सामान्यकाळातील ११वा सप्ताह
शुक्रवार २३ जुन २०२३
“पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका,
✝️
परोपकार, सेवा आणि दानधर्म ह्याद्वारे आपण त्यागमय जीवन जगू
शकतो. त्याच बरोबर सुवार्ता प्रसारासाठी वाटेल त्या परिस्थितीला सामोरे
जाऊन स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनू शकतो. आपल्याला ह्या जगातील गोष्टीचीगरज आहेच पण मृत्यूनंतर सर्वकाळचे जीवन लाभावे म्हणून आध्यात्मिक संपत्तीचा साठा करणे आवश्यक आहे. आपण आपल्या जागतिक संपत्तिचा त्याग करण्यास कृपा मागुया .
✝️
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“ह्या आणि इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे सर्व मंडळींविषयीची चिंता, ही आहे."
देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवीन. मी तर शरमेने म्हणतो की, त्याबाबतीत फार दुर्बळ पडलो आपण तरी ज्याबाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे हे मी निर्भीडपणे बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. ते आब्राहाम संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो; श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळवेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे, मी अधिक आहे. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूण चाळीस फटके खाल्ले, तीनवेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला. तीन वेळा माझे गलबत फुटले आणि एक दिवस आणि एक रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरली संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवानी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूनी आणलेली संकटे, श्रम आणि कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी आणि अपुरी वस्त्रे, ह्या सर्वांमुळेमी अधिक आहे. शिवाय ह्या आणि अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे आपल्या मंडळ्यांविषयींची चिंता, ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय ?
मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४ :२-७
प्रतिसाद : परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो.
१)मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन,
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल;
माझा जीव परमेश्वराच्याठायी प्रतिष्ठा मिरवील;
दीन हे ऐकून हर्ष करतील.
२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा,
आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.
मी परमेश्वराला शरण गेलो
आणि त्याने माझा स्वीकार केला;
त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले;
त्याची मुखे लज्जेने कदापि काळवडंणार नाहीत.
ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला
आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे,
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले..
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:१९-२३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत. आणि चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन लागेल.“डोळा शरीराचा दिवा आहे. ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार महाभयंकर आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: संताच्या बहुतेक प्रतिमेकड जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला एकतर त्यांचे डोळे वरच्या दिशेने पाहत आहेत असे दिसते किंवा त्यांचे हृदय चमकलेले किंवा प्रभू ख्रिस्ताची प्रतिमा किंवा दोन्ही दिसतात. पवित्र मरियेच्या बाबतीत देखील तसेच आपण पाहतो. हेच सर्वजण "माझ्या मार्गावरून चालणारे" (माझ्या मागे या) या संदेशावरून चालणारे आहेत. आपले डोळे कोठे बघतात ? आपल्या अंतःकरणातील तळमळ नक्की काय दर्शवते? हे आपण वेळोवेळी तपासले पाहिजे. दमस्काच्या त्या दैवी अनुभवनाने संत पॉलची दृष्टी व त्याचे हृदय बदलले. अंध व नम्र होऊन आता तो आपली जुनी प्रवृत्ती सोडून देतो. आता नवीन दृष्टी व नवीन ध्येय हाताशी घेऊन केवळ सुवार्ता प्रसारासाठी सर्वकाही सहन करण्यासाठी तयारी दर्शवितो. “मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार.” (१ करिंथ ९:१६) संत पॉल स्वतःच्या कार्याबद्दल बढाई मारतो. सुवार्तेसाठी आज कितीतरी बांधवाचा छळ होत आहे. तरीसुद्धा ख्रिस्तासाठी सर्वकाही सहन करण्यासाठी तयार असतात. आपले सर्वस्व ख्रिस्ताला समर्पित करून ख्रिस्तच आपले केंद्रबिंदू मानतात. पृथ्वीवरील ऐहिक गोष्टींकडे आपले लक्ष नलावता आपले ध्येय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हेच ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, नाशवंत संपत्तीचा मोह मला टाळता यावा आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगून स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या