सामान्यकाळातील ११वा सप्ताह
गुरुवार २२ जुन २०२३
“हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो.
✝️
'आय डाय टुडे, यू डाय टुमारो' 'माझ्या ह्या भूमिकेमुळे मला आज मरावे लागले तरी हरकत नाही परंतु एक दिवस तुम्हालाही मरण येणार आहे आणि देवासमोर उभे राहायचे आहे हे विसरु नका.'
५ जुलै १५३५ साली त्यांनी आपली मान कोतवालाच्या समोर शिरच्छेदासाठी पुढे केली.
सर थॉमस मोर हे त्यांच्या काळातील अभिजात साहित्याचे निर्मातेही होते.
चिंतन : मी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीविरुद्ध जाईन अशा कोणत्याही गोष्टीला आतापर्यंत देवाच्या दयेमुळे संमती दिलेली नाही. हे मी दैवी सामर्थ्यच समजतो. मला ही विवेकबुद्धी देणाऱ्या देवाला मी धन्यवाद देतो.. - संत थॉमस मोर
देवबापाची इच्छा आहे की, आपण सर्वांनी स्वर्गात असावे. परमेश्वर सर्वांचा पिता, बाप, आब्बा आहे. आपले ह्या जगातील आई-बाप म्हणजे शारीरिक दृष्ट्या निसर्ग नियमानुसार जन्म देणारे पालक आहेत. मात्र स्वर्गीय पिताच खऱ्या अर्थाने जीवनदान देणारा पिता आहे. आपण सर्वजण स्वर्गीय पित्याची निर्मिती व मुले आहोत. एकच पित्याची मुले असल्यामुळे आपण सर्वांनी प्रेमाने, शांतीने, आनंदाने, सौख्याने भरलेले जीवन जगणे आवश्यक आहे. आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या सहवासात जाण्यासाठी योग्य ते जीवन आरचण करु या.
✝️
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“मी देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांस सांगितली."
माझा थोडासा वेडेपणा तुम्ही समजून घेतला तर बरे आणि ते तुम्ही करतच आहा. तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशारीतीने तुम्हाला शुद्ध कुमा असे ख्रिस्ताला सादर करावे. जसे सापाने कपट करून एवेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपणे शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील ह्याची मला भीती आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. मी जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही, हे आम्ही सर्व लोकांत आणि सर्व प्रकारे प्रकट केले.
तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांला सांगितली, हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळींपासून वेतन घेऊन त्यांना लुटले आणि मी तुम्हांजवळ असता मला.उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. कोणत्याही प्रकारे तुम्हांवर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो आणि जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे आणि मी सांगतो की, माझ्या ह्या अभिमानास अखाया प्रातांत प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे ? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय ? देवाला हे सारे ठाऊक आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १११ :१-४, ७-८
प्रतिसाद : प्रभो, तुझी कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत.
१) परमेश्वराचे स्तवन करा,
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत
मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन.
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत,
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.
२) त्याची कृती साक्षात मान आणि महिमा आहे,
त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते,
आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे.
परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे.
३) त्याची कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत;
त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत,
ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत.
ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत,
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:७-१५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोलला म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.” ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाइटापासून सोडव.” “कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपण मागण्यापूर्वीच देवाला आपल्या गरजा माहीत असतात. विशेषतः जेव्हा आपण देवाचे कार्य करण्यास मग्न असतो. “आमच्या स्वर्गीय बापा" या प्रार्थनेत जेव्हा आपण रोजची भाकर मागतो तेव्हा तो देईल किंवा नाही यामध्ये शंका नसावी. आपण त्याच्या दैवी कृपेच्या दानावर विश्वास ठेवायला हवा. तुरुंग अभिसेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाचा एक मार्ग म्हणजे देवाच्या दैवी दानावर विश्वास ठेवावा. हा एक कठीण मार्ग आहे. संत पॉल सांगतो, “जेव्हा , तो करिंथ मध्ये मिशन कार्य करीत होता तेव्हा त्याला हवी असलेली मदत मसोडिया चर्चमधून मिळाली म्हणून करिंथनमध्ये कार्य करण्यास त्याला कशाची गरज भासली नाही. आपण कधी-कधी म्हणतो, चर्चमध्ये सर्वकाही सुरळीत चालू आहे. मग आपण नियमितपणे चर्चला मदत का घ्यावी ? काही म्हणतात चर्चकडे पुरेसे आहे म्हणून अशी लोक चर्चला मदत करण्यापासून दूर राहतात. अशा ठिकाणी दैवी कृपा काम करताना आपण पाहतो. स्वतःचे लोक स्वतःचे कल्याण शोधत नाहीत. अशी प्रवृत्ती कुटुंबात किंवा चर्चमध्ये भरपूर त्रासदायक वाटते. आपल्या स्वतःच्या जीवनात डोकावून पाहूया. चर्चमध्ये किंवा गावपरिवारात कार्य करताना आपण स्वतःला कार्य करण्यासाठी झोकून देतो का? देवाच्या दैवी दानावर मी अवलंबून आहे का ?
प्रार्थना :हे आमच्या स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना शक्य होईल तितक्या हळूवारपणे व चिंतनपर पद्धतीने करु या.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या