Marathi Bible Reading | 11th week in ordinary Time | Wednesday 21st June 2023

 सामान्यकाळातील ११वा सप्ताह 

बुधवार २१ जुन २०२३ 

तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”
✝️



संत अलॉयशिअस गोन्झागा
- वर्तनसाक्षी (१५६८-१५९१)

या जगातले जीवन जगत असतानाच अलॉयशिअसने प्रार्थनामय जीवनाचा सराव केलेला होता. त्यामुळे क्षणभरही विचलित न होता तो दररोज तासभर मनन-चिंतन करीत असे. कधी कधी पाच तास तो प्रार्थना करी. त्याचा परिणाम म्हणजे तो आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेमध्ये राहिला. त्याच्याठायी विलक्षण मन:शांती दिसून येऊ लागली. देवाची इच्छा प्रमाण मानून तो जीवन जगू लागला.

"मी एक वाकलेला, ओबड धोबड असा लोखंडी सळीच्या तुकड्यासमान आहे. हा तुकडा सरळ करण्यासाठीच मी धार्मिक जीवनात उतरलो आहे” असे तो म्हणत असे.

वयाच्या २२ व्या वर्षी त्याला आपल्या मृत्यूची चाहूल लागली. तशी त्याने आपली आध्यात्मिक नोंदवही आपल्या रेक्टरकडे सोपविली. आतापर्यंत तेवढीच एक वस्तू त्याने जवळ बाळगून ठेवलेली. आता तिच्याविषयीदेखील तो निरासक्त झाला.पुढे १५९० साली इटलीत जो दुष्काळ पडला त्यावेळी अहोरात्र काबाडकष्ट करून त्याने हजारो लोकांची सेवा केली. येशूसंघाने उघडलेल्या रूग्णालयात तो हे मदतकार्य करीत असताना स्वत:च आजारी पडला. मार्च १५९१ पासून पुढील तीन महिने त्याने आत्यंतिक वेदना सहन केल्या. (संत) रॉबर्ट बेलार्मिन ह्यांनी एक संपूर्ण रात्र त्याच्या उशाशी जागून काढली. शेवटी २१ जून १५९१ रोजी त्याला शांतपणे मरण आले. तो अवघा २३ वर्षांचा होता. केवळ ६ वर्षे येशुसंघात राहूनही त्याच्या पवित्र जीवनामुळे त्याला १७२६ साली संतपद, युवकांचा आश्रयदाता आणि ख्रिस्ती विद्यार्थ्यांचा आदर्श संत म्हणून गौरविण्यात आलेले आहे.

आपला जन्म कोणत्या घराण्यात झालेला आहे त्यावरून आपली महानता ठरत नाही. राजे आणि रंक दोघांची एक दिवस माती होणारच आहे ना!
- संत अलॉयशिअस गोन्झागा •
✝️                    

पहिले वाचन :  करिंथ  ९:६-११

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 

"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो."

हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्म करत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते.” असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील आणि ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११२ :१-४, ९

प्रतिसाद :जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो तो धन्य!

१)  परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो, त्याच्या ठायी कृपा, दया, आणि न्याय ही आहेत.

३)  त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील; त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. 
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ६:१-६, १६-१८

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.

"जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशारीतीने तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.

“तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे करू नका, लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानांत आणि चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे ढोंगी लोकांना आवडते. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शीपिता तुला तिचे फळ देईल. “तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:संत पॉल सर्वच ठिकाणी आपण आनंदी असावे असा सल्ला देत आहे. जे आनंदाने देतात त्यांना दिवसेंदिवस अधिक आशीर्वाद मिळतात. परंतु आपण जगात पाहतो की, ज्यांच्याकडे जास्त आहे ते देत नाहीत ते अधिक घेत आहेत. तेव्हा गरीब अधिकच गरीब बनतो. अशावेळी आपलं लक्ष पूर्णपणे तिथेच ठेवू नका तर येशू म्हणतो, “गुप्तपणे दान कर, म्हणजे तुला योग्य बक्षिस मिळेल.” प्रत्येक चांगल्या कृतीची तुलना आणि अनुकरण करण्यास प्रवृत्त करायला हवे. असं केल्याने आपण अनेक प्रकारे समृद्ध होतो. ही समृद्धी स्वतःसाठी नाही तर इतरांच्या सेवेत तत्पर राहण्यासाठी आहे. आपण आज स्वतःला विचारून मनन चिंतन करूयाः “अधिक पेरणी करा म्हणजे तुम्ही जे पेरले आहे त्यापेक्षा अधिक कापणी कराल.”

प्रार्थना :हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, आमचे आचरण, प्रार्थना, दानधर्म व उपवास शुद्ध आणि पवित्र हेतूने करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या