणून देवाने त्याचे अर्पण स्वीकारले नाही. देव आपल्यासाठी खूप उदार आहे व तो त्याच्या भक्तांसाठी नेहमीच जे सर्वोत्तम आहे तेच देण्याचा प्रयत्न करतो. मग आपणही जे सर्वोत्तम आहे तेच देवाला दिले पाहिजे. आपले अर्पण परमेश्वराने नाकारले याचा काईनला राग आला व त्याने आपल्या निष्पाप भावाचा वध केला व मोठे पाप केले. जेव्हा देव त्याला आपला भाऊ आबेल बद्दल प्रश्न विचारतो तेव्हा काईनचे उत्तर असते "मी माझ्या भावाचा रक्षक आहे का?” पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या “फ्रेटेली टुटी” म्हणजे सर्व भाऊ या पुस्तकात आपण चांगल्याप्रकारचे राजकारण करून सर्वांच्या कल्याणाची जबाबदारी घ्यावी असे अधोरेखित केले आहे.

प्रार्थना : हे ज्ञानाचा उगमा, सर्व समर्थ परमेश्वरा, आमची अंत:करणे नम्र बनव, आमच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा कर व कृपेचा प्रकाश बहाल कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या