Marathi Bible Reading | 12th Sunday in ordinary Time | 25th June 2023

 सामान्यकाळातील १२ रविवार 

२५ जुन २०२३ 

जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, 
✝️



 भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. 

 आपल्या सर्वांचा सांभाळकर्ता व रक्षणकर्ता प्रभू आहे. प्रभूने आपल्याला प्रेमाचा व शांतीचा संदेश देऊन ह्या जगातील त्याचे सुवर्ताकार्य करण्यासाठी निवडले आहे. म्हणुनच प्रभू म्हणत आहे 'भीऊ नका, पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे'. सुवार्ता प्रसार करतांना जगातील आव्हाने आहेत. प्रभूसाठी व सुवार्तेसाठी इतिहासात अनेकांनी छळ सोसला व आजसुद्धा अनेक ठिकाणी ख्रिस्ती जनांचा छळ होत आहे. अशा वेळी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असतानांच धैर्याने सुवार्ता प्रसरविण्यासाठी पुढाकार घेऊया. आपले सर्वांचे मोल देवाच्या दृष्टीने खूप मोठे आहे. म्हणून आपल्या संकटसमयी देवाची कृपादृष्टी आपल्यावर सतत असते. न डगमगता धैर्याने आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी त्याची प्रेरणा व धैर्याचा आत्मा मागू या.


पहिले वाचन यिर्मया २०:१०-१३
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"परमेश्वर दुष्टांच्या हातून दीनजनांचा जीव वाचवतो."

यिर्मया म्हणाला, “मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो. चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, 'त्याच्याविरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू' 'कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत. ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्त्व पाहणाऱ्या अंतर्याम आणि हृदय पारखणाऱ्या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीन जनांचा जीव वाचवतो."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६९ :८ - १०, १४.१७, ३३-३५
प्रतिसाद :  हे देवा, मला उत्तर दे. 
१) तुझ्याकरिता मी निंदा सहन केली आहे,
लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे, 
मी आपल्या भावांना नवखा, 
माझ्या सहोदरांना परका असा झालो आहे.
 तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे,
 निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा ही माझी निंदा झाली आहे.

२) मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल 
अशा समयी तुझी प्रार्थना करतो. 
हे देवा, तू आपल्या महान दयेस अनुसरून 
आणि आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास 
अनुसरून मला उत्तर दे. 
हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे;
आपल्या करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.

३) दीनजन हे पाहून हर्ष करतील, 
देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो. 
कारण परमेश्वर दीनजनांचे ऐकतो 
आणि बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानत नाही.
आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यात संचार करणारे 
सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत.


दुसरे वाचन  रोम ५:१२-१५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"जशी अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही."

एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्याद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे भरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.
परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून विपुल झाली.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
 प्रभो म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय  १०:२६:३३

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "जे शरीराचा घात करतात त्यांना भिऊ नका."

येशूने आपल्या बारा शिष्यांना पुढीलप्रमाणे बोध केला : “ह्यास्तव भिऊ नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते उजेडात बोला आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा आणि शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही ? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन, पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन: ““खरे सुख कशात आहे?” हा प्रश्न मनुष्य आयुष्यभर विचारीत असतो. बालपणी त्याला शारीरिक पातळीवरील सुखाचा अनुभव येत असतो. कोणी जवळ केले, आपल्याला थोपटले, आपला मुका घेतला की बाळाला बरे वाटते. किशोरवयात ज्ञान मिळविण्यात सुख मिळते. तरुणपणात भावनिक व सांस्कृतिक सुखाकडे, प्रौढपणात सामाजिक सुखाकडे त्याचा ओढा असतो. शेवटी, आध्यात्मिक सुखाकडे आल्यावर तळ नसलेल्या बादलीत आपण सर्वकाही जमा करीत राहिलो अशी भावना त्याला अस्वस्थ करू लागते, आणि सर्वसंगपरित्याग करण्यास तो तयार असतो. आजची वाचने सुखाचे तीन पैलू उलगडून सांगतात. 
१. दुःखापासून पळून न जाता त्याला सामोरे जाणे : दुःख टाळल्याने नव्हे तर त्याला सामोरे जाऊन पुढे पुढे जात राहणे यातच सुख दडलेले आहे. परमेश्वराने ज्या लोकांची निवड केली त्यांना वाटले होते की, सर्वकाही आता सुखी- सुखी असणार आहे, मात्र प्रत्यक्ष ते जेव्हा देवाच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगू लागले तेव्हा त्यांना पदोपदी दुःखाचा सामना करावा लागला मग तो मोशे असो, दावीद असो की, आजच्या पहिल्या वाचनातील यिर्मया संदेष्टा असो. 
२. आज्ञाभंगाद्वारे नव्हे आज्ञापालनाद्वारे दुःख झेलणे : सुखाची आस धरून आदाम एवा ह्यांनी आज्ञाभंग केला त्यामुळे त्यांना अमरत्व, ऐक्य आणि सुख अशा सर्व गोष्टींना मुकावे लागले. त्याऐवजी मरण, परस्परवैर आणि कष्ट त्यांच्या वाटेला आले. प्रभू येशूने मात्र दुःखाला मिठी मारून आपल्यासाठी सार्वकालिक सुख मिळविलेले आहे. 
३. शारीरिक दुःखाचे नव्हे तर आध्यात्मिक दुःखाचे भान ठेवणे : शारीरिक दुःख टाळून,आज्ञाभंग करून माणूस आध्यात्मिक दुःख (अपराधीपणाची भावना, स्वतःशी, देवाशी, इतरांशी प्रामाणिक नसल्याची टोचणी) भोगत राहतो. येशू आपल्या शिष्यांना शिकवितो की, त्यांनी जे शरीराचा, घात व नाश करतात त्यांना नव्हे तर शरीर व आत्मा ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्या परमेश्वराचे भय धरावे कारण देवाचे भय हा
ज्ञानाचा (व सुखाचा) प्रारंभ होय. 
आत्मपरीक्षण : सुखी जीवनाविषयी माझी काय संकल्पना आहे? माझ्या जीवनातील दुःखे मी कशाप्रकारे हाताळतो ? मी खरोखर सुखी आहे का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझ्या सत्यस्वरुप प्रेमाचे व करुणेचे दर्शन इतरांना | घडविण्यासाठी, आम्ही सर्वदा पुढाकार घ्यावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या