आगमन काळातील
चौथा रविवार
२४ डिसेंबर २०२३
देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.”
he came to her and said, "Hail, full of grace, the Lord is with you!
वाचक : शमुवेल या पुस्तकातून घेतलेले वाचन
राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्ट्यास म्हणाला, "पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे." नाथान राजास म्हणाला, "तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे." त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग, 'परमेश्वर म्हणतोः तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? तू माझ्या प्रजेचा, इसरायलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इसरायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांस रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इसरायल लोकांवर मी शास्ते नेमले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यांस त्रस्त करत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन तुझे घराणे आणि तुझे राज्य ही तुझ्यापुढे राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल."
प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२)“मी स्वत: निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे. तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन."
३) तो मला म्हणेल, "तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस." त्याच्यावरचे माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
वाचक : रोमकरांस पत्र या पुस्तकातून घेतलेले वाचन
आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखाच्याद्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरून व माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यात समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुग गौरव असो ! आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे.
जयघोष
नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गेब्रियल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दीवाद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही." मरीयेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही." देवदूताना उत्तर दिले, "पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलिशबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही." तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
✝️

0 टिप्पण्या