सामान्यकाळातील १२वा सप्ताह
२६ जुन २०२३
अरे ढोंग्या, पाहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल."
✝️
संत आन्थेल्म
• महागुरू, वर्तनसाक्षी (१९०५-११७८)
इतरांचे दोष काढून त्यांना तुच्छ समजण्या ऐवजी आपण स्वतः किती सात्विक आहोत हे तपासून पाहायला हवे. दोष काढण्या ऐवजी आपण इतरांमध्ये चांगले काय आहे ते शोधावे. त्या चांगल्या गुणांबद्दल त्यांची प्रशंसा केल्याने समोरची व्यक्ती प्रसन्नतेने चांगले कृत्य कराण्यास प्रवृत्त होऊ शकते. प्रभू येशू आज पुढे जाऊन म्हणत आहे की, 'तुम्ही ज्या मापाने मापून द्याल तसेच तुम्हालाही मापून देण्यात येईल'. म्हणूनच आपण संयमाने आणि समतोल साधून परस्पर संबंध जोपासण्यासाठी सकारात्मकतेने जीवन जगणे जास्त फायद्याचे आहे. इतरांबद्दल चांगले ते बोलण्यास व चांगले तेच पसरविण्यास आपल्याला सुबुद्धी लाभावी म्हणूच आज प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : उत्पत्ती १२:१-९
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन १२:१-९
"परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला."
परमेश्वराने अब्रामला सांगितले, "तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला आणि लवकरच ते कनान देशात जाऊन पोहोचले. अब्राम त्या देशातून शखेमच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहात होते. मग परमेश्वर अब्रामला दर्शन देऊन म्हणाला, "हा देश मी तुझ्या संतानाला देईन.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते आणि पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला.'
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३३ :१२-१३, १८-२०,२२
प्रतिसाद : ज्या लोकांना परमेश्वराने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
१) ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो.
२) जे परमेश्वराचे भय धरतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे.
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. हे परमेश्वरा,
आम्ही तुझी आशा धरली आहे,
म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ७:१-५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा 'तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे' असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील ? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पाहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आब्राहाम आपल्या विश्वासामुळे परमेश्वरासमोर नितीमान ठरला. नितीमान माणसाचे. जीवन हे सोपे नसते. जीवनात अनेक खाचखलगे व
आव्हानांना सामोरे जाऊन देवावर केवळ विश्वास ठेवणे हाच ख्रिस्ती माणसाचा मार्ग आहे.
शुभवर्तमानात येशू आपल्याला आंतरिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतो. उदा. आपले हृदय शुद्ध असेल तर व्यक्ती जे काही बोलते व करते ते
सर्वकाही शुद्ध असेल. प्रत्येक व्यक्तीची कृती व तिचे शब्द हे तिच्या हृदयातून प्रकट होतात. आपली कृती, उक्ती यांची बऱ्याच वेळा सांगड बसत नाही कारण जे आपल्या मनात आहे ते आपल्या शब्दात उतरत नसते. कारण बऱ्याच वेळा आपण बोलतो एक व करतो दुसरे. आपल्या शब्दात व कृतीत पुष्कळदा विसंगती आढळते. जीवनात सुसंगती आणायची असेल तर आब्राहामाप्रमाणे विश्वासू जीवन जगून नीतीमानासारखे चालावे लागते ते करण्यासाठी मी तयार आहे का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, इतरांची प्रशंसा करुन त्यांच्या गुणांची स्तुती करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या