सामान्यकाळातील १७वा सप्ताह
मंगळवार १ ऑगस्ट २०२३
जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.
संत अल्फोन्सस डी लिगरी
महागुरू, वर्तनसाक्षी आणि धर्मपंडित
(१६९६-१७८७)
संत अल्फोन्सस ह्यांना नीतिशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांचा व प्रायश्चित्त संस्कार देणाऱ्या धर्मगुरूंचा आश्रयदाता संत मानले जाते.
चिंतन : ज्याला फळ हवं आहे त्याने झाडाकडे गेले पाहिजे. ज्यांना ख्रिस्त हवा आहे त्यांनी मरियेकडे आले पाहिजे आणि ज्याची मरियेशी भेट होते त्याला निश्चितच ख्रिस्त सापडतो. संत अल्फोन्सस डी लिगरी
ख्रिस्तसभा आज संत अल्फन्सस लिगरी ह्यांचा स्मृती दिन साजरा करीत आहे. एक महान कायदेतज्ञ आणि नीतिशास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती. साक्रामेंतातील येशूच्या भक्तीचा त्याने प्रसार केला. रिडेंप्टरीस्ट धर्मगुरु संघाची त्याने स्थापना करुन आपले सुवार्ताकार्य बलशाली व प्रभावी बनवले. प्रभू येशू आपण सर्वजण त्याच्या नावाने जेव्हा एकत्र जमा होतो तेव्हा आपल्यामध्ये हजर असतो. प्रभू येशूचे अस्तित्व आपण जाणावे, ओळखावे आणि अनुभवावे म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : निर्गम ३३:७-११, ३४:४-९,२८
वाचक : निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे."
मोशे छावणीबाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी आणि त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणांला परमेश्वराशी काही विचारावयाचे असले म्हणजे तो छावणी बाहेरील त्या दर्शनमंडपाकडे जाई. जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जाई तेव्हा सर्व लोक उठून आपआपल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत राहत. मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारी उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करी. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपआपल्या तंबूच्या दाराशी वंदन करीत. मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे.
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वर त्यांच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, “परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा आणि सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध आणि पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टपणाबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत समाचार घेतो." तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, “हे प्रभो, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय आणि पापे ह्यांची क्षमा कर आणि आम्हांला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर.'
मोशे तेथे परमेश्वरासमीप चाळीस दिवस आणि चाळीस रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, आणि त्या पाट्यांवर त्याने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून काढल्या.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Exodus 33:7-11;34:5b-9, 28
In those days: Moses used to take the tent and pitch it outside the camp, far off from the camp, and he called it the tent of meeting. And everyone who sought the Lord would go out to the tent of meeting, which was outside the camp. Whenever Moses went out to the tent, all the people would rise up, and each would stand at his tent door, and watch Moses until he had gone into the tent. When Moses entered the tent, the pillar of cloud would descend and stand at the entrance of the tent, and the Lord would speak with Moses. And when all the people saw the pillar of cloud standing at the entrance of the tent, all the people would rise up and worship, each at his tent door. Thus the Lord used to speak to Moses face to face, as a man speaks to his friend. When Moses turned again into the camp, his assistant Joshua the son of Nun, a young man, would not depart from the tent. And Moses proclaimed the name of the Lord. The Lord passed before him and proclaimed, "The Lord, the Lord, a God merciful and gracious, slow to anger, and abounding in steadfast love and faithfulness, keeping steadfast love for thousands, forgiving iniquity and transgression and sin, but who will by no means clear the guilty, visiting the iniquity of the fathers on the children and the children's children, to the third and the fourth generation." And Moses quickly bowed his head towards the earth and worshiped. And he said, "If now I have found favour in your sight, O Lord, please let the Lord go in the midst of us, for it is a stiff-necked people, and pardon our iniquity and our sin, and take us for your inheritance." So he was there with the Lord for forty days and forty nights. He neither ate bread nor drank water. And he wrote on the tablets the words of the covenant, the Ten Commandments.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :१०३:६-१३
प्रतिसाद : परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.
१) जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची
आणि न्यायाची कृत्ये करतो.
त्याने आपले मार्ग मोशेला आणि
आपली कृत्ये इस्राएलच्या वंशजांना जाहीर केली.
२) परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध आणि दयामय आहे.
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही;
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.
३) आमच्या पापांच्या मानाने
त्याने आम्हाला शासन केले नाही.
त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने
आम्हाला प्रतिफळ दिले नाही.
कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे,
तशी त्याची दया आणि त्याचे भय धरणाऱ्यांवर अमाप आहे.
४) पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,
तितके त्याने आमचे अपराध
आमच्यापासून दूर केले आहेत.
जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो,
तसा परमेश्वर आपले भय
धरणाऱ्यांवर ममता करतो.
Psalm 103:6-7, 8-9, 10-11, 12-13
The Lord is compassionate and gracious.
The Lord does just deeds,
gives full justice to all who are oppressed.
He made known his ways to Moses,
and his deeds to the children of Israel. R
The Lord is compassionate and gracious,
slow to anger and rich in mercy.
He will not always find fault;
nor persist in his anger forever. R
He does not treat us according to our sins,
nor repay us according to our faults.
For as the heavens are high above the earth,
so strong his mercy for those who fear him. R
As far as the east is from the west,
far from us does he remove our transgressions.
As a father has compassion on his children,
the Lord's compassion is on those who fear him. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
Acclamation:
The seed is the word of God, Christ is the sower;
all who come to him will live forever.
शुभवर्तमान मत्तय १३ : ३६-४३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल."
येशू लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, "शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा."
त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दुतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 13:36-43
At that time: Jesus left the crowds and went into the house. And his disciples came to him, saying, "Explain to us the parable of the weeds of the field." He answered, "The one who sows the good seed is the Son of Man. The field is the world, and the good seed is the sons of the kingdom. The weeds are the sons of the evil one, and the enemy who sowed them is the devil. The harvest is the end of the age, and the reapers are angels. Just as the weeds are gathered and burned with fire, so will it be at the end of the age. The Son of Man will send his angels, and they will gather out of his kingdom all causes of sin and all lawbreakers, and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. Then the righteous will shine like the sun in the kingdom of their Father. He who has ears, let him hear.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
येशूख्रिस्त निसर्गातील उदाहरण देऊन स्वर्गाच्या राज्याविषयी स्पष्टिकरण देतो. त्यासाठी तो चांगले बी पेरणाऱ्या माणसाचे उदाहरण देतो. चांगले बी पेरणारा येशू ख्रिस्त आहे. बायबलची वचने म्हणजे जणू चांगले बी आहे. ते आपल्या हृदयात वाढत असते. परंतु त्याचवेळेस सैतानदेखील दुसऱ्या बाजूने वाईटनिंदणाचे बी पेरत असतो. आपल्या जीवनात कधी कधी आपण जगातील मोहपाशाला बळी पडतो व आपल्या हृदयात निंदण वाढते व ते वेळीच काढणे आवश्यक आहे. परंतु ते काढीत असतांना चांगल्या बियांमुळे आलेले पीक म्हणजेच ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आपले चाललेले जीवन नष्ट होऊ नये ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ख्रिस्ताची वचने जर आपण आपल्या जिवनात आत्मसात केली तर आपल्याला विपुल जीवन, सार्वकालिक जीवन म्हणजेच स्वर्गसुख मिळेल. परंतु जर आपण सैतानाच्या मार्गाने गेलो म्हणजेच वाईट मार्गाने गेलो तर मेल्यानंतर आपण सदासर्वकाळ नरकात जाणार. आपण या जगात ८० किंवा १०० वर्षे जगणार. म्हणजेच अनंतकाळाच्या तुलनेने ह्या जगातील आपले जीवन क्षणभंगूर आहे. परंतु ह्या क्षणभंगूर जीवनात जर बायबलची तत्त्वे अंगिकारली तर त्या बदल्यात सार्वकालिक जीवन लाभेल. तेव्हा जर आपला विश्वास सार्वकालिक जीवनावर असेल तर नक्कीच आपण ख्रिस्ताच्या मार्गाने चालणार. आपण ख्रिस्ती लोकांनी सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवायलाच पाहिजे कारण सार्वकालिक जीवनाची खात्री खुद्द येशूख्रिस्ताने दिली आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला जाणण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
.
.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या