सामान्यकाळातील ११वा सप्ताह
शनिवार २४ जुन २०२३
“तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला.”
✝️
योहान बाप्तिस्ताचा जन्म सोहळा
दि. २९ ऑगस्ट रोजी देऊळमाता “संत योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद” हा सण साजरा करते. आजच्या दिवशी ख्रिस्तसभा संत योहान बाप्तिस्त ह्याचा जन्मदिन उत्सव पाळते.
ख्रिस्ती उपासना वर्षात फक्त तीन महनीय, वंदनीय पूजनीय व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात. प्रभू येशू ख्रिस्त (२५ डिसेंबर) पवित्र मरिया (८ सप्टेंबर) आणि संत योहान बाप्तिस्त (२४ जून).
लूकलिखित शुभवर्तमानामध्ये योहानच्या जन्माविषयीची पार्श्वभूमी सुंदररित्या वर्णन करण्यात आलेली आहे. याजक वर्गातील जखऱ्या हा वेदीसमोर धूप जाळण्यासाठी जातो आणि तिथे त्याला गॅब्रियल देवदुताचे दर्शन घडते. 'जखऱ्या, भिऊ नकोस, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे.' त्याची वयातीत पत्नी गरोदर राहील या गोष्टीवर विश्वास न ठेवल्यामुळे जखऱ्या काहीकाळ मुका बनला.
जखऱ्याची पत्नी अलिशबा हिला सहावा महिना असताना मरिया घाईघाईने यहुदाच्या डोंगराळ प्रदेशात निघून जाते. तिथे जखऱ्याच्या घरी अलिशिबेला ती अभिवादन करते. दोघींच्या भेटीने योहान बाप्तिस्तने मातेच्या उदरात आनंदाने उडी मारली (लूक १ : ४६-५६)
पुढे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे नाव काय ठेवावे ह्यावरून चर्चा सुरू असताना जखऱ्याने पाटी मागितली आणि ह्याचे नाव योहान आहे असे त्यावर लिहिले. त्यानंतर त्याची वाचा पुन्हा आली आणि तोही देवाचे स्तुतीगीत गाऊ लागला (लूक १:६७-७९).
✝️
ख्रिस्तसभा आज योहान बाप्तिस्ताचा जन्मोत्सव साजरा करीत आहे. वयातीत असलेली अलिशीबा व जखऱ्या ह्यांना लाभलेले हे बाळ परमेश्वराची महान देणगी होती. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता. तो परमेश्वराचा महान सेवक व संदेष्टा होता. योहानाप्रमाणेच आपल्या प्रत्येकाला देवाने प्रभूची सुवार्ता परसविण्यासाठी व ख्रिस्ताचा प्रकाश होण्यासाठी पाचारण केले आहे. संत योहान बाप्तिस्ताच्या जन्मोत्सवदिनी आपण ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करु या.
पहिले वाचन : यशया ४९: १-६
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."
द्वीपांनो, माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले, त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.” मी तर म्हणालो होतो की, "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो : “याकोबाच्या वंशाचा उध्दार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३९ :१-३,१३-१५
प्रतिसाद : अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती
१.) हे परमेश्वरा, तू मला पारखतोस.
तू मला ओळखतोस, माझे बसणे
आणि माझे उठणे तू जाणतोस,
तू दुरून माझे मनोगत समजतोस.
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतासे,
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
२.) तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस,
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे,
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.
३. ) तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव
पूर्णपणे जाणून आहे,
मी गुप्त स्थळी निर्माण होत असता
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता
माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
दुसरे वाचन : प्रेषितांची कृत्ये १३ : २२-२६
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने घोषणा केली होती."
पौल म्हणाला, “देवाने आपल्या पूर्वजांना राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिध्दीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाच्या स्नानसंस्काराची इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, 'मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे. तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.'
“अहो बंधुजनहो, आब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.'
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील,
कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १:५७-६६,८०
वाचक :लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्याचे नाव योहान आहे."
अलीशिबेचे"ह्याचे नाव योहान आहे." दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बाळकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, "ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे." ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून “ह्याचे नाव योहान आहे,' असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्यासभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंत:करणांत ठेवून म्हटले, “हा बाळक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्राएलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज ख्रिस्तसभा संत योहान बाप्तिस्ताचा जन्माचा सोहळा साजरा करते. चर्च कॅलेंडरकडे जर आपण पाहिले तर ख्रिस्तसभेच्या संपूर्ण संताच्या साखळीत केवळ तीनच अशी माणसे आहेत की, त्यांचे जन्माचे सोहळे व मरणाचा दिवस साजरा केला जातो. प्रभू येशूख्रिस्त (२५ डिसें.) पवित्र मरिया (८ सप्टें.) व योहान बाप्तिस्ता (२४ जून). तारणाच्या इतिहासातील सर्वात लांबणीवर असलेला क्षण म्हणजे योहान बॉप्तिस्ताचा जन्मदिवस. योहानाच्या जन्माद्वारे आपल्याला हाच संदेश मिळतो की, मुलाच्या नावातही देवाची इच्च्छ किती प्रबळ आहे तसेच त्याचे पालन करणारे आई-वडील यांच्या जीवनात कसा बदल घडतो हे दिसून येते. योहानाचे नाव हे त्यांची कौटुंबिक परंपरा मोडून टाकते. योहानाचे नाव त्याच्या पृथ्वीवरील वडिलांच्या नावावरून ठेवले नाही, तर त्याचे नाव स्वर्गातील पित्याच्या इच्छेनुसार ठेवले जाईल. आपण पार्थीव जीवनातील बंधने सोडून देऊन आपल्या जीवनात देवाची इच्छा ऐकण्यास व पूर्ण करण्यास तयार आहोत का ? योहान बप्तिस्ताचा जन्म हा सर्वांना एक आनंदाची पर्वणी घेऊन येतो. योहानाचा जन्म सोहळा आनंदाने साजरा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. योहानाने “देवाचे कोकरू" अशी येशूबद्दल साक्ष जगाला दिली. त्याच्यासारखे नम्रपणाचे जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, जखऱ्या, अलीशिबा आणि योहान ह्यांचा आदर्श जीवनातून प्रकट करता यावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या