सामान्य काळातील चोवीसावा सप्ताह
बुधवार १८ सप्टेंबर २०२४
"विश्वास, आशा, आणि प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. And now there remain faith, hope, and charity, these three: but the greatest of these is charity.
ब्रिंडीसी (इटली) जवळच्या क्युपर्टिनो नावाच्या गावातील एका चांभाराच्या घरी जोसेफ डिसा ह्याचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्याला शाळेमध्ये दिव्य दृष्टान्त होत. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला 'स्वप्नदर्शी' असे नाव दिलेले होते.
पुढे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने फ्रान्सिस्कन आणि कॅप्युचिन संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याची खूप खटपट केली. परंतु त्याची बुद्धिमत्ता साधारणच असल्यामुळे आणि साक्षात्कारांमध्ये बेभान झाल्याने त्याचा बराच वेळ वाया जाई. त्यातच कामावर त्याचे लक्ष नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला सर्वत्र प्रवेश नाकारला जाई.
ला ग्रॉटेला येथल्या फ्रान्सिस्कन संस्थेने मात्र त्याच्या प्रामाणिक इच्छेला वाव मिळावा म्हणून त्याला घरकामासाठी संस्थेत प्रवेश दिला. हळूहळू त्याची पश्चात्ताप बुद्धी, नम्रता व आज्ञाधारकपणा इतकी प्रखरतेने जाणवू लागली की, त्याला लवकरच धर्मगुरुपदाची दीक्षा देण्याचे ठरविण्यात आले.
प्रथम वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत त्याला लिखाण वाचनाची सवय करावी लागली. मात्र ईशज्ञान विषयक प्रश्न हाताळताना त्याची तारांबळ उडे. परंतु या बुद्धिमत्तेच्या पलिकडे असलेल्या एका वेगळ्याच विश्वातील दान त्याला लाभलेले होते. पापी लोकांना तो दुरूनच ओळखू शकत असे. त्यांचे चेहरे त्याला काळवंडलेले दिसत. तसेच अशुद्ध जीवन जगणाऱ्या व्यक्ती त्याच्याजवळ आल्यानंतर त्याला वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी येत असे.
साक्षात्काराची देणगी तर त्याला काही औरच प्रमाणात लाभली होती. एखाद्या संताचे नुसते नाव घेतले, चर्चचा घंटानाद त्याच्या कानावर आदळला किंवा धार्मिक गायन त्याला ऐकू आले की तासन् तास जोसेफ बेभान होत असे. देहभान हरपून केवळ प्रार्थना, मनन व चिंतनामध्ये दंग होऊन जाई. त्यामुळे त्याला गायनमंडळ, जाहीर पवित्र मिस्सा व मिरवणूक ह्यापासून दूर ठेवण्यात आलेले होते. त्याच्यासाठी खासगी चॅपल बांधलेले होते. शिवाय त्याच्या नावाभोवती आता प्रसिद्धीचे वलय निर्माण झाल्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या पायापाशी लोळण घेत. त्यात चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला होता.
उपवास, प्रायश्चित्त व प्रार्थना याबाबतीत त्याची साधनासुद्धा खूप परिपूर्णतेला पोहोचलेली होती. उपवासकाळात तो फक्त गुरुवार आणि रविवार या दोन्हीच दिवशी जेवण घेई. जोसेफ हा देवाचा एक प्रसन्नचित्त व साधासुधा मनुष्य होता. परंतु त्याला लाभलेल्या आध्यात्मिक दानांमुळे बराच गैरसमज निर्माण झाला. त्याच्याविषयीच्या अफवांना ऊत आला.
इ. स. १६६३ साली मरण पावलेल्या जोसेफ ह्यांना पोप क्लेमेंट तेरावे ह्यांनी १७६७ साली संत म्हणून घोषित केले.
संत जोसेफ हा परिक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा (परिक्षार्थींचा)
आश्रयदाता संत होय.
देवावर प्रेम करा. ज्याच्यापाशी देव आहे त्याच्याजवळ सर्व काही आहे. जगाला जरी दिसत नसले तरी अंतर्यामी तो श्रीमंत आहे.- क्युपर्टिनोचे संत जोसेफ
0 टिप्पण्या